नाणारची पैज! (ढिंग टांग!)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

सदू : (शांतपणे) उभ्या महाराष्ट्रात तुझ्याशिवाय कोणीही मांजराचे आवाज काढत नाही म्हणून! 
दादू : (चिडून) उभ्या महाराष्ट्रात तुझ्याशिवाय कोणीही वाघाला मांजर म्हणत नाही! 
सदू : (तिरसट सुरात) फोन कशाला केला होतास? मला कामं आहेत! 

दादू : (मखलाशीने फोन फिरवत) म्यांव म्यांव! 
सदू : (गंभीरपणे खर्जात) किती वर्ष असे मांजराचे आवाज काढणारेस, दादूराया? शोभतं का तुला? 
दादू : (खजील होत) तू दरवेळी माझा आवाज ओळखतोस कसा? 
सदू : (शांतपणे) उभ्या महाराष्ट्रात तुझ्याशिवाय कोणीही मांजराचे आवाज काढत नाही म्हणून! 
दादू : (चिडून) उभ्या महाराष्ट्रात तुझ्याशिवाय कोणीही वाघाला मांजर म्हणत नाही! 
सदू : (तिरसट सुरात) फोन कशाला केला होतास? मला कामं आहेत! 

दादू : (कुत्सित सुरात) फू:!! 
सदू : (भडकून) दादू, फोन ठेव! मी खरंच कामात आहे! 
दादू : (शिताफीने विषय बदलत) नाणारला जाणार आहेस का? 
सदू : (कपाळाला आठी घालत) नाणारला काय आहे? 
दादू : (एक पॉइण्ट स्कोर केल्यागत...) नाणार हा भूकंपाचा केंद्रबिंदू आहे, केंद्रबिंदू! 
सदू : (गोंधळून) बाप रे...मग तिथं कशाला जायचं? 
दादू : (समजूत घालत) नाणारला जाऊन तिथल्या लोकांना आधार देणं हा प्रत्येक पुढाऱ्याचा धर्म आहे! तू तिथं गेलं पाहिजेस!! तिथल्या लोकांच्या जमिनी हडप करून मोठा तेल प्रकल्प कोकणाच्या माथ्यावर मारण्याचा कट रचला जात आहे!! कोकणातल्या निसर्गाच्या मुळावर येणारा हा तेल प्रकल्प होऊ द्यायचा नाही म्हंजे नाही! 

सदू : (अंदाज घेत) हं...ऐकलं होतं मी! पण हे तुझ्या युतीसारखंच ना? 
दादू : (तडफेनं) नाही! नाही! नाही!! ह्यावेळेला मी...मी...आय ऍम सीरिअस! निसर्ग म्हटलं की मी पेटून उठतो हे तुला ठाऊक आहेच! मी उद्याच तिकडे निघतो आहे!! 
सदू : (उत्सुकतेनं) किती वाजताची बस आहे? 
दादू : (संशयानं) का रे? 
सदू : (खवचटपणाने) अंगाऱ्याची पुडी देणार होतो खिश्‍यात ठेवायला! हाहा!!! 
दादू : (संतापून) सद्या, तोंड सांभाळून बोल! लोकांसाठी राबणाऱ्या माणसाची अशी हेटाळणी करू नये!! मी नाणारला जाणार म्हंजे जाणार!! 
सदू : (डिवचत) तिथल्या लोकांनी तुला येऊ नकोस असं सांगितलंय ना? 
दादू : (दातओठ खात) मुझे रोकनेवाला अबतक पैदा नही हुआ!! मला नाणारबंदीचा हुकूम बजावणाऱ्यांना कोण पिना मारतंय, हे कळतं मला!! 

सदू : (आणखी डिवचत) कोण पिना मारतंय? 
दादू : (सावध होत) तुला काय करायचंय? कोणीही कितीही पिना मारो, त्या नाणारच्या जमिनीत एक खिळा ठोकू देणार नाही मी! बघशीलच तू!! 
सदू : (शहाजोग सल्ला देत) माझं ऐक...तिथं जाऊ नकोस! 
दादू : (पटवून देत) मी तिथं गेलो नाही तर हे कमळवाले बघता बघता केसानं गळा कापतील, आणि एक दिवस नाणारच्या त्या गावांमध्ये धूर ओकणाऱ्या चिमण्या दिसू लागतील!! पर्यावरणाचा नाश होईल! आंब्या-काजूच्या बागा करपतील, माड-सुपाऱ्या माना टाकतील कोकम सरबतासाठी एक रातांबा मिळायचा नाही की समुद्रातला एक मासा पोटात जायचा नाही! 
सदू : (एक पॉज घेत) ह्यातलं काहीएक होणार नाही, दादूराया! बघशील तू!! 

दादू : (डोळे बारीक करत) इतक्‍या आत्मविश्‍वासानं कसं काय सांगू शकतोस तू? प्रकल्पाच्या जमीन संपादनाचा अध्यादेश केव्हाच निघालाय! त्या अरबस्तानातल्या कंपनीसोबत करारदेखील झाला! आता फक्‍त धूर ओकणाऱ्या चिमण्या बाकी आहेत...प्रकल्पच होणार नाही असं म्हणतोस? चल लागली पैज! 
सदू : (एक डेडली पॉज घेत) मी माझ्या जाहीर सभेत सांगितलंय की काहीही करा, नाणार होणार नाही म्हंजे नाही! बरं पैज तर पैज!! नाणारला प्रकल्प झाला तर मी तुला टाळी देणार नाही! 
दादू : (उजळलेल्या चेहऱ्याने) चालेल! आणि झाला नाही तर मी तुला टाळी देणार नाही!! जय महाराष्ट्र! 
-ब्रिटिश नंदी 
 

Web Title: Pune Edition Article Editorial Article on bate of Nanar