कुशल प्रशासक (श्रद्धांजली)

मृणालिनी नानिवडेकर
सोमवार, 17 डिसेंबर 2018

सरकारे येतात, जातात. निवडणूक काळात जनमत ज्या पक्षाकडे झुकते तो जिंकतो, उरलेले गुमान विरोधी बाकांवर जाऊन बसतात. शिवाशिवीच्या अशा खेळात कायम असते ती प्रशासनाची पोलादी चौकट. न दिसणारी; पण कारभाराचा डोलारा वाहून नेणारी. प्रशासक उत्तम असले, तरच गवसते प्रगतीची संधी. काळाच्या पडद्याआड गेलेले अरुण बोंगीरवार अशाच उत्तम प्रशासकांपैकी एक होते. ज्या काळात डॉक्‍टर-इंजिनिअर होण्यात कृतार्थता मानली जात असे, त्या वेळी त्यांनी सनदी सेवेचे क्षेत्र पत्करले. यवतमाळ जिल्ह्यातील मूळ असणारे बोंगीरवार यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या प्रत्येक नियुक्तीला न्याय दिला.

पुणे महापालिकेचे आयुक्‍त असताना त्यांनी पर्वती परिसरात राबवलेली झोपडपटटी पुनर्निर्माण योजना विस्थापितांना जागा देत विकासाचे नवे दालन खुले करणारी ठरली. नंतर तशी योजना प्रत्यक्षात आणणे हा जणू परिपाठ बनला. राज्यातील वेगवेगळ्या विभागांचे आयुक्‍तपद सांभाळल्यानंतर बोंगीरवारांच्या कर्तृत्वाला खरे धुमारे फुटले ते स्व. सुधाकरराव नाईक यांच्यासमवेत जलसंधारणाच्या योजना राबवताना. पर्जन्यछायेत येणाऱ्या महाराष्ट्राचा बहुतांश भाग पाणी साठवले तर जलयुक्‍त होईल, हे स्वप्न नाईकांनी बघितले; अन्‌ ते प्रत्यक्षात आणण्यासाठी नव्याने तयार झालेल्या खात्याचे प्रमुखपद बोंगीरवारांकडे सोपवले. त्यांनी त्यात केलेले परिश्रम उठून दिसले. त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली, त्यामागे त्यांची ही कामगिरी प्रामुख्याने विचारात घेतली गेली असणार. कॉंग्रेसच्या पराभवानंतर सत्तेत आलेल्या शिवसेना-भाजप युती सरकारनेही बोंगीरवारांकडे राज्याच्या प्रशासनाच्या प्रमुखपदाची जबाबदारी कायम ठेवली, ही घटना बोंगीरवारांच्या प्रशासक म्हणून असलेल्या कौशल्याबद्दल बरेच काही सांगून जाते.

सत्ताबदलानंतर प्रशासनाचा चेहरा तोच राहणे क्‍वचित घडते. बोंगीरवारांच्या यशाचे रहस्य काय, असे विचारले तर सनदी अधिकारी सांगत : ते ज्येष्ठांना मान देतात, अन्‌ कनिष्ठांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतात, वेळप्रसंगी सांभाळून घेतात. बोंगीरवारांच्या याच गुणामुळे अखेरपर्यंत मंत्रालयालगतच्या त्यांच्या निवासस्थानी अधिकारी मार्गदर्शन घेण्यासाठी येत. महाराष्ट्रातील नेतेमंडळीही संपर्कात असतच. प्रकृतीने गेले काही महिने त्यांना अस्वस्थ केले होते; पण ते तरीही सार्वजनिक जीवनात सक्रिय होते.

निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेतर्फे व्याख्याने आयोजित करणे अखेरपर्यंत सुरू होते. गेल्या वर्षी मोदी सरकारमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना बोंगीरवारांनी मुंबईत भाषणासाठी आमंत्रित केले होते. सत्तेच्या आणि प्रशासनाच्या दालनात मोठी भूमिका बजावणारे व्यक्‍तित्व त्यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेले आहे. 

Web Title: Pune Edition Article Arun Bongirwar