ग्लॅमरस कबड्डी (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

क्रिकेटपाठोपाठ अमाप लोकप्रियता मिळविली आहे ती ‘प्रो-कबड्डी लीग’ने. ‘प्रो-कबड्डी लीग’साठी नुकत्याच झालेल्या खेळाडूंच्या लिलावात कोटीच्या बोली लावल्या गेल्या, त्यावरून कबड्डीची वाढती लोकप्रियता अधोरेखित झाली. आता याचा फायदा घेऊन क्रीडा संस्कृती रुजविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत.  

क्रिकेटपाठोपाठ अमाप लोकप्रियता मिळविली आहे ती ‘प्रो-कबड्डी लीग’ने. ‘प्रो-कबड्डी लीग’साठी नुकत्याच झालेल्या खेळाडूंच्या लिलावात कोटीच्या बोली लावल्या गेल्या, त्यावरून कबड्डीची वाढती लोकप्रियता अधोरेखित झाली. आता याचा फायदा घेऊन क्रीडा संस्कृती रुजविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत.  

क बड्डीसारख्या देशी, मैदानी खेळाला ग्लॅमर लाभते आहे, ही आनंदाची बाब म्हटली पाहिजे. त्यातून या खेळाचा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर प्रसार आणि विकास झाला पाहिजे. आता जे वलय या खेळाला लाभते आहे, ते लीगमुळे.दशकापूर्वी  २००७ मध्ये एकदिवसीय विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा सुरू असतानाच ‘इंडियन प्रीमियर लीग’ची भन्नाट कल्पना समोर आली.  तिने अनेक उदयोन्मुख खेळाडूनांच नव्हे, तर उद्योजकांना गलेलठ्ठ करार आणि नफ्याचे भरजरी स्वप्न दाखवले आणि ते साकारलेदेखील. ही कल्पना इतकी प्रचंड यशस्वी झाली, की गेल्या अकरा वर्षांत क्रीडा क्षेत्रात ‘लीग’ हा परवलीचा शब्द होऊन बसला आहे. यात क्रिकेटपाठोपाठ अमाप लोकप्रियता मिळविली ती ‘प्रो-कबड्डी लीग’ने. ‘प्रो-कबड्डी लीग’साठी खेळाडूंच्या नुकत्याच झालेल्या लिलावात ज्या प्रकारे कोटीच्या बोली लावल्या गेल्या, त्यावरून कबड्डीची वाढती लोकप्रियताच अधोरेखित झाली. क्रिकेट आणि कबड्डी या एका अर्थाने समांतर चालणाऱ्या लीग म्हटल्या तरी चालेल. काही महिन्यांपूर्वीच ‘स्टार टीव्ही’ने ‘आयपीएल’चे प्रसारण हक्क पाच वर्षांसाठी विकत घेताना त्यासाठी तब्बल १६ हजार कोटी रुपये मोजले. कबड्डीचे म्हणाल तर ‘स्टार’नेच कबड्डी लीगला जन्माला घातले. कबड्डी लीगला सुरवात झाली, तेव्हा ती इतकी यशस्वी होईल असे वाटले नव्हते. पण, मुळात कबड्डी खेळ लोकप्रिय असल्यामुळे लीग यशस्वी होण्यास वेळ लागला नाही. त्यात थेट प्रसारण होत असल्यामुळे कबड्डी घराघरांत पोचली. साहजिकच चाहत्यांबरोबर प्रेक्षकही वाढले. सुरवातीच्या लीगसाठी तेव्हाचा
भारतीय कर्णधार राकेश कुमार याला सर्वाधिक १८.५ लाख रुपयांची बोली लागली होती. लीग लोकप्रिय झाली. अनेक उद्योजक याकडे आकर्षित होऊ लागले. लीगमधील आठ संघांची संख्या चार वर्षांत बारा झाली. अदानी, जिंदाल यासारख्या उद्योग समूहांबरोबर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही लीगने वेड लावले. सचिनने या लीगमध्ये उडी घेतल्याने लीगचे नुसते वलय वाढले नाही, तर खेळाडूंच्या बोलींनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. क्रिकेट, फुटबॉल या लीगचे विश्‍वच वेगळे आहे. या दोन्ही खेळांचा आवाका वेगळाच आहे. पण, त्यांच्याबरोबरीने उद्योजक अन्य खेळांतील लीगमधील खेळाडूंसाठी मोठ्या बोली लावत आहेत, हेही नसे थोडके. अन्य खेळांतही पैसा खेळतोय, फक्त त्यासाठी अचूक व्यवस्थापन हवे आणि ते कबड्डीने दाखवले.

 यंदा सहाव्या लीगसाठी लिलाव झाला, तेव्हा सहा खेळाडू कोट्यधीश झाले. यातील सर्वाधिक बोली दीड कोटीची ठरली. मनू गोयत या बोलीचा मानकरी ठरला. त्याचबरोबर दीपक हुडा, राहुल चौधरी, रिशांक देवाडिगा आणि नितीन तोमर या देशी खेळाडूंबरोबर फझल अत्राचली हा इराणचा खेळाडूही कोट्यधीश झाला. कबड्डी खेळ मुळात गरीब आणि खेळणारा खेळाडूदेखील गरीब. नुसत्या कबड्डीवर उदरनिर्वाह चालेल, अशी कधीच परिस्थिती नव्हती. पण, या लीगने सगळे चित्र बदलले. कबड्डीपटूला कोट्यधीश केले. आता नोकरी नसली, तरी कबड्डीपटू या लीगचा आधार घेऊन उदरनिर्वाह चालवू शकेल, अशी परिस्थिती आहे. प्रो. कबड्डी लीगमधील महाराष्ट्राचा चेहेरा आत्तापर्यंत मर्यादितच राहिला आहे. तो कसा उजळून निघेल, याचा विचार महाराष्ट्रातील संघटक आणि खेळाडू दोघांनीही करायचा आहे. या सहाव्या मोसमाने नवोदित खेळाडूंच्या पारड्यात मते टाकताना अनुपकुमार, जसवीरसिंग, मनजीत चिल्लर, राकेश कुमार यांना जणू निर्वाणीचा इशारा दिला आहे. काहीही असले, तरी खेळाच्या लीग हा आता परवलीच्या शब्दाच्यापुढे जाऊन व्यवसाय झाला आहे. या व्यवसायाच्या तेजीने खेळाडू श्रीमंत होत आहेत. अपेक्षा इतकीच आहे की लीगचा हात पकडून देशात पैशाबरोबरच क्रीडा संस्कृतीदेखील रुजावी, तरच या ‘धन धना धन’चे मोल खऱ्या अर्थाने वाढेल.

Web Title: pro kabaddi league 2018