काळोखाचा विळखा

Pune Edition Article on Editorial
Pune Edition Article on Editorial

बुद्धिप्रामाण्य आणि विवेकवादी शिकवणीची काही दशकांची परंपरा असणारा महाराष्ट्र अद्याप अंधश्रद्धेच्या विळख्यातून पुरता बाहेर आलेला नसल्याचे सांगणाऱ्या घटना घडत आहेत. मराठवाड्यात गुप्तधनासाठी एका मुलीचा, तर वऱ्हाडात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा "नरबळी' देण्याचे प्रयत्न झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पैशांच्या पावसाची आस बाळगणारी आणि त्यासाठी नरबळी देऊ पाहणारी व्यक्ती शिक्षक असल्याचे बातमीत म्हटले आहे.

सगळाच प्रकार धक्कादायक. अंधश्रद्धेचा पगडा असलेल्या एका कुटुंबातील चार वर्षांच्या बालकाचा किरकोळ आजाराने मृत्यू झाला. वेळीच वैद्यकीय उपचार केले असते, तर ते मूल वाचले असते. अलीकडच्या काळात एकापाठोपाठ एक अशा घडलेल्या या घटना अपवादात्मक नाहीत, त्यामुळेच त्यांची गंभीर दखल घ्यायला हवी. 

माणूस या पृथ्वीतलावर राहायला लागला त्या आरंभाच्या काळी निबिड अरण्याहून आणि निसर्गाच्या क्रुद्ध लहरींखेरीज दुसरे काहीही त्याच्या वाट्याला येत नव्हते. निसर्गातील घटनांमागचा कार्यकारणभाव समजला नसल्याने माणूस दैवाधीन झाला असेल. त्या वेळी पारलौकिक शक्तींच्या अस्तित्वाबद्दलचा पहिला विचार माणसांच्या डोक्‍यात शिरला असणार. आकाशातून कोसळणारा रौद्र पाऊस, विजांचा कडकडाट हे सारे पाहून त्याला भीती वाटली असेल, तर ते साहजिकच म्हटले पाहिजे. त्या भीतीतून पारलौकिकाची आराधना सुरू झाली आणि त्यातून दैवते व "धर्म' नावाची आचारसंहिता विकसित झाली. पण, पुढे जसजसा विज्ञानाचा विकास होत गेला, तसतसा माणसाचा आत्मविश्‍वास वाढू लागला आणि अनेक जुनाट कल्पना आणि त्यावर आधारलेल्या रुढींना तडे जाऊ लागले. तरीदेखील ही प्रक्रिया पूर्णत्वाला गेली नाही, त्यामुळे अद्यापही समाजातील अनेक स्तर विज्ञानाच्या त्या प्रकाशाला पारखे आहेत.

विविध धर्मसंस्थांनी काळाच्या त्या-त्या विशिष्ट टप्प्यांवर संकटांना सामोरे जाण्याचे बळ दिले, असे इतिहास सांगतो; मात्र हाच धर्म कुठल्याशा टप्प्यावर "धारणे'च्या प्रवाहातून वेगळा होऊन "धोरणा'चा भाग झाला तेव्हा त्याने माणसांच्या अमंगलाची रुजुवात केली. ते अमंगल अद्याप एकविसाव्या शतकातही थांबलेले नाही. 

घटना मराठवाड्यातली असो, विदर्भातली असो किंवा काही महिन्यांपूर्वी पुण्यातल्या ख्यातनाम रुग्णालयात एका डॉक्‍टरनेच उपचारासाठी मांत्रिकाला पाचारण करण्याची असो; किंवा नामवंत महाविद्यालयातील सत्यनारायणाच्या पूजेची असो; आपल्या समाजाला विज्ञाननिष्ठ होण्यासाठी अजून बराच मोठा टप्पा गाठायचा असल्याचे या घटना सांगतात. विज्ञाननिष्ठा ही आपसूक निर्माण होणारी गोष्ट नाही. जन्मदत्त श्रद्धा जितक्‍या दुबळ्या होत जातील आणि माणुसकीशी नाते सांगणारी मूल्ये जेवढी अधिक प्रमाणात रुजतील तेवढा हा समाज प्रगल्भ होईल आणि त्यानंतर पूर्णतः विज्ञाननिष्ठ होईल. त्यासाठी आपली घरे, आपल्या शाळा, आपला समाज यात काय प्रयत्न होतात, हे साऱ्यांनी स्वतःला विचारले पाहिजे. महाराष्ट्रात "जादूटोणा किंवा अंधश्रद्धाविरोधी कायदा' अस्तित्वात आला आहे. त्याच्या प्रचार-प्रसारासाठी दाभोलकर, श्‍याम मानव यांच्यासारखे अनुभवी लोक अक्षरशः झगडले. कायद्याची चौकट उपयोगी पडते, याविषयी दुमत नसले, तरी कायद्याच्या धाकाने अशा घटनांना आळा बसलेला नाही, हेही वास्तव आहे. 

कारण यात प्रश्‍न आहे तो पोलिस, नोकरशाही आणि सरकारच्या इच्छाशक्तीचा. राजकीय लाभ-हानी ही आपल्याकडच्या सर्वच सरकारांसाठी व्यापक लोकहिताहून मोठी असते, हा अनुभव वारंवार येतो, त्यामुळे समाजातूनच जागृतीची मोहीम सुरू व्हायला हवी. गेल्या काही वर्षांत नव्याने निर्माण होत असलेल्या जातीय व धार्मिक ध्रुवीकरणाच्या वातावरणात आपण विकसित होत आहोत की मागे जात आहोत, याचा विचार सगळ्यांनी करायला हवा. "यथा राजा, तथा प्रजा' हे सूत्र उलट्या पद्धतीनेसुद्धा अनेकदा व नकळत अमलात येत असते.

बहुसंख्य समाज ज्या गोष्टी मानतो, त्या श्रद्धा आहेत की अंधश्रद्धा, याची चिकित्सा करणे राजकारणाच्या हिशेबात बसत नाही. जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचार-प्रसाराबद्दलची उदासीनता जाणीवपूर्वक आहे. पण, यात ना समाज जिंकतो, ना सरकार जिंकते. फक्त अंधश्रद्धा जिंकतात आणि त्याहून भीतीदायक म्हणजे अमानुषतेकडे कोरड्या नजरेने पाहायला समाजाचे डोळे सोकावतात. त्याकडे चिकित्सेच्या नजरेने पाहून समाजातूनच अशा घटनांच्या संदर्भात आव्हाने निर्माण होतील तेव्हा एखाद-दुसरे पाऊल पुढे पडण्याची शक्‍यता आहे. जिथे चिकित्सेला वाव नसेल, त्या समाजाचे साचलेले डबके होते आणि मग अशा अमानुष घटनाही आपल्याला अंतर्बाह्य हलवून सोडत नाहीत. हा धोका मोठा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com