'हवे युगानुकूल मानसशास्र'

health brain
health brain

बदललेल्या काळाने मानसशास्रापुढे काही वेगळी, नवीन आव्हाने उभी केली आहेत. ज्यांची उत्तरे देण्यासाठी मानसशास्राला आपले सिद्धांत, आपले दृष्टिकोन यांचा पुनर्विचार करावा लागणार आहे, युगानुकूल व्हावे लागणार आहे. आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. अगदी मूलभूत संशोधनासाठी लागणाऱ्या उपकरणांपासून ते रस्ते, पूल इ.च्या बांधकामासाठीच्या यंत्रांपर्यंत, खाद्यपदार्थांच्या घाऊक उत्पादनापासून ते टाइमपास गप्पांसाठीच्या मोबाईलपर्यंत उपकरणांची एक प्रचंड फौज मानवाच्या दिमतीला सज्ज आहे. तिची उपयुक्तता उघडच आहे. परंतु विशेषतः दूरसंवादासाठी उपयोगी पडणारी साधने मात्र जवळच्यांनाच "दूर' करू लागली आहेत.

तंत्रज्ञानाच्या नव्हे, तर त्यावर आधारित साधनांच्या विळख्यात अडकून आमचे नातेसंबंध, आमचे सगळीकडचे आंतरव्यक्तिक संबंध, एकतर झाडाच्या शुष्क काडीसारखे सहजपणे तुटू लागले आहेत किंवा मग केवळ दिखाऊ, आभासी तरी होत आहेत. नात्यांचा जणू "श्‍वास' मानला जाणारा "संवाद' खूप कमी झाला असून, जो काही घडतो आहे तो काही फारसा सुखद नसतो. एकत्र कुटुंबे विभक्त झाली, याला व्यवसाय भिन्नता हे मुख्य कारण ठरले. परंतु विभक्त कुटुंबाच्या भग्नतेकडे इतक्‍या वेगाने प्रवास का होतो आहे? मानसशास्त्राने मूलभूत मानलेल्या सुरक्षितता, प्रेम, सहवास या गरजांवर माझी स्वतंत्र ओळख, अधिकार, मान्यता यांना जास्त महत्त्व आपण का बरे देत आहोत? हीच "स्व'केंद्रितता आम्हाला कुठे घेऊन जाणार आहे? मूळचा तत्त्वज्ञानातला आणि मानसशास्त्रातही बऱ्यापैकी रुजलेला अस्तित्ववादी दृष्टिकोन (existencialism) सांगतो, की मानव समाजाचा प्रवास वाढत्या दुरीकरणाकडे (alienation) सुरू आहे. आधी आपण एकमेकांपासून दूर जातो आहोत. परंतु सर्वांत गंभीर परिणाम म्हणजे स्वतःपासून दूर जाणे! वाढत्या आत्महत्या, व्यसनाधिनता, जिवलगाला मारून मग स्वतःलाही संपविण्यातली आक्रमकता, अशी विविधांगी वैफल्यसूचकता म्हणजे एक प्रकारे "स्व'पासूनच दूर जाणे नाही का? आमचे विविध मानसशास्त्रीय सिद्धांत व त्यावर आधारित विचारतंत्रे अशा घटना घडल्यावर संबंधितांना त्या गर्तेमधून बाहेर यायला मदत जरूर करतात. परंतु प्रतिबंधात्मक उपायांकडे खूपच दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी आपल्याला वैचारिक आणि व्यावसायिक अभिनिवेश बाजूल सारून मानसतज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञ (psychiatrists) वैद्यकतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ अशांनी एकत्र येऊन व्यापक स्वरूपाचे उपक्रम हाती घ्यायला हवेत.

कोणतेही शास्त्र त्याच्या अभ्यास विषयांच्या संदर्भात तीन मूलभूत प्रश्‍नांची उत्तरे शोधीत असते, ""का, काय, आणि कसे.'' मानवी मनोव्यापारांचा अभ्यास करताना मानसशास्त्रही तेच करीत असते. वर्षानुवर्षे ध्येयप्राप्तीसाठी झोकून देऊन प्रयत्न करणारा संशोधक, राजकारणी, व्यावसायिक, समाजकारणी, खेळाडू, कलाकार अथवा अध्यात्म मार्गावरील साधक जे वर्तन करीत असतो, ते तो का करत असतो, इथपासून ते साध्या घटक चाचणीत नापास झाल्यामुळे थेट आत्महत्या करणारा विद्यार्थीदेखील ते का करतो, अशा "का' चे नेमके उत्तर शोधण्यासाठी आधी "काय' (नेमके काय केले) आणि "कसे' (कोणत्या पद्धतीने केले) या संबंधी बारकाव्यानिशी माहिती मिळवावी लागते. जिच्या आधारे "का'चे खरे उत्तर शोधण्याची दिशा ठरवता येते.

गेल्या दीडशे वर्षांच्या आपल्या या शोधयात्रेत मानवी मनोव्यापारांचा उलगडा, वैज्ञानिक पद्धतीने करण्याचा खूपसा यशस्वी प्रयत्न मानशास्त्राने केला आहे. यासाठी इतर अनेक शास्त्रांची त्याला भरघोस मदत झाली आहे. अभ्यासपद्धती विकसित करताना पदार्थविज्ञान; वर्तनाचा तपशील जाणून घेण्यासाठी शरीरशास्त्र; जैव रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र, तर "का'ची उत्तरे शोधताना अनुवंशशास्त्राबरोबरचे समाजशास्त्र आणि अर्थशास्त्राचीही मदत झाली आहे. परंतु ही सगळी मदत घेऊनही अंतिम उत्तरासाठी स्वतःच्या सर्जनशक्तीच्या आणि चिकित्सक विचारशक्तीच्या आधारे सिद्धांत मांडावे लागतात. जे अत्यंत प्रभावीरीत्या मानसशास्त्राने केले आहे. म्हणूनच तर विविध मनोविकारांवरील उपचाराबाबत, बालकांच्या वाढीच्या शिक्षणच्या आणि पालकांच्या पालकत्वाच्या समस्यांसाठी, युवकांच्या करिअरबाबतच्या, प्रौढांच्या कौटुंबिक नात्याच्या नि व्यवसायासंदर्भातल्या; तर वृद्धांच्या "अखेरच्या दिवसांतील' समस्यांबाबत मानसशास्त्राने आपली उपयुक्तता निश्‍चितपणे सिद्ध केली आहे, ज्याला सारे जग आज मान्यता देते आहे.


हेच युगानुकूल होणे ठरेल. परंतु यासाठी या सर्व तज्ज्ञांना एकत्र बांधणारा वैचारिक दृष्टिकोन हवा. आजचे एक जगन्मान्य अणूवैज्ञानिक फ्रिट्‌यॉफ काप्रा यांनी त्यांच्या "टर्निग पॉइंट' या प्रसिद्ध ग्रंथात विस्ताराने मांडलेला "प्रणाली दृष्टिकोन' (systems approach) हे कार्य करू शकेल असे वाटते. स्थूल आणि सूक्ष्म, प्राणी व निसर्ग, तसेच स्त्री आणि पुरुष या सर्व बाह्यतः स्वतंत्र, परंतु सूक्ष्म पातळीवर एकमेकांशी अभिन्नरीत्या जोडलेल्या सजीव प्रणाली आहेत, असे हा दृष्टिकोन सांगतो. त्याच्या आधारे सांगायचे झाल्यास सर्व स्त्रिया आणि पुरुष हे स्थूल पातळीवर एका मर्यादित अर्थानेच स्वतंत्र व समान आहेत. निसर्गतः आणि सूक्ष्म पातळीवर मात्र त्या "परस्परपूरक' प्रणाली आहेत. दैनंदिन जीवनातील वर्तनाच्या, आचरणाच्या पातळीवर या चिरंतन विचारांची जाण कशी जोपासावी, सशक्त करावी, हे उलगडून सांगणारे मानसशास्त्र आजच्या युगाला हवे आहे. त्यामधून का, काय व कसे या तिन्ही वर्तन प्रश्‍नांची सम्यक उत्तरे मिळू शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com