स्वावलंबन

प्रा. राजा आकाश
गुरुवार, 14 मार्च 2019

यशस्वी माणूस स्वत:च्या प्रगतीसाठी इतरांवर कधीच अवलंबून राहात नाही. तो केवळ स्वत:च्या साधनांवर आणि स्वत:च्या क्षमतांवर विश्‍वास ठेवत असतो. अनेक विद्यार्थ्याची तक्रार असते, की सर शाळेत नीट शिकवतच नाहीत. आमचे अभ्यासक्रम पूर्ण करून दिले नाहीत. पुस्तकातील भाषा खूपच कठीण आहे. घरी अभ्यासाला जागाच नाही, मला वडिलांनी गाईड्‌स घेऊन दिल्या नाहीत, पेपर ‘आऊट ऑफ सिलॅबस’ होता, पेपर नीट तपासलेच नाहीत, आमच्या क्षमतेच्या मानाने कोर्स खूप कठीण आहे, अशी असंख्य कारणे अनेक विद्यार्थी सतत सांगत असतात. स्वत:च्या अपयशाचं कारण सतत इतरांवर ढकलत राहतात आणि आयुष्यभर अशीच मनोवृत्ती घेऊन जगतात.

यशस्वी माणूस स्वत:च्या प्रगतीसाठी इतरांवर कधीच अवलंबून राहात नाही. तो केवळ स्वत:च्या साधनांवर आणि स्वत:च्या क्षमतांवर विश्‍वास ठेवत असतो. अनेक विद्यार्थ्याची तक्रार असते, की सर शाळेत नीट शिकवतच नाहीत. आमचे अभ्यासक्रम पूर्ण करून दिले नाहीत. पुस्तकातील भाषा खूपच कठीण आहे. घरी अभ्यासाला जागाच नाही, मला वडिलांनी गाईड्‌स घेऊन दिल्या नाहीत, पेपर ‘आऊट ऑफ सिलॅबस’ होता, पेपर नीट तपासलेच नाहीत, आमच्या क्षमतेच्या मानाने कोर्स खूप कठीण आहे, अशी असंख्य कारणे अनेक विद्यार्थी सतत सांगत असतात. स्वत:च्या अपयशाचं कारण सतत इतरांवर ढकलत राहतात आणि आयुष्यभर अशीच मनोवृत्ती घेऊन जगतात. प्रत्येक गोष्टीसाठी हे विद्यार्थी दुसऱ्यावर अवलंवून आहेत. इतरांचं सहकार्य जर मिळालं, तरच मी यशस्वी होईल, अन्यथा नाही, अशी मनोवृत्ती बाळगणारे लोक आयुष्यभर परावलंबी राहतात आणि एक क्षण असा येतो, की तेव्हा इतर कुणीच मदत करू शकत नाही. हे लोक नैराश्‍यात, हीनत्वाच्या भावनेत खितपत पडतात. आज महाराष्ट्रात असंख्य युवक असे आहेत, की ज्यांना स्वत:ची नोकरी मिळवता येत नाही. स्वत:चा व्यवसाय करता येत नाही. त्याचा सतत इतरांना प्रश्‍न असतो, की ‘काय करू?’ प्रत्येक जण त्यांना निरनिराळे सल्ले देतात; पण परावलंबी माणूस सल्ला देणाऱ्याच्याच गळ्यात पडतो आणि मग सल्ला देणारे पळ काढतात. हा परावलंबी युवक मग दुसऱ्या सल्लागाराचा शोध घ्यायला लागतो. परावलंबी लोकांना स्वत:चं मत नसतं. ते बिनबुडाच्या लोट्यासारखे असतात. जिकडे ढकललं तिकडे कलंडले.

बऱ्याचदा वर्तमानपत्रातून बातम्या वाचायला मिळतात, की नोकरीचे आमिष दाखवून अनेक युवकांना लाखो रुपयांचा गंडा घातला. यात बळी पडणारे हेच परावलंबी युवक असतात. ‘आम्हाला नोकऱ्याच मिळत नाहीत’ म्हणून युवक ओरडतात आणि दुसरीकडे ‘आम्हाला चांगली माणसंच मिळत नाहीत’ म्हणून नोकऱ्या देणारे खंत व्यक्‍त करतात. यात दोष परावलंबी मनोवृत्तीचा आहे.

स्वावलंबी माणसांना मात्र वरची एकही समस्या भेडसावत नाही. प्रत्येक गोष्ट तो स्वत:च्या सामर्थ्यावर करतो. स्वत:ची स्वतंत्र साधने स्वत: निर्माण करतो. अपयश आलचं, तर त्याची जबाबदारी स्वीकारतो. स्वत:च्या अपयशाचं परखड मूल्यमापन करतो. त्यावर चिंतन करतो. स्वत:च्या चुकांमधून त्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. पुन्हा नव्या जोमाने स्वत:च्या अपयशावर मात करण्यासाठी तो तयार होतो. यश स्वत:कडे खेचून आणतो. गरज पडली, तर इतरांचा सल्ला तो मागतो; पण तो स्वीकायचा की नाही, हे ठरवण्याचा अंतिम निर्णय त्याचा स्वत:चा असतो. तो थांबून राहात नाही. तो परिश्रम करतो. सतत कार्यरत राहतो. त्याचा त्याच्या क्षमतांवर, साधनांवर आणि स्वत:वर दृढ विश्‍वास असतो. आपण स्वावलंबी झालो, तर आपला आत्मविश्‍वास वाढतो. स्वावलंबन, प्रचंड आत्मविश्‍वास आणि सुनियोजित परिश्रम, हे यशस्वी माणसाच्या यशाचं एक महत्त्वाचं रहस्य.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prof raja aakash wirte pahatpawal aricle in editorial