ढिंग टांग! : न्यू इंडिया!

ढिंग टांग! : न्यू इंडिया!

मम्मामॅडम : (खोलीत प्रवेश करत) डिंग डॉंग...डिंग डॉंग...मी आलेय! 
बेटा : (मोबाइल फोनमध्ये मग्न...) हं! धिस इज न्यू इंडिया!! 
मम्मामॅडम : (खाकरत) बेटा, मी आलेय तुला भेटायला! 
बेटा : (मोबाइलमध्येच...) हॅट...कटकट नुसती!! 
मम्मामॅडम : (वैतागून) देशातले लोक माझी नुसती चाहूल लागली तरी उठून उभे राहतात... अजूनही!! 
बेटा : (मोबाइलमध्ये कंप्लीट बिझी...) तरीच! म्हणे न्यू इंडिया!! 

मम्मामॅडम : (उसळून)...आय ऑर्डर यू!! आधी उठून उभा रहा! स्टॅंड अप!! 
बेटा : (दचकून फोन खाली पाडत) ओह...सो सॉरी! कधी आलीस? 
मम्मामॅडम : (संतापाने) गेले अर्धा तास इथे दरवाजात उभी आहे! त्या मेल्या दळिद्री मोबाइल फोनमधून तुला फुर्सत मिळेल तर शप्पथ!! 
बेटा : (ओशाळून) जरा बिझी होतो!! महत्त्वाचे मेसेज बघत होतो!! 

मम्मामॅडम : (संताप कंटिन्यू...) इतके दिवस घरी आला नाहीस म्हणून पक्षाच्या ऑफिसमध्ये गेले होते, तिथं कळलं की गेले काही दिवस तूदेखील गेलेला नाहीस तिथं!! म्हणून इथं आले तर....माझ्यापेक्षा काय महत्त्वाचं आहे इतकं? 
बेटा : (उदास मनस्थितीत) खरं तर आता काहीच महत्त्वाचं उरलं नाही! न्यू इंडियात सगळं संपलंय!! (दु:खभरे गाणे गुणगुणत) व्होट गये, सब गया...कोई अपनीही मिट्‌टी तले दब गया..!! 
मम्मामॅडम : (पार विर्घळून जात) इतना दिल छोटा ना करो बेटा! एक इलेक्‍शन हरलो, म्हणून इतकं मनाला लावून घेतात का? चुनाव आते है, और चुनाव जाते है!! 

बेटा : (डोळे भरून) लेकिन यह चुनाव चुना लगा के गया!! 
मम्मामॅडम : (डोळ्याला पदर लावत) हृदयाला घरं पाडणारं नको बोलूस बेटा!! 
बेटा : (निराशेने)...तरी मी कित्ती मेहनत केली होती! 
मम्मामॅडम : (उमेद वाढवत) खरं आहे रे बेटा! तुझं काहीच चुकलेलं नाही!! नेमकं काय आणि कुठे चुकलं, हेच कळत नाही!! 
बेटा : (सीरियस चेहरा करत) मला कळलंय! आपलं आडनाव चुकलंय!! 

मम्मामॅडम : (शिताफीने विषय बदलत)...म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो! पुन्हा एकदा उत्साहाने कामाला लाग, आणि पुढल्या इलेक्‍शनची तयारी कर बघू!! लोग तुम्हारा इंतजार कर रहे है!! 
बेटा : (निरुत्साहाने) मी आता कध्धीच पीएम नाही का बनणार, मम्मा? 
मम्मामॅडम : (हाताची घडी घालत) होशील होशील, पण... 
बेटा : (अधीरतेने) पण काय मम्मा? 

मम्मामॅडम : (सडेतोड मुद्‌दा मांडत)...असा मोबाइल फोनमध्ये अडकून पडलास तर कसा होशील? परवा योगा डेलासुद्धा उगीचच विचित्र ट्विट करून ठेवलंस! बरं दिसतं का? 
बेटा : (वाद घालत) त्यात काय एवढं? न्यू इंडियातल्या तरुणाईची ऐंशी टक्‍के कामं मोबाइल फोनवरच होतात!! 
मम्मामॅडम : (समजूत घालत) तीन-चार दिवसांपूर्वी राष्ट्रपती बोलत असताना भर पार्लमेंटात पहिल्या रांगेत बसून तू मोबाइलमध्ये गुंतून पडला होतास!! चार गोष्टी पटल्या नाहीत एखाद्याच्या, तरी शिष्टाचार म्हणून थोड्या टाळ्या वाजवाव्यात!! बाकं वाजवावीत!! 

बेटा : (चिडून) मी काही बोललो तरी तुम्ही मला दोष देता आणि काही बोललो नाही, तरी खापर फोडता!! माणसानं अशावेळी वागायचं तरी कसं? मी एकदा सांगून टाकलं आहे की मी कॉंग्रेसचा अध्यक्ष म्हणून आता काम करणार नाही म्हंजे नाही!! 
मम्मामॅडम : (हताशेनं) तुलाच बघावं लागणार! दुसरं आहे तरी कोण? 
बेटा : (हट्‌टाने) मग ठीक आहे! मी मोबाइलवरूनच पक्षाचं काम बघणार! चालेल? 

- ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com