...हृदय गेले भडकुनी! (ढिंग टांग!)

...हृदय गेले भडकुनी! (ढिंग टांग!)

""ह्या इथून सैन्य घुसवलं की थेट इस्लामाबादपर्यंत सरळ रस्ता आहे...,'' त्याने हनुवटीच्या ठिकाणी ब्रशचा पांढरा ठिपका ठेवला आणि सरळ रेघ कानापर्यंत नेली. आपल्या कानाशीच शत्रूराष्ट्राची राजधानी आहे, हे काही मनाला बरे वाटले नाही. 
""समजा, हे लाहोर आहे!'' त्याने नाकावर एक पांढरा ठिपका काढला. ""आणि ही इथे आपली राजधानी!'' हनुवटीवरचा पांढरा ठिपका त्याने रिन्यू केला. ""...आणि ही इथे चायना बॉर्डर समजा!'' कपाळाच्या वरच्या बटा त्याने कचाककन कात्रीने उडवून एक बकाल प्रदेश दाखवला. 

""इथून हे असे इथून रणगाडे घुसवले की फत्ते झालीच समजा!,'' उभय गालप्रदेश आणि डब्बल हनुवटी ते थेट गळ्यावर अतिक्रमण करून, विस्तृत युद्धभूमीवर निर्दयपणे सपासप फेस काढत त्याने तुंबळ युद्ध आरंभले. 

""पण, शत्रूसैन्य काय गप्प बसणार आहे का? त्यांच्याकडेही विमानं आहेत म्हटलं!,'' आम्ही कसेबसे तोंड उघडून म्हणालो. हल्ली आपण फार सावध असतो. मागल्या खेपेला अशाच एका मुद्यावर आम्ही शंका काढताच त्याने संतापून जोरदार फवारा मारून आमचे नाक आणि तोंड कायमचे बंद केले होते. 
""हॅ:!! त्यांची कसली ती विमानं? भंगारातले पत्रे ते!,'' त्याने आता थेट वस्तराच काढला. आम्ही खुर्चीचे हात आधारासाठी घट्‌ट पकडून ठेवले.

""त्यांच्यापेक्षा आपल्या पुण्याच्या ऑटोरिक्षा बऱ्या!,'' पट्ट्यावर वस्तरा तासत त्याने शत्रुराष्ट्राच्या युद्धसामग्रीची समीक्षा केली. त्याच्याकडून आम्हाला युद्धज्ञान प्राप्त झाले ते असे : शत्रुराष्ट्राकडे एकही उडणारे विमान नसून युद्धनौका बुडणाऱ्या आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांच्याकडील पाणबुड्या डाल्डाच्या हवाबंद डब्याप्रमाणे सदैव पाण्यावर तरंगतच राहतात, बुडता बुडत नाहीत!! त्यांच्याकडील बंदुकांपेक्षा आपल्याकडील दिवाळीतील केपांची पिस्तुले अधिक परिणामकारक असून त्यांच्याकडे मुदलात अणुबॉम्बच नाही! उगाच आपली हूलझपट करतात. उलट आपण बॉम्ब टाकला, तर त्यांची पळता भुई थोडी होईल!! 
""काय सांगता? त्यांच्याकडे अणुबॉम्ब नाही?,'' आम्ही आश्‍चर्ययुक्‍त सुरात विचारले. 

""छ्या!! अहो, अणुबॉम्ब म्हंजे काय चेष्टा आहे? क्‍येवढा जड असतोय तो!,'' त्याच्या वस्तऱ्याला धार बहुधा होत आली होती. अशा वेळी माणसाने हमेशा नम्र राहावे!! 

""मी तर म्हणतो, खुशाल टाकावा आपणच बॉम्ब! होऊन जाऊंद्या युद्ध!,'' तो डर्काळला. "टाका, टाका बॉम्ब' असे म्हणताना त्याच्या चेहऱ्यावर मुन्शिपाल्टीच्या तरण तलावावर पोराला पोहायला शिकवणाऱ्या बापाची कळा होती. (""टाक उडी लेका, मी आहे ना!'' असे सांगणारा तो शूर बाप डोळ्यासमोर आणा.) असो. 
"" लेकाचे फार माजलेत नाहीतरी! किती काळ त्यांच्या कुरापती सहन करायच्या? काही लिमिट आहे की नाही?'' एवढे बोलून त्याने संतप्त चेहऱ्याने वस्तरा आमच्या गळ्याशी टेकवला. आम्ही डोळे मिटले. 

""काय? खरंय की नाही?'' त्याने जाब विचारला. 
""अर्थात! बॉम्ब टाकायला साहेबांना सांगून बघतो!,'' आम्ही घोगऱ्या आवाजात म्हणालो. ""हं'' असे म्हणत सपासप हत्यार चालवत त्याने आमच्या गालप्रदेशावर जमेल तितका रक्‍तपात केला, तेव्हाच तो शांत झाला. 

"" वाटतं की आपणच जावं बॉर्डरवर आणि फायनल ऑपरेशन करून टाकावं!,'' तो. 
"" जा की मग! तुमच्यासारखा युद्धनिपुण सैनिक हवाच आहे देशाला!,'' आम्ही. 
""गेलो असतो हो...पण आमचा पाय सध्या मुरगळलाय ना! गुडघ्यात कळ मारते!,'' तो. 
...त्याच्या प्रखर राष्ट्राभिमानाखातर आम्ही वीसाच्या दोन नोटा काढल्या. तो त्याच्या जुनाट कपाटाच्या ड्रावरात सुट्‌टे शोधून लागला... 

- ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com