दोन दौरे ! (ढिंग टांग !) 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

"ह्या वेळी आपण तुम्हालाच मत देणार, साहेब!'' डोम्बोलीच्या आदिवाश्‍याने आश्‍वासन देऊन टाकले. राजे प्रसन्न झाले. "बघतो' असे म्हणून त्यांनी नवनिर्माणगडाचे उद्‌घाटन करोन प्रस्थान ठेवले. 

इतिहासास नेमके ठावें आहे. मार्गशीर्षातली ती एक टळटळीत सकाळ होती. होय, मुंबईत सकाळदेखील टळटळीतच असते, हेही इतिहासास नेमकें ठाऊक होते. सकाळीच राजे उठून लगबगीने तयार झाले, तेव्हा कृष्णकुंज गडावर गडबड उडाली, आणि इतिहासदेखील डोळे चोळत उठला. हे काय? आज पुन्हा दौरा? राजियांनी हे काय चालविले आहे? दौऱ्यांवर दौरे, मोहिमांवर मोहिमा... नवनिर्माणाचा कल्लोळ पुन्हा एकवार सुरू झाला काये? इतिहासाने कान आणि पेन टवकारले. 

वास्तविक कालच डोम्बोलीच्या दुर्गम इलाख्यात दौड मारून राजियांनी तेथील आदिवासी रयतेची गाऱ्हाणी जातीने ऐकिली होती. डोम्बोलीकर बिचारे चाकरमानी. कुणी आपले काही ऐकायला आले आहे, ह्याचाच त्यांना अपरंपार आनंद झालेला. 
""साहेब, आपल्याला इथली लोकं फार मानतात हं!'' एका डोम्बोलीच्या आदिवाश्‍याने त्यांना नम्रपणे सांगितले. थर्ड सॅटर्डे असल्याने अनेक आदिवासी आपापल्या कामधंद्यासाठी पंचक्रोशीबाहेर गेलेले. 

"कधी आलात? दहा-पस्तीसच्या कर्जतनी की अकरा-दहाच्या कसारानी?'' दुसऱ्या एका डोंबोलीकराने त्यांस खुशाली विचारली. डोम्बोलीत खुशाली अशीच विचारतात. राजे अंमळ अवघडले. "दहा-पस्तीस', "अकरा-दहा' हे मोटारींचे नंबर असावेत का? असा प्रश्‍न त्यांना पडला. पण ते एक असो. 

डोम्बोलीकरांच्या समस्या चिक्‍कार होत्या. एकतर मोगली कारभाऱ्याने "लोणी देतो' ऐसे सांगोन त्यांच्या हातावर तुरी दिली होती. ""मग कारभाऱ्यांस जाब का विचारला नाहीत?'' राजे कोपिष्ट सुरात उद्‌गाले. अन्याय सहन करणाराही गुन्हेगार असतो, हे ह्या गरीब जनतेला कधी समजणार? 

"विच्यारला ना, लोणी "देतो' असे म्हटले नव्हते, "नेतो' असे म्हटले होते, असे उत्तर दिले त्यांनी, साहेब!'' डोम्बोलीच्या आदिवाश्‍याने खुलासा केला. राजियांना त्या क्षणी कपाळावर हात मारून घ्यायचा होता. त्यांनी आपल्या एका पाईकांस खूण केली, तशी पाईकाने कपाळावर हात मारोन घेतला!! पुन्हा असो. 
""निवडणुकीला ते, गाऱ्हाणी गायला आम्ही! हे समीकरण कसे जुळायचे, आँ?'' राजियांनी दुखरा सवाल केला. गेली कित्येक वर्षे हा सल त्यांच्या दिलात दातात अडकलेल्या मक्‍याच्या कणसाच्या तुसासारखा टोंचतो आहे. किंवा कोंबडी खाल्ल्यानंतर...जाऊ दे. 

"ह्या वेळी आपण तुम्हालाच मत देणार, साहेब!'' डोम्बोलीच्या आदिवाश्‍याने आश्‍वासन देऊन टाकले. राजे प्रसन्न झाले. "बघतो' असे म्हणून त्यांनी नवनिर्माणगडाचे उद्‌घाटन करोन प्रस्थान ठेवले. 
हे झाले कालचे! आज स्वारी वरळीकडे निघाली होती... 
""साहेब, आज दौरा कुठे?'' असे पप्याजी फर्जंदाने त्यांस घाबरत घाबरत विचारले, परंतु त्यावर उत्तर मिळाले नाही. उत्तरादाखल "चहा आण पटकन' अशी आज्ञा मात्र झाली! राजियांनी भरारा तयारी करोन झरारा गाड्या जमवत फरारा मोर्चा वरळीच्या कोळीवाड्याकडे वळवला. इतिहास बुचकळ्यात पडला. अचानक राजे वरळी कोळीवाड्यात कसे? आणि का? तेवढ्यात त्याच्या कानावर ती कुजबूज आली... 

कोस्टल रोडच्या महागड्या, परंतु घातकी अशा सरकारी प्रस्तावाने तेथील माश्‍यांचा अधिवास नष्ट होवोन तेथील संपूर्ण समुद्र "निर्मत्स्य' होणार, ह्या कल्पनेने कासावीस झालेल्या राजियांनी तेथे धाव घेतली होती. गरीब बिचारे मासे!! तेथील कोळंबीने जायचे कोठे? कुर्ल्या-चिंबोऱ्यांनी कुठल्या सांदीफटीत शिरायचे? विकासाच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी चालवलेली ही निसर्गाची हेळसांड राजियांना बघवेना. वरळी कोळीवाड्यातील कोस्टल रोडच्या प्रस्तावित बळींच्या पाठीवर दिलाश्‍याची थाप मारून राजियांनी "सारे काही ठीक होईल' असे सांगितले. 

"तुम्ही आलात बरं झालं, आता कोस्टल रोड काही होत नाही...'' एक वरळीकर खुशीत म्हणाला. त्यावर विस्मयचकित झालेल्या राजियांनी त्याच्याकडे चमकून पाहिले, आणि ते एवढेच म्हणाले- 
""छे, असं कुठं काय? मी सुरमईचा भाव बघायला आलो होतो! आज संडे ना?'' 

- ब्रिटिश नंदी 

Web Title: Pune Edition Article on Dhing Tang