पृथ्वीचा देखणा "शो'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

अशा गुणी फलंदाजाला ज्युनियर निवड समितीने नुकतेच 19 वर्षांखालील आशिया करंडक स्पर्धेसाठी निवडले नाही. त्याने प्रथमश्रेणी क्रिकेट अधिकाधिक प्रमाणात खेळावे हाच यामागील उद्देश आहे. त्यासाठी रणजीला प्राधान्य देण्यात आले. दरम्यानच्या कालावधीत पाहुण्या न्यूझीलंडविरुद्ध मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर त्याला सराव सामन्यात संधी देण्यात आली

क्रिकेटमध्ये पंच आणि यष्टिरक्षक या दोघांचे काम हा "थॅंकलेस जॉब' मानला जातो. यात निवड समितीचाही समावेश करावा लागेल. संघ जिंकल्यास त्याचे श्रेय निवड समिती सदस्यांना क्वचितच मिळते. उलट "फ्लॉप' ठरणाऱ्या एखाद्या "स्टार'ला काढले तरी गदारोळ माजतो. त्यातही ज्युनियर निवड समिती तर कुणाच्याच गावी नसते. अशावेळी मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉ याच्या संदर्भात दूरदर्शी निर्णयप्रक्रिया धाडसाने राबविणाऱ्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या ज्युनियर, तसेच रणजी निवड समितीप्रमाणेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ज्युनियर समितीचीही प्रशंसा करावी लागेल.

हॅरिस शिल्डमध्ये पृथ्वीने एलिट विभागात 546 धावांचा विश्वविक्रम नोंदविला. त्याआधीही त्याची तुलना सचिन तेंडुलकरशी केली जात होती. मुंबई क्रिकेटमध्ये खेळाडूला संधी देताना धाडसी दृष्टिकोनाचा अवलंब केला जातो. त्यामुळे पृथ्वीला गेल्या मोसमात वयाच्या सोळाव्या वर्षी रणजी आणि इराणी करंडक स्पर्धांत योजनाबद्ध रीतीने उतरविण्यात आले. त्याने रणजी पदार्पणात शतक ठोकले. त्याला थेट उपांत्य फेरीत संधी देण्यात आली, दुसऱ्या डावात शतक ठोकत त्याने मुंबईच्या निर्णायक विजयात मोलाचा वाटा उचलला. तो "सामनावीर' ठरला. दुलिप करंडक पदार्पणात त्याने हा पराक्रम केला. याबरोबरच त्याने सचिनच्या कामगिरीशी बरोबरी केली.

अशा गुणी फलंदाजाला ज्युनियर निवड समितीने नुकतेच 19 वर्षांखालील आशिया करंडक स्पर्धेसाठी निवडले नाही. त्याने प्रथमश्रेणी क्रिकेट अधिकाधिक प्रमाणात खेळावे हाच यामागील उद्देश आहे. त्यासाठी रणजीला प्राधान्य देण्यात आले. दरम्यानच्या कालावधीत पाहुण्या न्यूझीलंडविरुद्ध मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर त्याला सराव सामन्यात संधी देण्यात आली. या संधीचेही पृथ्वीने सोने केले. त्याने सलामीला 66 धावांची खेळी केली. पृथ्वीशी मुंबईचे विश्‍वविक्रमी सलामीवीर सुनील गावसकर यांच्या कंपनीने मोठा करार केला आहे. त्यावरून तो किती गुणवान आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सचिन व राहुल द्रविड यांनीही त्याला वेळोवेळी शाबासकी दिली आहे. पृथ्वीला अजून बराच पल्ला गाठायला आहे. संधी एकदाच दार ठोठावते असे म्हणतात, पण एका संधीचे सोने केले तर दुसरी संधी चालून येत असते. रिझवी स्पिंगफिल्ड स्कूलच्या पृथ्वीने शालेय-रणजी-इराणी-सराव सामना अशा क्रमाक्रमाने केलेली घोडदौड म्हणूनच कौतुकास्पद आहे.

Web Title: Prithvi Shaw article