प्रेरणेतून जिंकण्याची जिद्द

prof raja aakash
prof raja aakash

जॉईसी ब्रदर्स ही मानसशास्त्राची प्राध्यापक, मूल लहान आहे व कुटुंबाला जास्त वेळ देणं गरजेचं आहे यासाठी नोकरी सोडते. अचानक तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. नवऱ्याला मेडिकलचं शिक्षण अर्धवट सोडावं लागू नये व कुटुंबाचा खर्चदेखील नीट चालावा यासाठी पैसे मिळवणं तिला अत्यावश्‍यक ठरतं. पण प्राध्यापकाची नोकरी केल्यास फार वेळ जाईल, मुलाला दुसरीकडे सांभाळायला ठेवलं, तर त्याचेही हाल होतील व पुरेसा पैसाही मिळणार नाही म्हणून हा पर्याय बाद होतो. चटकन भरपूर पैसे मिळवण्यासाठी काय करावं, या प्रश्‍नाचा भुंगा मनात फिरत असताना अचानक जॉईसीला टीव्हीवर ‘६४ हजार डॉलरचा प्रश्‍न’ या प्रश्‍नमंजूषेच्या कार्यक्रमाची जाहिरात दिसते. त्या स्पर्धेत कुठल्याही ठरवलेल्या विषयातील सर्व प्रश्‍नांची अचूक उत्तरं दिली, तर विजेत्याला ६४ हजार डॉलरचं बक्षीस मिळणार असतं. आपल्या इथल्या ‘कौन बनेगा करोडपती’सारखं. दरवर्षी ही स्पर्धा होते, पण या कार्यक्रमाची ख्याती अशी, की क्वचितच एखादा अंतिम टप्प्यापर्यंत पोचतो. तीन-चार वर्षांतून एखादीच व्यक्‍ती या स्पर्धेत विजयी होते. ज्याची स्मरणशक्‍ती दांडगी असेल त्यालाच हे शक्‍य होतं.

जॉईसी हे आव्हान स्वीकारते. ज्या विषयामध्ये तिला फारसं ज्ञान नाही, असा केवळ पुरुषांसाठी असलेला बॉक्‍सिंग हा विषय केवळ नवऱ्याच्या आवडीचा आहे म्हणून ती निवडते. सहा महिन्यांच्या काळात बॉक्‍सिंगविषयी ज्ञान मिळवून ६४ हजार डॉलरचं बक्षीस जिंकते. बॉक्‍सिंग या खेळाच्या दीडशे वर्षांत घडलेल्या लहानसहान घटनांपासून सर्व माहिती आत्मसात करण्यासाठी तिला स्मरणशक्‍ती तंत्राची मदत झाली. अन्यथा तिच्यासारख्या प्राध्यापिकेला बाळाला सांभाळून व कुटुंबाकडे दुर्लक्ष न होऊ देता मिळालेल्या अल्प वेळात हे शक्‍य झालं नसतं, असं जॉईसी ‘टेन डेज टू अ सक्‍सेफुल मेमरी’ या पुस्तकात म्हणते. ‘मला ६४ हजार डॉलर मिळवायचे आहेत, या ध्येयानं मी वेडी झाले होते, म्हणून मी यशस्वी होऊ शकले. इतक्‍या तीव्र स्वरूपाची प्रेरणा ज्या व्यक्‍तीमध्येआहे, अशी कुठलीही व्यक्‍ती आपल्या स्मरणशक्‍तीचा पुरेपूर वापर करून ध्येय गाठू शकते,’ असं जॉईसीचं मत आहे. गरीब घरातली अनेक मुलं-मुली फारशा सुविधा नसतानाही स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवतात त्याचं कारण हेच. स्मरणशक्‍ती वाढविण्याच्या प्रक्रियेतील पहिलं पाऊल म्हणजं ध्येय ठरवणे. ते ध्येय गाठल्यामुळे काय फायदे होणार आहेत, त्यासाठी किती परिश्रम करावे लागतील, हे ध्येय ठरवण्याचं कारण काय, इत्यादी गोष्टी कागदावर लिहून काढा. त्याचा कृती आराखडा बनवा आणि त्या अनुषंगाने प्रामाणिकपणे प्रयत्न करा. कारण आपल्या मनातील प्रेरणेच्या प्रमाणात आपली स्मरणशक्‍ती वाढत असते. हा स्मरणशक्‍ती विकासातील एक महत्त्वाचा नियम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com