द प्रेसिडेंट 'बेन'! (वुई द सोशल)

श्रीमंत माने shrimant.mane@esakal.com
सोमवार, 23 जानेवारी 2017

'जगाची काळजी वाहताना अमेरिकेचे मात्र नुकसान झाले', असा सोईस्कर दावा करताना नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाच्या कारभाराची शैली आमूलाग्र बदलण्याचे सूतोवाच केले आहे.

अमेरिका ही खऱ्या अर्थानं "ओपन सोसायटी' आहे. आपल्यासारखं, "देशाचं नेतृत्व करणाऱ्यांबद्दल जरा आदर बाळगा', वगैरे प्रकार तिकडे नसतात. थेट राष्ट्राध्यक्षावर आडवीतिडवी टीका करायला लोक कचरत नाहीत. सोशल मीडिया हे अर्थातच त्याचं प्रभावी हत्यार. त्याचा अनुभव "मेरे प्यारे अमेरिकावासीयों' अशी हाक देत राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणारे अन्‌ "बाय अमेरिकन, हायर अमेरिकन' हा स्वदेशीचा नारा देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्याच दिवशी घेतला. शपथविधीवेळी वॉशिंग्टनच्या नॅशनल मॉलमधल्या गर्दीबाबत लोक खुलेपणानं बोलताहेत.

"एस वुई कॅन', म्हणत बराक ओबामांनी 2009 मध्ये पहिली शपथ घेतली तेव्हा अंदाजे अठरा लाख, तर चार वर्षांनंतर अंदाजे दहा लाख लोक तिथं होते. तुलनेत ट्रम्प यांच्यासाठी केवळ सात-साडेसात लाख लोक उपस्थित होते. दरम्यान, शपथविधीला निदर्शनांचं गालबोट लागलं. तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडल्या. कृष्णवर्णीय, अल्पसंख्यांक, खासकरून महिला नाराज आहेत. ट्रम्प यांच्या महिलाविषयक दृष्टिकोनाचा निषेध म्हणून शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी लाखो महिला अमेरिकेच्या कानाकोपऱ्यात रस्त्यावर उतरल्या. एकानं "ट्‌विट' केले, ""शपथविधीच्या गर्दीत अल्पसंख्यांक शोधतोय, तर दोघेच दिसले - बराक व मिशेल ओबामा!''. म्हणूनच की काय, नवे-जुने अध्यक्ष व दोन्ही "फर्स्ट लेडीज' एकत्र आल्या तेव्हा नेहमी हसतमुख असणाऱ्या मिशेल ओबामांचा आक्रसलेला चेहरा बरंच काही सांगून गेला.

"पोटस' म्हणजे "प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्‌स' या "ट्विटर हॅंडल'च्या कव्हरवर सत्तांतर होताना 2009 मधला जुना फोटो टाकला गेला. टीका होताच तो बदलून अमेरिकेचा नकाशा डकवला. तिसऱ्या वेळी ट्रम्प दालनातून खिडकीबाहेर पाहतानाचा "फेसबुक पेज'वरचा फोटो "ट्‌विटर'वर आला. तिन्ही टप्प्यांवर "फॉलोअर्स'ची संख्या छत्तीस लाख, सदतीस लाख व त्रेपन्न लाख अशी वाढत गेली. आता अमेरिकेच्या 45व्या अध्यक्षांचे "फॉलोअर्स' आहेत, 1 कोटी 43 लाखांच्या घरात.

परंतु, सगळ्यांवर कडी ठरली ती ट्रम्प यांची एका कार्टून मालिकेतल्या खलनायकाशी तुलना. "बॅटमन' ही अमेरिकेसह जगभरातल्या लोकप्रिय कार्टून मालिकेपैकी एक. आपल्याकडच्या बैलांच्या मुसक्‍यांसारखा मुखवटा घालणारा बेन हा तिच्यातला खलनायक. "बॅटमन बिगिन्स', "द डार्क नाइट' व "द डार्क नाइट रायजेस' या तीन चित्रपटांची मालिकाही कार्टून कथानकावर निघालीय. यापैकी तिसऱ्या चित्रपटातला खलनायक बेन गॉथमच्या रहिवाशांना उद्देशून म्हणतो की, मी तुमची भ्रष्ट, अत्याचारी व धनदांडग्यांच्या तावडीतून सुटका केली. आता, "वुई गिव्ह बॅक टू यू, द पीपल!'. डोनाल्ड ट्रम्प यांनी, "हे सत्तांतर केवळ एका अध्यक्षांकडून दुसऱ्याकडे किंवा एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे नाही, तर "वॉशिंग्टन डीसी'ची सत्ता पुन्हा तुमच्याकडे म्हणजे लोकांकडे आलीय', असं सांगताना बेनचं वाक्‍य जसंच्या तसं उच्चारलं अन्‌ "अमेरिकन कार्नेज' व "प्रेसिडेंट बेन' या "हॅशटॅग'द्वारे ट्रम्प यांची खिल्ली उडवली गेली.

हिरव्या डोळ्याची शरबत गुला...
बत्तीस वर्षांपूर्वी, 84-85 च्या दरम्यान "नॅशनल जिओग्राफिक'च्या मुखपृष्ठावर झळकलेली हिरव्या डोळ्यांची शरबत गुला पुन्हा चर्चेत आहे. रशियन आक्रमणात मातापिता, भाऊ गमावलेली शरबत वायव्य प्रांतातल्या डोंगरदऱ्या पालथ्या घालून पाकिस्तानात आली. स्टीव्ह मॅक्‌क्‍युरीनं पाकिस्तानातल्या नासीरबाग शिबिरात तिची छबी टिपली. "अफगाण रेफ्युजी गर्ल' म्हणून शरबत जगभर पोचली. मोनालिसाच्या गूढ हास्याशी तिच्या डोळ्यांची तुलना केली गेली. पस्तीस वर्षांनतर पाक सरकार कठोर वागलं. नागरिकत्वाच्या बनावट कागदपत्राच्या आरोपात गेल्या नोव्हेंबरमध्ये तिला अटक झाली. पंधरा दिवस तुरुंगात काढल्यानंतर खैबर पख्तुनवा सरकारनं तिला चार अपत्यांसह मायदेशी रवाना केलं. आयुष्यभर कॅमेरा व मुलाखती टाळलेल्या शरबतला परवा "बीबीसी'नं गाठलं. तिची मुलाखत "यू ट्यूब'वर चर्चेत आहे. शरबतनं पती व थोरली मुलगी "हिपॅटायटीस-सी'च्या प्रादुर्भावानं गमावली. म्हणून पन्नाशी जवळ आलेली असताना तिला गोरगरिबांना मोफत उपचारासाठी "एनजीओ' चालवायचीय. ""त्या छायाचित्रानं प्रसिद्धी दिली हे खरं; पण वेदनाही खूप दिल्या अन्‌ महत्त्वाचं म्हणजे त्यामुळंच तुरुंगवास नशिबी आला'', अशी भावना व्यक्‍त करतानाच, ती व्यथा पाठीवर टाकून शरबत आता मातृभूमीत नवं आयुष्य सुरू करू पाहतेय.

Web Title: the president ben

फोटो गॅलरी