लंबी रेस ! (ढिंग टांग ! )

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

मम्मामॅडम : (संयमानं) तू परत इकडे निघून ये पाहू..! 
बेटा : (पुन्हा दिलासा देत) कमॉन मम्मा, मी काही सुट्‌टीवर नाही आलोय ह्यावेळेला! ऑन ड्यूटी आलोय!! काम झालं की येणारच आहे परत!! 

बेटा : (फोनवर) मम्मा....मी बोलतोय! 
मम्मामॅडम : (काळजीनं) कुठे आहेस? 
बेटा : (एक पॉज घेऊन) लंडन! 
मम्मामॅडम : (धक्‍का बसून) क्‍काय? लंडनला काय करतो आहेस? 
बेटा : (एक पॉज...) भाषण होतं...माझं! 
मम्मामॅडम : (आणखी एक धक्‍का...) ओह माय गॉड! 
बेटा : (दिलासा देत) डोण्ट वरी...नेहेमीचंच भाषण केलं मी!!..आरेसेस, बेरोजगारी, राफेल, मोदीअंकलचा अहंकार वगैरे...नथिंग न्यू ऍक्‍चुअली! पण लोकांना खूप आवडलं! मला म्हणाले पुढल्या इलेक्‍शनला तुम्हालाच मत देणार!! 
मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) लंडनची माणसं कशाला मतं देणार आहेत? 
बेटा : (दुर्लक्ष करत) 1984च्या कुठल्यातरी दंगलीबद्दल विचारत होते! मी म्हटलं, आय डोण्ट नो... आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही!! 

मम्मामॅडम : (संयमानं) तू परत इकडे निघून ये पाहू..! 
बेटा : (पुन्हा दिलासा देत) कमॉन मम्मा, मी काही सुट्‌टीवर नाही आलोय ह्यावेळेला! ऑन ड्यूटी आलोय!! काम झालं की येणारच आहे परत!! 
मम्मामॅडम : (अजीजीनं) नक्‍की ना? 
बेटा : (दुर्लक्ष करत) इथं माझी भाषणं जोरदार होतायत! कसला रिस्पॉन्स आहे, माहितीये? माझं तर मत आहे की इथंच घ्याव्यात निवडणुका!! 
मम्मामॅडम : (घाईघाईने) तुझा दौरा आटपला की ताबडतोब इथं निघून ये! खूप कामं बाकी आहेत पक्षाची!! 
बेटा : (समजूत घालत) तुम समझती क्‍यों नही मम्मा? मी पक्षाचं काम करण्यासाठीच इथं आलोय ना? आय ऍम ऑन ड्यूटी चोवीस तास!! 
मम्मामॅडम : (अजीजीने) काही दिवस भाषणं थांबवलीस तर नाही का चालणार? 
बेटा : (चिडून) ह्याला काय अर्थ आहे? मिठ्या मारू नका, डोळे मिचकावू नका! जोक सांगू नका, भाषणं करू नका! मुलाखती देऊ नका, ट्विट करू नका!! अरे, लोकशाही नावाची काही गोष्ट आहे की नाही? आपल्याकडे इतके निर्बंध असतात म्हणूनच मी अधून मधून परदेशात येत असतो! कळलं? 

मम्मामॅडम : (उदास होत) रागावू नकोस बेटा! तुझ्याच भल्यासाठी सांगतेय!! 
बेटा : (घुश्‍शात) माझं भलं मला कळतं मम्मा! मी आता मोठा झालोय! 
मम्मामॅडम : (जाब विचारल्यागत) मी पीएम होण्याच्या शर्यतीत नाही, असं म्हणालास का तू? 
बेटा : (बाणेदारपणाने) अर्थात म्हणालो!! हम लंबी रेस के लिए दौड रहे है... 
मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) छान!! तुझ्या त्या वाक्‍यामुळे इथं आनंदी आनंद सुरू आहे, हे कळतंय का तुला? 
बेटा : (कपाळाला आठ्या घालत) त्या कमळवाल्यांना आनंद झाला असेल! पण मम्मा, तो आनंद टिकणार नाही!! पीएमच्या रेसमध्ये नसलो तरी पुढलं इलेक्‍शन जिंकणार आहे मीच! माझी लोकप्रियता प्रचंड वाढतेय, हे बघून शत्रूपक्ष सावध झाला होता, त्यांना बेसावध करण्याची ही माझी स्ट्रॅटेजी आहे..! 

मम्मामॅडम : (कपाळावर हात मारत) डोंबलाची स्ट्रॅटेजी... करायला जावं एक तर होतंय भलतंच! किती दिवस आपल्या पक्षात हे असं चालणार आहे... कुणास ठाऊक! 
बेटा : (आत्मविश्‍वासानं) आपला पक्ष उत्तम प्रगती करतोय मम्मा! 
मम्मामॅडम : (निक्षून सांगत) मी पीएमपदाच्या शर्यतीत नाही, हे कृपा करून पुन्हा बोलू नकोस, एवढंच सांगणं आहे माझं! तुझ्या घोषणेनं कमळवाल्यांना आनंद झाला असेल नसेल, पण... 
बेटा : (कान टवकारून) पण? पण काय मम्मा? 
मम्मामॅडम : (थंड आवाजात) आपल्या पक्षातले डझनभर पुढारी आनंदानं उतावीळ होऊन देव पाण्यात बुडवून बसलेत, त्यांचं काय करायचं? 

- ब्रिटिश नंदी 

Web Title: Pune Edition Article on Dhing Tang