मुक्‍काम संगमनेर! (ढिंग टांग!)

मुक्‍काम संगमनेर! (ढिंग टांग!)

डिअर मम्मा, प्रचारासाठी मी देशभर (विमानाने) फिरतो आहे, हे तुला माहीत आहेच. पक्षाला नव्या उंचीवर नेण्याचा हा माझा प्रयत्न आहे. सदर पत्र महाराष्ट्रातील संगमनेरमधून लिहितो आहे. आल्यावर तुला देईन! मग तू ते वाच!! ओके? संगमनेरमध्ये आलो, तेव्हा माझ्याकडे फक्‍त अंगावरचा कुर्ता आणि पायजमा होता. कपड्यांची बॅग नव्हतीच. तिथे भाषण संपायला उशीर झाला. भाषणात प्रचंड टाळ्या वसूल केल्यानंतर इथले कॉंग्रेस नेते सत्यजित तांबेजी म्हणून होते, त्यांनी निघायची घाई सुरू केली. म्हणाले, ""चला चला, साहेब, विमानाला उशीर झाला तर गडबड होईल!''

आपले बाळासाहेब थोरातजीसुद्धा होते. तेही म्हणाले, ""वाटेतच जेवण घेऊया!'' मी लग्गेच त्यांना सांगून टाकले की ""नोप! अभी बहुत रात हो चुकी है... मैं यहीं ठहरूंगा!'' त्यावर काय झाले ते कळले नाही. ते तांबेजी म्हणून होते, त्यांना बहुदा हर्षवायू झाला. त्यांनी खोलीतल्या खोलीत भान सुटल्यासारख्या चकरा मारल्या. त्यांच्या मागेच उभे असलेले बाळासाहेब काही काळ निपचित पडले होते. अखेर मीच कांदा मागवून दोघांनाही ताळ्यावर आणले. 

संगमनेर हे अजमेरच्या जवळ असेल, असे मला आधी वाटले होते. पण ते जाऊ दे. मम्मा, तुला माहीतच आहे, की लांब लांबचे प्रवास करण्यासाठीही मी साधेसे, छोटेसे हेलिकॉप्टर वापरतो. आपली दीदी मात्र छोटे छोटे प्रवास करण्यासाठी मोठे हेलिकॉप्टर वापरते!! तिची तक्रार मी निवडणूक आयोगाकडे करणार होतो, त्यासाठी पुरावा म्हणून केलेला एक व्हिडिओ मी काल पाठवला होता. तो मिळाला का? संगमनेरला रात्री मी स्वच्छ सांगून टाकले, की ""मला एक सिंगल बेडवाली खोली द्या. एसी नसेल तरी चालेल..!'' त्यांना खोली शोधायला बराच वेळ लागला. मी बाळासाहेबांना शेवटी विचारले, ""क्‍या प्रॉब्लेम है?'' 
""विदाऊट एसी खोलीच मिळून नाही ऱ्हायली!'' ते ओशाळेपणाने म्हणाले. मी कपाळाला हात लावला. 

"अहो, अंकल विथ एसीसुद्धा चालेल. सिंगल बेड नसला तरी चालेल...'' मी ओरडलो. मग धावपळ करून एका अभियांत्रिकी कॉलेजच्या विश्रामगृहात सोय झाली. रात्री पंचवटी नावाच्या हाटेलात मजबूत जेवलो. बाळासाहेबांना मी म्हणालो की ""अंकल, रात्री इतकं जेऊ नये!'' मग सगळे थांबले. 

रात्री अंगावरचा सदरा काढून धुवायला दिला. म्हटले, ""सकाळी इस्तरी करून आणा!'' सदरा इस्तरीला पाठवला आणि पोटात खड्‌डा पडला. हा सदरा इथल्या इस्तरीवाल्याने जाळून आणला तर काय करायचे? ह्या विचाराने झोप उडाली. पण सकाळी पांढराशुभ्र सदरा आला!! 

मम्मा, यापुढे आपल्या घरी पिझ्झा नको, तू संगमनेरमधले थालिपीठ टेस्ट केले आहेस का? लोणी आणि थालिपीठ अफलातून लागते. मन तृप्त झाले. मी डब्यात बांधून घेतले आहे!! थालिपीठ इतके चांगले होते की बाळासाहेब अंकलना मी "पक्षात मोठी जबाबदारी देईन' असे जवळ जवळ सांगून टाकले. पूर्ण सांगणार होतो, पण तेवढ्यात ते पुन्हा हर्षवायूने निपचित पडले. मी पुन्हा कांदा मागवला. 

थालिपीठ खाऊन पुन्हा ओझर विमानतळावर आलो तेव्हा विमानाचा पायलट आणि सुरक्षारक्षकांचे जोरदार भांडण सुरू होते. पायलटची बॅग तपासली म्हणून तो रागावला होता. त्याला मी डब्यातले थालिपीठ दिले. त्याचेही मन तृप्त झाल्याने अखेर विमानाने उड्‌डाण केले. 
एकूण संगमनेरचे थालिपीठ महाराष्ट्राचे राजकारण बदलून टाकणार, हे निश्‍चित! बाकी भेटीअंती बोलूच. तुझाच. बेटा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com