ढिंग टांग! : ...लेट का झाला? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

चांद्रयान-2 ह्या भारतीय बनावटीच्या अंतराळयानाचे अखेर आठवडाभर लेट का होईना पण डिपार्चर झाले, ह्याबद्दल आम्ही समस्त भारतीयांचे हार्दिक अभिनंदन करितो.

चांद्रयान-2 ह्या भारतीय बनावटीच्या अंतराळयानाचे अखेर आठवडाभर लेट का होईना पण डिपार्चर झाले, ह्याबद्दल आम्ही समस्त भारतीयांचे हार्दिक अभिनंदन करितो. ह्या डिपार्चरबद्दल प्रारंभी आम्ही (अनवधानाने) रेल्वे खात्याचेच अभिनंदन करू लागलो होतो. पण श्रीहरिकोटा येथील काही शास्त्रज्ञांनी फोन करून "आम्हाला इसरो नका' अशी सांकेतिक भाषेत गळ घातली. त्यामुळे आम्हाला चुकीची दुरुस्ती करून अभिनंदनाचा संदेश ऐनवेळी बदलता आला. असो. 

वास्तविक पाहता चांद्रयानाला आठवडाभर लेट होणे हे भारतीय टाइम टेबलप्रमाणे "राइट्‌टाइम'च मानले पाहिजे. तरीही चांद्रयानाला नेमका लेट कोणामुळे झाला, हे शोधून काढणे आमचे हाडाचा शोधपत्रकार ह्या नात्याने कर्तव्य होते. असली शोधपत्रकारिता आमच्या रक्‍तातच आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

उदाहरणार्थ, सायंकाळी सहाला हपिसातून सुटलेली व्यक्‍ती रात्री उशिरा घरी कां परतते? नेहमी शुक्‍कुरवारी वगैरेच काही लोकांना हपिसात उशीरपर्यंत मीटिंगा कां चालतात? "तू जेऊन घे, मला उशीर होईल' ह्या सूचनेमागील नेपथ्य आणि तथ्य काय असते? हे सारे आम्ही लीलया ओळखतो. पण हे विषयांतर झाले. मुद्‌दा चांद्रयानाच्या विलंबाचा आहे. 

ही विलंबाची काही कारणे आम्ही शोधून काढली आहेत. काही विलंबाने शोधून काढू! तूर्त शोध लागलेल्या कारणांची जंत्री येथे थोडक्‍यात देत आहो. कोठल्याही चिंतनशील व वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या माणसाला ही कारणे पटावीत, असे वाटते. 

1. रिटर्न भाडे मिळत नसल्याने बहुतेक वेळा डेक्‍कनवरून विमान नगरकडे जायला आटोरिक्षावाले तयार होत नाहीत. (खुलासा : सदरील केस पुण्यातली आहे, त्यामुळे ती जागतिकच मानणे भाग आहे. असो.) त्याप्रमाणेच एम्प्टी गाडी इतक्‍या लांब नेणेही पर्वडणारे नसते. त्याच न्यायाने "यान चाललेच आहे तर सवारी तरी न्यावी' असे मत काहीजणांचे पडल्याने त्या वादात चांद्रयानाला लेट झाला. 

2. गेल्या खेपेला मध्यरात्री पावणेतीन वाजता यान पाठवण्याचा इरादा होता. रात्रीच्या वेळी प्रवास करू नये, अशा राक्षसवेळेला तर मुळीच करू नये, असे पूर्वापारपासूनचे मत आहे. ते अखेरच्या क्षणी मान्य करण्यात आले. सबब चांद्रयानाला लेट झाला. 
3. चांद्रयान मोहिमेतील काही शास्त्रज्ञ विदर्भातले होते असावेत! (आम्हीही तिथल्लेच!) सबब त्यांनी त्यांच्या हिशेबाने चांद्रयान टायमातच पाठवले, पण इतरांच्या (पक्षी : पुणेकर) दृष्टीने चांद्रयानाला लेट झाला. 
4. आठ दिवसापूर्वी उड्‌डाणाचा मुहूर्त होता 14 जुलैची रात्र! वेळ : मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास...(म्हणजे तिथी बदलली)! शिवाय दुसऱ्याच दिवशी खंडग्रास ग्रहण होते. "ग्रहण आटोपून जाऊ दे, मग बघू' असा पोक्‍त विचार मांडला गेला व त्यानुसार चांद्रयानाला लेट झाला. 

5. चांद्रयानाच्या क्रायोजेनिक इंजिनात हेलियम वायूची गळती झाल्याने उलटी गिनती थांबवून चांद्रयानाचे उड्‌डाण स्थगित करण्यात आल्याचे कारण शास्त्रज्ञांनी दिले आहे. आम्हाला हे फारसे पटले नाही.

हेलियम वायूचा काय संबंध? अवघे जग सीएनजीवर चाललेले असताना व इथेनॉलचा वापर वाढणे आवश्‍यक असताना हेलियम वायू हवा कशाला? (खुलासा : ह्यातील हवा ह्या शब्दावर जोर द्यावा!) असा आग्रह धरण्यात आला. आमच्या खात्रीलायक गोटातून मिळालेल्या माहितीनुसार "इथेनॉल वापरा नं बेऽऽऽ' असा फोनदेखील "इसरो'च्या संचालकांना (नागपुराहून) गेल्याचे समजते!! खरे खोटे चंद्राला ठाऊक, पण ह्या अशा विविध कारणांमुळे चंद्रयानाला लेट झाला. 
असो! 

- ब्रिटिश नंदी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article on Dhing Tang