मानसयात्रा ! (ढिंग टांग!)

Pune Edition Article on Dhing Tang Manasyatra
Pune Edition Article on Dhing Tang Manasyatra

कैलासराणा शिवचंद्र मौळी 
फणिंद्र माथा मुकुटी झळाळी 
कारुण्यसिंधू भवदु:खहारी 
तुजवीण शंभो मज कोण तारी? 
तसे पाहू गेल्यास आम्ही(ही) शिवभक्‍त आहो. नुसतेच "भक्‍त' नाही, तर शतप्रतिशत शिवभक्‍त आहो! फारा दिवसांपूर्वी आम्ही एका संकटातून वाचलो. त्या संकटात असतानाच अज्ञातातून एक आज्ञा झाली. जणू काही कुणी कानात पुटपुटले : कैलास मानसची यात्रा करावी... करावी... क-रावी... रावी...आवी ...वी... वी... (खुलासा : ह्याला इको इफेक्‍ट असे म्हणतात...) पूर्वीच्या काळी म्हंजे ऋषिमुनींच्या काळात ह्यालाच आकाशवाणी म्हणत असावेत, असे वाटते. कानात वेळोवेळी येणारे आवाज हाच आमचा "आतला आवाज' आहे, असे आम्ही मानीत होतो. पण हा आवाज थोडा घोगरा होता. आमचा आतला आवाज येवढा घोगरा आहे, हे कळून अंमळ विषाद वाटला. आतल्या आवाजाचा प्रॉब्लेम आम्हाला बऱ्याच वर्षांपासून आहे. पूर्वी (अतिजेवण झाल्यावर येणाऱ्या) पोटातल्या गुरगुरीला आम्ही "आतला आवाज' समजत असू. पण तो गैरसमज होता, हे लागलीच कळाले. नुसतेच कळाले नाही तर आमच्या आसपास बसलेल्या दोघाचौघांनाही कळाले!! कारण हा तुमचा "आतला आवाज' नसून "बाहेरचाच आवाज' आहे, असे त्यांनी डोळ्यात पाणी आणून स्पष्ट केले. पण ते असू दे. 

...अखेर आम्ही कैलासाची मानसयात्रा केली! 
कैलासयात्रा करणे सोपे नव्हे. खडतर अशी ही यात्रा तिबेटच्या पर्वतराजीतून सुरू होते. साठेक किलोमीटर पायी चालत जावे लागते, तेव्हा कोठे ते नयनमनोहर कैलासाचे रूप सगुण साकार होते. हिमाच्छादित किरीट मस्तकी बाळगणारा धीरगंभीर कैलासाचा तो दुर्लंघ्य पर्वत आणि त्याच्या मार्गावरील निळेशार मानससरोवर बघितले की डोळ्यांची धणीं फिटतें. हर्ष खेद ते मावळतात. कैलासयात्रेसाठी कडक शारीरिक तपासणी होते. आम्ही तिला सामोरे गेलो. आमच्या आकारमानाकडे बघून तपासणी अधिकाऱ्याने आमच्याकडे करुण दृष्टीने पाहिले. 
""काही गंभीर आजार वगैरे?'' त्याने विचारले. त्याच्या समोर एक भलामोठा फॉर्म ("म' पूर्ण) होता. 

"लहानपणी एकदा कांजिण्या, गोवर झाला होता...,'' आम्ही गंभीरपणे आमच्या दुर्धर आजाराची माहिती दिली. 
""काही शस्त्रक्रिया वगैरे?'' त्याने फॉर्मचे पान उलटले. 
""टॉन्सिल्सचे आप्रेशन झाले तेव्हा मरेस्तोवर आइस्क्रीम खाल्ल्यामुळे-,'' आमचे वाक्‍य पुरे करू न देता त्याने पुढले पान घेतले. 

""साठ किलोमीटर चालू शकता?'' त्याने डोळे रोखून विचारले. 
""ज्याने केली पंढरीची वारी, तया चालणे काय भारी?, आम्ही अभंगात उत्तर देऊन त्याचा कात्रज केला. वास्तविक आम्ही काही वारीबिरी केलेली नाही. 
""तुम्हाला कैलास यात्रेला पाठवणे ही रिस्क आहे...,'' तो पुटपुटला. 

"आम्हाला कसली आलीये रिस्क?'' आम्हीही पुटपुटलो. 
""तुम्हाला नाही... कैलास-मानसच्या पर्यावरणाला तुमच्यामुळे रिस्क आहे,'' त्याने खुलासा केला. 
कैलासयात्रा भयंकर खडतर असून तेथील हवा विरळ आहे. हंस पक्षी दिसतील, पण त्यांना चारा घालू नये, असे तपासणी अधिकाऱ्याने खडसावून सांगितले. हंस पक्षी मोती खातात, असे आम्ही ऐकून होतो. (मोती खाणाऱ्याच्या दाढा टणक हव्यात, असे आमच्या मनात थोडे दुखून गेले...) 

"पाहा बुवा, मानस सरोवरातसुद्धा कमळे फुललेली बघून तुमचा हिरमोड होईल! मग आम्हाला सांगू नका...'' अधिकाऱ्याने आम्हाला परावृत्त करण्याचा जणू चंग बांधला होता. पण आम्ही बधलो नाही. म्हटले जाणार म्हंजे जाणारच! आम्ही शिवभक्‍त आहो!! 

"त्यापेक्षा तुम्ही नेपाळच्या पशुपतिनाथाला का जाऊन येत नाही? तिथं देवळापर्यंत बस जाते! बसल्याजागी शिवभक्‍ती करून घ्या... काय?'' अधिकाऱ्याने फासा टाकला. आम्ही ब्याग उचलली. ...तूर्त तीच ब्याग उचलून त्र्यंबकेश्‍वराला निघालो आहो! 

- ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com