बुद्धिमत्ता आणि शहाणपण

prof raja aakash
prof raja aakash

बुद्धिमत्तेबरोबरच आणखी काही क्षमता जीवनात आवश्‍यक असतात. उदाहरणार्थ स्वयंशिस्त, सहनशक्‍ती आणि  महत्त्वाकांक्षा. बुद्धिमत्तेबरोबरच या गोष्टी असतील तर आपण जीवनात यशस्वी होतो. केवळ बुद्धिमत्तेच्या आधारावर यशाची खात्री देता येत नाही. विद्यार्थिदशेत हुशार म्हणून गणली गेलेली मुलं मोठी झाल्यावर कुठली तरी साधी, कमी पगाराची नोकरी करताना दिसतात. दुसरीकडे ‘ढ’ म्हणून गणले गेलेले विद्यार्थी भविष्यात मोठ्या पदावर गेलेले आढळतात किंवा व्यवसायात यशस्वी होतात. त्यांच्याजवळ भरपूर मार्क मिळवण्याची बुद्धिमत्ता नव्हती; पण त्यापेक्षा वेगळं काहीतरी होतं, ज्यामुळे ते आयुष्यात यशस्वी झाले. बुद्धिमत्तेविषयी अभ्यास करणाऱ्या रॉबर्ट स्टेनबर्ग या शास्त्रज्ञाने याबाबत एक सुंदर उदाहरण दिलं आहे.

दोन मुलं जंगलात गेल्यानंतर हरवतात. पहिला मुलगा हुशार असतो, तर दुसरा मुलगा सामान्य असतो; पण अभ्यासाव्यतिरिक्‍त त्याच्याकडे इतर कलागुण, कॉमनसेन्स या गोष्टी चांगल्या असतात. जंगलातून वाट शोधताना अचानक त्यांच्यासमोर पिसाळलेलं अस्वल येतं. पहिला मुलगा पटकन विचार करतो की आपण कितीही जोरात धावलो तरी हे अस्वल आपल्याला काही सेकंदांत पकडून आपला फडशा पाडू शकतं. आपण कितीही प्रयत्न केले तरी वाचू शकत नाही. आपण मरणार या भीतीनं तो गर्भगळीत होतो; पण त्याचा मित्र शांतपणे आपल्या बॅगमधून स्पोर्टस शूज काढून पायात घालू लागतो. पहिला मुलगा त्याला म्हणतो, ‘तू मूर्ख आहेस का? आपण कितीही जोरात पळालो, तरी अस्वल आपल्याला काही सेकंदांत पकडणारच!’ दुसरा मुलगा उत्तर देतो, ‘मला कुठं अस्वलाशी शर्यत लावायची आहे? मला तुझ्यापेक्षा फास्ट पळायचं आहे.’

पहिल्या मुलानं समस्येच्या मुळात जाऊन अचूक गणिती उत्तर शोधून काढलं. पण ते त्याचा जीव वाचवू शकत नाही. मात्र, दुसऱ्या मुलानं अचानक आलेल्या समस्येचं नीट आकलन केलं व त्यातून वाचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, यासाठी कल्पकता वापरून पर्याय शोधला, जो त्याच्या जीवाचं रक्षण करणारा होता. भावना, बुद्धी आणि कल्पकता यांची सांगड दुसऱ्या मुलाला अधिक चांगली घालता आली. ही क्षमता माणसाला पुस्तकी अभ्यासातून मिळत नाही, तर आपण व्यवहारात जसं वागतो, त्यातून मिळते. आपण किती समरसून जगतो, किती समर्थपणे आपल्या भावना व्यक्‍त करतो, इतरांशी कसं जुळवून घेतो, कसं वागतो, येणाऱ्या संकटांना कसं सामोरे जातो, नवीन संकटं स्वत:वर ओढवून घेण्याची प्रवृत्ती यातून हे शहाणपण येत असतं. बुद्धी महत्त्वाची आहेच, पण हे शहाणपणही आवश्‍यक आहे, तरच आपण जीवनात यशस्वी होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com