ढिंग टांग! : आंबट इतिहास!

ढिंग टांग! : आंबट इतिहास!

"खामोऽऽऽश!,'' शिवाजी पार्काडात गर्जना घुमली, आणि अवघा परिसर थरारोन गेला. लगतच उभ्या असलेल्या अजिंक्‍य, बेलाग आणि कमालीच्या दुर्गम अशा "कृष्णकुंजगडा'च्या बालेकिल्ल्यातून उमटलेली ही गर्जना परिसराचाच काय, इतिहासाचाही थरकाप उडवणारी होती. तसेच घडले. इतिहास थर्थरला. अगदी हातोहात, पायोपाय थर्थरला. आता काहीतरी भयंकर घडणार, ह्या जाणिवेने इतिहासाने लगबगीने कागदाची रिमे पुढ्यात ओढली. पुढे वाढोन ठेवलेला काळ बखरीत नोंदविणे, हे त्याचे कर्तव्यचि होते. 

"कोण म्हणतो राजे स्वतंत्र नाहीत?'' गर्रकन मान वळवत राजे उद्‌गारले. त्यांचे नेत्र खदिरांगारासारखे पेटले होते. उपस्थित मंडळी च्याटंच्याट पडली. (आम्ही उपस्थितांपैकी येक!) वास्तविक "आपण स्वतंत्र नाही' असे कोणीच म्हटले नव्हते. पण राजियांच्या मनात आले, त्यांनीच स्वत:ला विचारले आणि स्वत:लाच प्रतिप्रश्‍न केला. एवढेच. हल्ली असे फार्वेळा होते... 
""कोण म्हणालं, बोला?'' राजियांनी विचारिले. साऱ्यांनी माना खाली घातल्या. बराचवेळ कोणी साधे खाकरेना!! खाकरले तर चुकीचा संदेश जायचा. न खाकरले, तर घशात आवंढा गोळा व्हायचा. काय क्रावे ब्रे? 

खलबतखान्यात आम्ही सारे मनसैनिक जमलो होतो. (दोन-चारच होते...असो.) पुढे काय करायचे? ह्याचे प्लानिंग सुरू होते. समोर काळी द्राक्षे (सीझन नसतानादेखील) प्लेटीत दिसत होती. 
""रणमैदान दूर नाही... कोठल्याही क्षणी दुंदुभी वाजेल! आपण तैय्यार आणि मौजूद असलेले बरे!'' द्राक्षांवर येक डोळा ठेवोन आम्ही पोक्‍त विचार अखेर (मनाचा हिय्या करोन) मांडिला. 
""गेलं उडत ते रणमैदान! असल्या फिक्‍स म्याच खेळायला आम्ही दिवाणे नाही झालो!!'' हात उडवोन राजियांनी जैय्यत तयारीचा आणि मौजूदगीचा सवाल निकाली काढिला. 

"म्हंजे?"' आमच्या तोंडचे पाणीच पळाले! तसे पाहो गेल्यास आमच्यासारिखा हाडाचा मनसैनिक शोधूनदेखील सांपडणार नाही. (पण कशाला शोधावा?) रणात उतरायचेच नाही, हा विचार आमचा गोंधळ उडवोन गेला. द्राक्षांचे काय करावे? 
""म्हंजे वाघाचे पंजे! जोवर ते भिक्‍कारडे ईव्हीएम यंत्र आहे, तोवर आम्ही युद्ध खेळणार नाही म्हंजे नाही! आधी ती यंत्रे बंबात घाला, मग आमच्यासमोर उभे ठाका, मग बघतो एकेकाला!'' राजियांनी घणाघात केला. 

"द्राक्षं नसतील तर आपण जिंकू?'' बेसावधपणाने आम्ही म्हणालो. त्यावर राजियांनी सणकून आमच्याकडे पाहिले. त्यावर "सॉरी...ईव्हीएम, ईव्हीएम' असा आम्ही खुलासा केला. 
""अर्थात! कागदाच्या मतपत्रिकांवर होऊन जाऊ द्या लढत, मग बघा आमचा इंगा! त्या यंत्रात गडबडी करोन कोणीही बाजी मारील! असला रडीचा डाव आम्हांस मंजूर नाही!'' राजे वज्रनिर्धाराने म्हणाले. 

" लोकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल,'' आमची चिकित्सक वृत्ती जागी झाली की आम्हीही कोणाला ऐक्‍कत नाही. द्राक्षं? 
""काय मेसेज जाईल? सांगा, सांगा ना!'' द्राक्षाची प्लेट उचलत राजियांनी डोळे वटारोन विचारले. 

" लोकांचं राहू द्या, आपले कार्यकर्ते हाय खातील त्याचे काय? गेल्या दोन-तीन निवडणुका आपण या ना त्या कारणाने लढलोच नाही! असे कितीकाळ चालणार?'' आम्ही (द्राक्षांच्या) काळजीपोटी कळीचा मुद्दा मांडला. 
""मेसेज काय जाईल, ते सांगा!'' राजे तुटकपणे म्हणाले. आम्ही गप्प बसलो. 

"ज्या कागदावर उत्तम व्यंग्यचित्रे काढता येतात, त्या कागदाइतके विश्‍वासार्ह दुजे आहे तरी काय...अं? घ्या!'' राजे आमची मनसे समजूत काढत म्हणाले. त्यांनी द्राक्षांची प्लेट समोर धरली. 
...आम्ही आंबट द्राक्ष दाताखाली आल्यासारखा चेहरा करोन तेथून निघालो. राजियांच्या दातांतूनही एक आंबट कळ निघून गेली असावी! कारण हे सर्व बखरीत लिहिताना इतिहासाचा चेहराही आंबट झाला होता. 

- ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com