डॉक्‍टर-रुग्ण संवादाचे तथ्य आणि पथ्य (अतिथी संपादकीय)

डॉक्‍टर-रुग्ण संवादाचे तथ्य आणि पथ्य (अतिथी संपादकीय)

नातेसंबंध हा आम्हा भारतीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आपल्याकडे फक्त अंकल, अंटीमधे नाती संपत नाहीत, तर काका, मामा, मावशी, आत्या चुलत, मावस, सावत्र इत्यादी अनेक पदर प्रसिद्ध आहेत! याचे कारण अर्थातच एकत्र कुटुंबपद्धती. परंतु, आता काळाच्या ओघात ही नाती फिकट होत चालली आहेत. ही सर्व नाती जैविक आहेत. याशिवाय गुरू-शिष्य हे एक महत्त्वाचे भावनिक नाते आपल्या संस्कृतीत आहे. विशेषतः संगीत, नृत्य, चित्रशिल्पकला इ. कलाक्षेत्रात. आजच्या आधुनिक युगात डॉक्‍टर-रुग्ण हे असेच एक महत्त्वाचे भावनिक नाते आहे.

इतिहासकाळात आपल्याकडे फक्त राजवैद्य असत! सामान्यांना आजीबाईच्या बटव्यावर समाधान मानावे लागे. इंग्रजी अमलात अठराशे पन्नासनंतर जे. जे. हॉस्पिटलची स्थापना झाली व आधुनिक वैद्यकाचा पाया घातला गेला. विसाव्या शतकात साठच्या दशकापर्यंत "फॅमिली डॉक्‍टर' ही संकल्पना चांगलीच रूढ झाली होती. या मंडळींचे रुग्णांशी अत्यंत जिव्हाळ्याचे, सलोख्याचे संबंध असत! मात्र, गेल्या काही वर्षांत याला तडा गेला. 

कारणे अनेक आहेत. या डॉक्‍टर रुग्ण संबंधाचे विविध प्रकार कल्पिता येतील. 1) डॉक्‍टर एक पालक, तर रुग्ण एक बालक. पालक लाडही करतात. बालकाचे व प्रसंगी त्याला धाकही घालतात. 2) डॉक्‍टर लुटारू व रुग्णही लबाड. दोघे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. 3) डॉक्‍टर नोकर तर रुग्ण मालक. 4) डॉक्‍टर एक व्यावसायिक, तर रुग्ण एक निर्णयक्षमता असणारी प्रगल्भ व्यक्ती! 

चौथा प्रकार हा आदर्श आहे. मात्र, वर म्हटल्याप्रमाणे या नातेसंबंधाला ग्रहण लागले आहे. एकीकडे आधुनिक वैद्यकाच्या प्रचंड प्रगतीमुळे मानवाचे आयुर्मान वाढले आहे व रुग्णांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. आर्थिक प्रगती व इतर घटकांमुळे सहनशक्ती कमी झाली आहे. ग्राहकसंरक्षण कायदा आल्यामुळे हे संबंध आणखी खालावले व डॉक्‍टरांना मारहाण, रुग्णालयांची तोडफोड व नासधूस हे नित्याचे प्रकार होऊ लागले.

मात्र, हे काही बरोबर नाही, असे वाटणारे डॉक्‍टर व समविचारी रुग्ण, तसेच या दोनही घटकांच्या संस्था यांच्यात विचारमंथन होऊन व यावर विविध पातळ्यांवर काही काळ चर्चा होऊन पुणे शहरात डॉक्‍टर संजय गुप्ते या प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञाच्या पुढाकाराने व अस्मिता मूव्हमेंट- पुणे, नागरिक व डॉक्‍टर फोरम, तसेच core india institute of legal medicine यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्‍टर-रुग्ण सहप्रवासाचे पहिलं पाऊल टाकलं गेलं! 

काय आहे या मंडळींचं नेमकं म्हणणं? तर, या दोन घटकांतील सुसंवाद वाढावा म्हणून एक चेकलिस्ट बनविली गेली आहे. ही चेकलिस्ट रुग्ण व डॉक्‍टर दोघांना उपयुक्त आहे. रुग्णांना डॉक्‍टरांना सांगायच्या गोष्टींची यादी. 1) त्रास काय व कधीपासून आहे  2) आजारपणांचा पूर्वेतिहास.(मधुमेह, उच्चरक्तदाब इ.) 3) घेत असलेली औषधे व औषधांची ऍलर्जी. 

रुग्णांचे आजारासंबंधी विचारायचे प्रश्न 

1) दुखण्याचे निदान? 2)उपचारांची दिशा? 3) काय सुधारणा अपेक्षित आहे? 4) शस्त्रक्रिया आवश्‍यकच आहे का? 
घरातून निघतांना हे लक्षात ठेवावे. 1) सर्व रिपोर्टस, औषधे व प्रिस्क्रिप्शन 2) बिलाची तरतूद (आरोग्य विमा) 
तसेच शस्त्रक्रियेसंबंधी तसेच भूल ( Anaesthesia) व इतर उपचारांची माहिती घेणे आवश्‍यक आहे. 

रुग्णालयातून घरी निघतांना काही गोष्टी खुलासेवार समजून घ्याव्यात. अर्थात, रुग्णांच्या बरोबरीने किंवा काकणभर अधिकच डॉक्‍टरांच्या जबाबदाऱ्या आहेत. 

सर्व प्रथम रुग्णाशी योग्य व पुरेसा वेळ संवाद. यात रुग्णांच्या आजाराचे स्वरूप, प्रस्तावीत उपचार, या उपचारांचा हेतू; पर्यायी उपचारांबाबत रुग्णांशी चर्चा, उपचारांची, शस्त्रक्रियेची इत्थंभूत माहिती, या उपचारांचे फायदे व तोटे, उपचारांचा अंदाजे खर्च, रुग्णाने रुग्णालयातून घरी गेल्यावर घ्यायची काळजी इत्यादी. रुग्णाला "सेकंड ओपिनियन' घ्यायचे आहे का, हेदेखील विचारावे. 

आजचे जग हे माहितीच्या अधिकाराचे आहे. चाचण्यांवर फार भर दिला जातो, अशी रुग्णांची तक्रार. खरे तर पूर्वी ऍलोपॅथी पद्धतीने चिकित्सा व्हायची. आता एकविसाव्या शतकात पुराव्याधारित शास्त्र अमलात येते. रुग्णाला काय झाले आहे हे पाहून, चाचणीतून शोधून काढून मग उपाययोजना केली जाते. रुग्णांना हा बदल समजावून, लक्षात आणून दिला, तर गैरसमज दूर होतात. संवाद वाढतो. दोन्हींकडून संवादाची, मोकळ्या चर्चेची पथ्ये पाळल्यास डॉक्‍टर रुग्णांच्या नात्याची रंगत शास्त्रीय संगीतातील ख्यालासारखी वाढत जाईल व हे समाजस्वास्थ्यास उपयुक्त ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com