नेतृत्व असं आणि तसं...

prof raja aakash
prof raja aakash

‘मू र्ख आहात तुम्ही. तुम्हाला पदवी कुणी दिली?’ ‘लायकी तरी आहे का तुमची नोकरी करण्याची,’  ‘सांगतो तेवढं करा. स्वतःची अक्कल पाजळू नका.’ ‘मला शहाणपणा शिकवू नका.’ ‘यांच्यावर वचक ठेवला नाही, तर एकही जण काम करणार नाही.’ ‘यांच्याकडून काम करून घेणं म्हणजे वैताग आहे नुसता.’... काही नेतृत्व असं असतं. आपल्या सहकाऱ्यांशी, कर्मचाऱ्यांशी वागताना ते अशी भाषा वापरतात. ‘मलाच सगळं कळतं, मीच महान,’ असा त्यांना अहंकार असतो. ते कुणावरच विश्‍वास ठेवत नाहीत. प्रत्येक गोष्टीत स्वतः लक्ष घालतात. वेगळा दृष्टिकोन, वेगळा विचार खपवून घेत नाहीत,’ मलाच सगळं कळतं आणि तेच बरोबर आहे,’ हा त्यांचा हेका असतो. इतरांना ते अपमानास्पद वागणूक देतात. कुटुंबात वागतानाही त्यांचा पवित्रा बऱ्याचदा असाच असतो. अशा लोकांच्या हाताखाली चांगली माणसं टिकत नाहीत. दुसरा चांगला पर्याय शोधतात. पण ज्यांना बाहेर काम मिळणं शक्‍य नाही किंवा इतर कुठल्या कारणानं नोकरी सोडणं शक्‍य नाही, त्यांचं काय? ती माणसं स्वतःचा स्वतंत्र विचार करणं बंद करतात. आपलं मत मांडत नाहीत. जितकं सांगितलं तितकंच करतात. वरिष्ठ नसताना एखादी समस्या निर्माण झाली, तर बसून राहतात. आपण काही करायला गेलो आणि ते आल्यावर भडकले, तर त्यापेक्षा काहीच करणं नको, असा ते विचार करतात. अशा ठिकाणी कडक शिस्त असते; पण काम पुढे जात नाही. ती संस्था फारशी प्रगती करत नाही.

काही वरिष्ठ वेगळे असतात. ते सर्वांना सोबत घेऊन चालतात. आपल्या सहकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी टाकून, त्यांना कामाचं स्वातंत्र्य देतात. त्यांचा वेगळा विचार, वेगळा दृष्टिकोन ऐकून घेतात, त्यांना प्रोत्साहित करतात. त्यांच्या चुका झाल्या, तर सुधारण्याची संधी देतात. संस्थेबद्दल, कामाबद्दल सहकाऱ्यांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करतात. इतरांचा आत्मविश्‍वास वाढवतात. त्यांचा इतरांच्या चांगुलपणावर, बुद्धिमत्तेवर, क्षमतांवर विश्‍वास असतो. ते इतरांमधील गुण, कौशल्य ओळखून त्यांना संधी देतात. आपल्या वागण्यातून, कामातून ते सहकाऱ्यांसमोर आदर्श निर्माण करतात. इतर लोक त्यांचं अनुकरण करतात. त्यांच्याकडे हुजरेगिरी करणाऱ्यांना थारा नसतो. त्यांच्या नेतृत्वाखाली सहकाऱ्यांची व भावी नेतृत्वाची सक्षम फळी तयार होते. ते केवळ वरिष्ठ नसतात, तर एक कुटुंबप्रमुख म्हणून सर्वांशी वागतात. त्यातून संस्थेत सर्वांमध्ये एक भावनिक ओलावा निर्माण होतो. अशा संस्था, संघटना उत्तरोत्तर प्रगती करतात. आपल्या प्रत्येकामध्ये एक कार्यकर्ता दडलेला आहे. त्यातूनच नेता घडत असतो. हे नेतृत्व नोकरीतलं असेल, व्यवसायातलं असेल किंवा संघटनेतलं असेल, पण स्वतःला कसा नेता घडवायचं हे आपल्याच हाती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com