लढाई स्त्रीच्या आत्मसन्मानाची

प्रा. चैत्रा रेडकर
शुक्रवार, 8 मार्च 2019

युद्धातून स्त्री आणि स्त्रीत्वाचा होणारा अपमान, तिचं वस्तूकरण यांसारख्या बाबींकडे जगभरातील स्त्रीवादी अभ्यासकांनी लक्ष वेधलं आहे. युद्धातील स्त्रीची वाताहत ही निव्वळ भाषिक पातळीवर सीमित राहात नाही, त्याला इतरही अनेक परिमाणं आहेत.

युद्धातून स्त्री आणि स्त्रीत्वाचा होणारा अपमान, तिचं वस्तूकरण यांसारख्या बाबींकडे जगभरातील स्त्रीवादी अभ्यासकांनी लक्ष वेधलं आहे. युद्धातील स्त्रीची वाताहत ही निव्वळ भाषिक पातळीवर सीमित राहात नाही, त्याला इतरही अनेक परिमाणं आहेत.

डो ळ्यांतील अश्रू लपवत युद्धाला निघालेल्या सैनिकाला दारात उभं राहून निरोप देणारी वीरपत्नी किंवा वीरमाता आपण अनेकदा जाहिरातींत, चित्रपटांत आणि मालिकांमध्ये पाहिली आहे. त्याचबरोबर स्वतः लढायला सिद्ध झालेल्या धीरोदात्त, शूरवीर, लढाऊ स्त्रीचाही आपण नेहमीच गौरव केला आहे. पौराणिक कथांमध्ये नरकासुराबरोबरील युद्धात कृष्णाला वाचवणारी सत्यभामा आहे. आधुनिक भारताच्या इतिहासात झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल ही नावं आहेत. जागतिक इतिहासात पहिली महिला फायटर पायलट म्हणून नोंद असलेलं १९२०च्या दशकातच पायलट झालेल्या तुर्कस्तानच्या सबिना गोखन यांचं नाव आहे. दुसऱ्या महायुद्धात सोविएत रशियाने मूलबाळ नसलेल्या जवळपास आठ लाख स्त्रियांना युद्धावर पाठवलं होतं, असं म्हटलं जातं. आजच्या घडीला जगभरात विविध देशांच्या सैन्यांत स्त्रिया आहेत आणि त्यांपैकी काही देशांत त्यांना युद्धभूमीवर (वॉर-फ्रंटवर) जाण्याचाही अधिकार आहे. १९९१च्या आखाती युद्धात सहभागी झालेल्या स्त्री-सैनिकांचे आपल्या अपत्यांचा निरोप घेतानाचे फोटो विशेष गाजले होते. सध्या भारतीय सैन्यातील फ्लाईट लेफ्टनंट अवनी चतुर्वेदी, मोहना सिंग आणि भावना कांत; तर पाकिस्तानी सैन्यात आयेशा फारुख या महिला फायटर पायलट आहेत. यापैकी अनेक उदाहरणं आपल्या परिचयाची आहेत, त्याविषयी आपण वेळोवेळी वाचत असतो. आज ‘जागतिक महिला दिना’निमित्त स्त्रियांनी युद्धाच्या संदर्भात बजावलेल्या यापेक्षा वेगळ्या भूमिकेची ओळख करून घेऊया.

युद्धातून स्त्री आणि स्त्रीत्वाचा होणारा अपमान, तिचं वस्तूकरण, वापर आणि स्त्रीविरोधी हिंसा यांसारख्या बाबींकडे जगभरातील स्त्रीवादी अभ्यासकांनी लक्ष वेधलं आहे. या प्रक्रियेची सुरवात अगदी भाषेपासून होते. युद्धभूमीवर ‘पुरुषार्थ’ गाजवणं, ‘मर्दुमकी’ किंवा ‘मर्दानगी’ दाखवणं यांसारख्या शब्दप्रयोगांपासूनच पुरुष आणि पुरुषार्थ हे सामर्थ्याचं प्रतीक आणि मर्दपणाच्या उलट असलेलं ‘बायकी’, ‘बायलेपण’ हे हीन दर्जाचं अशी वाटणी व्हायला सुरवात होते. आपण मर्दाचे बच्चे आहोत आणि आपला शत्रू बायल्या आहे, असं म्हणायला सर्वांनाच आवडतं; पण असं म्हणताना ‘बाईपण’ हे हलक्‍या दर्जाचं आहे, हेही आपण कळतनकळत सुचवतो, याचं भान आपल्याला रहात नाही. अर्थात, युद्धातील स्त्रीची वाताहत ही निव्वळ भाषिक पातळीवर सीमित रहात नाही, त्याला इतरही अनेक परिमाणं असल्याचं अभ्यासातून पुढे आलं आहे.

युद्धात आक्रमकता महत्त्वाची असल्याने ती वाढविण्यासाठी विविध युद्धांत योजलेल्या उपायांची माहिती अभ्यासकांनी गोळा केली. त्यात अनेक भयावह आणि विचित्र बाबी पुढे आल्या आहेत. आखाती युद्धात हल्ला करण्यासाठी पाठवलेले अमेरिकी सैनिक हल्ला करण्यासाठी आक्रमकता यावी म्हणून अश्‍लील चित्रं व सिनेमे बघत असल्याचे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. सर्बियन आक्रमतेचा पुरावा म्हणून बोस्नियामधील स्त्रियांवर त्यांनी केलेल्या बलात्काराचे व्हिडीओ दाखवले जात असल्याबद्दलही लिहिलं गेलं आहे. युद्धात शत्रूच्या गोटातील स्त्रियांवर हल्ला करणं, त्यांच्यावर बलात्कार करणं, त्यांची विटंबना करणं याची भयानक परंपरा तर फार जुनी आहे. त्याचबरोबर शत्रुपक्षातील पुरुषांची शारीरिक विटंबना करून त्यांना नपुंसक करणं, शत्रूच्या पुरुष सैनिकांवर बलात्कार करणं यांसारख्या बाबीही युद्धात घडल्याचं अभ्यासात पुढे आलं आहे. युद्धाच्या प्रक्रियेत ‘आमच्या स्त्रिया’ आणि ‘त्यांच्या स्त्रिया’ अशी वाटणी होत असल्याचंही पाहायला मिळतं. ‘आमच्या स्त्रिया, आमच्या माता-भगिनी या चारित्र्यवान, पतिव्रता, आदरणीय आहेत आणि त्यांच्या रक्षणासाठी आम्ही काहीही करू. त्यांना असा धडा शिकवू, की पुढच्या सात  पिढ्या ‘आमच्या’ आयाबहिणींकडे डोळे वर करून पाहणार नाहीत’ असं म्हणताना हा धडा त्यांच्या स्त्रियांच्या माध्यमातून शिकवला तरी त्यात फारसं गैर न मानण्याकडे कल असल्याचं दिसतं. रवांडामधील वांशिक बलात्कार हे त्याचं भयानक उदाहरण आहे. अशा उदाहरणांमधून युद्ध ही केवळ शस्त्रास्त्रं आणि लष्करी सामर्थ्याच्या जोरावर होत असलेली बाब नसून, त्यातून प्रचलित लैंगिक कल्पना दृढ करण्याचे, पराभूत सैन्याचा व समाजाचा लैंगिक छळ करण्याचेही प्रकार घडत असल्याचं स्पष्टपणे दिसतं. शिवाय, हे कोणत्या ठरावीक युद्धात किंवा कोणत्या एका ठरावीक देशाकडून घडलं आहे असं नाही, तर अशाप्रकारची उदाहरणं जगभरात विविध युद्धांत आढळल्याचं दिसतं. जीनिव्हा आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार; तसंच जीनिव्हा करारानुसार युद्धकाळातील बलात्कार हा गुन्हा होता. मात्र, युद्धकालीन भयावह गुन्ह्यांच्या यादीत त्यांचा समावेश अगदी आत्ताआत्तापर्यंत नव्हता. उपलब्ध कायद्याच्या आधारे हे गुन्हे आंतरराष्ट्रीय न्यायालयात सिद्ध करणं अवघड झाल्याचंही आढळून आलं आहे. २००८मध्ये स्त्रियांच्या अथक प्रयत्नांनंतर बलात्काराची ‘वॉर-क्राइम’ म्हणून गणना होऊ लागली आहे. युद्धातील सर्व प्रकारचे लैंगिक गुन्हे बंद व्हावेत, यासाठीही स्त्रिया प्रयत्नशील आहेत. अशा स्त्रियांची जागतिक परिषद २०१४मध्ये भरली होती. त्यांचे प्रयत्न आजही सुरू आहेत.

युद्धाच्या गोष्टी वाचताना आणि ऐकताना युद्धातील अशा भयानक बाबींचा आपल्याला सहज विसर पडतो. मात्र युद्ध कोणीही जिंकलं आणि कोणीही हरलं तरी काही कुटुंबं उद्‌ध्वस्त झालेलीच असतात, हे अनेक अभ्यासांतून पुढे आलं आहे. आपापलं शांत-स्थिर आयुष्य जगताना शिळोप्याच्या गप्पांत युद्ध झालंच पाहिजे, असं अनेक जण सहजपणे म्हणून जातात. मात्र, युद्धाची किंमत फार मोठी असते. ज्या देशांत सैन्यभरती अनिवार्य नाही, अशा देशांत तर सुखवस्तू घरातील मुला-मुलींचा लष्करात सैनिक म्हणून भरती होण्याकडे क्वचितच कल असतो. दुसऱ्याच्या जिवावर युद्धखोरीला बढावा देणं कितपत योग्य आहे, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.
युद्धात आपल्याला थरार जाणवतो. ऐकता ऐकता आपल्याही अंगात वीरश्री संचारते आणि मनातल्या मनात सैनिकाच्या जागी स्वतःला कल्पून आपण शत्रूचा पराभव केलेला असतो. रक्त, वाहत्या जखमा, तुटलेले अवयव, हाडामांसाचा चिखल हे शब्द वाचतानाही अंगावर येत असले किंवा मृत्यूविषयी एरवी आपण बोलायचं टाळत असलो, तरीही कल्पनेत शत्रूच्या शरीराच्या चिंध्याचिंध्या उडवायला आपण उत्सुक असतो. युद्धात ज्या भयानक वास्तवाला सामोरं जाणं भाग पडतं, त्याचा साक्षात अनुभव न घेतल्याने बरेचदा सर्वसामान्य माणसं युद्ध करण्याच्या भूमिकेचा उदोउदो करताना दिसतात. आपल्या विचारातील याच विसंगतीची जाणीव युद्धाविषयीच्या स्त्रीवादी अभ्यासातून होते. आंतरराष्ट्रीय समस्या सोडविण्याचा युद्ध हा एकमेव उपाय नाही. युद्ध कधीच अपरिहार्य नसतं असं म्हटलं जातं. ‘जागतिक महिलादिनी’ स्त्रियांचा गौरव करताना स्त्रियांच्या या दृष्टिकोनाचाही आदर करण्याची गरज आहे. त्यातूनच जागतिक शांतता वाढीला लागेल. खरी लढाई आजही स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठीची आहे आणि ती वैचारिक जागरणाद्वारेच जिंकता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prof chaitra redkar wirte war and women article in saptarang