मैत्रीतून घडते व्यक्‍तिमत्त्व

प्रा. राजा आकाश
गुरुवार, 4 एप्रिल 2019

तुम्ही निराश आहात, दु:खी आहात. या नैराश्‍याचं कारण खासगी आहे. घरात वावरताना तुमचा चेहरा, देहबोली पाहून घरच्यांना कळतं, की तुमचं काहीतरी बिनसलं आहे. ते तुम्हाला खोदून-खोदून विचारतात, ‘काय झालं ?’ पण तुम्ही खरं कारण सांगू शकत नाही. कारण तुम्हाला वाटते, की घरचे लोक तुम्हाला समजून घेणार नाहीत. मग तुम्ही मित्राकडे किंवा मुलगी असेल, तर ती मैत्रिणीकडे जाते. तुमच्याकडे पाहिल्यावर तिला किंवा त्याला कळतं की तुम्हाला काहीतरी झालंय. तो विचारतो,

 ‘‘काय झालं?’’ आणि तुम्ही आढेवढे न घेता काय झालं, ते पटकन सांगून टाकता. कारण तुम्हाला असं वाटत असतं, की तो मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला खूप चांगलं समजून घेऊ शकते. असे मित्र असलेच पाहिजेत. कारण या मैत्रीतून आपलं व्यक्‍तिमत्त्व घडत असतं, त्याला आकार मिळतो.

तुमच्या भोवताली खूप लोक असतात, पण प्रत्येकाशीच तुमची मैत्री होत नाही. त्यातले निवडकच तुमचे जिवाभावाचे मित्र होतात. एवढं मात्र खरं की मैत्र जुळत जातं. सहवासानं मैत्री आणखी गडद होत जाते. एकमेकांवरचा विश्‍वास वाढत जातो. एकमेकांचा आधार वाटायला लागतो व आपल्याला अधिक सुरक्षित वाटू लागतं. मनातली खासगी गुपितं आपण जवळच्या मित्रांशीच शेअर करतो, इतकं ते जवळचं नातं असतं.

मित्र चांगले असतील, तर आपलं व्यक्‍तिमत्त्व समृद्ध होतं. आपण नेमके कसे आहोत, आपला स्वभाव कसा आहे. आपण वागतो- बोलतो कसे, हे आपल्याला मित्रांकडून अधिक चांगलं कळतं. आपलं ‘सेल्फ असेसमेंट’ मित्रांच्या समूहात चांगलं होत असतं. त्यातून आपल्या व्यक्‍तिमत्त्वाला चांगला आकार मिळतो. ‘असं करू नको, हे चुकीचं आहे,’ हे घरच्या कुणी सांगितलं, तर आपण ऐकणार नाही, पण हेच जवळच्या मित्रानं सांगितलं, तर आपण पटकन ते स्वीकारतो. आपल्या स्वभावाचं मूल्यमापन मित्रांकडून होतं. त्यातून आपण अधिक चांगलं वागायला शिकतो. चुकीच्या वागण्याबद्दल मित्र टीका करतात, पण ते आपल्याला मदतही करतात. मित्रांकडून मिळणारा हा फीडबॅक आपल्या विकासासाठी महत्त्वाचा असतो.

तुम्ही रेल्वेने प्रवास करीत आहात. दोन-तीन गुंड डब्यात चढतात आणि गाडीतील लोकांना त्रास द्यायला लागतात. सर्व प्रवासी हतबल होऊन बघण्यापलीकडे काहीच करू शकत नाहीत. तुम्ही एकटे असाल, तर तुम्हीदेखील हतबल व्हाल. पण तुमचा पाच-सहा मित्रांचा गट गाडीत असेल तर? तुम्ही सर्व मिळून गुंडांचा प्रतिकार करून त्यांना पिटाळून लावाल, इतकी ताकद तुमच्यात असेल. मित्रांच्या गटात आपलं सामर्थ्य वाढत असतं, आपल्याला सुरक्षितता मिळत असते. तेव्हा खऱ्या मैत्रीच्या नात्याची विण अधिक घट्ट करा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prof raja aakash wirte pahatpawal aricle in editorial