एक बंगला बने न्यारा..! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

...सकाळी उठावे. शुचिर्भूत होऊन इडली हौसमध्ये फेरी टाकावी. चहाच्या दोन फेऱ्या कराव्यात. मग आपापत: पावले अण्णा मंदिराकडे वळतात. ती. अण्णा आहेत, म्हणून आमचे गाव आहे व आम्ही आहोत.

ती. अण्णासाहेबांचा बंगला हे आमच्यासाठी कुठल्याही देवळापेक्षा कमी महत्त्वाचे स्थान नाही. नव्हे, ते आमचे श्रद्धास्थानच आहे. तसे पाहूं गेल्यास आमची श्रद्धास्थाने दोनच. एक, सिद्धेश्‍वर आणि दुसरे लोकमंगलकार तीर्थस्वरूप अण्णा... आम्ही त्यांच्या बागेतील नळाचे पाणीही तीर्थ म्हणून प्राशू. 

...सकाळी उठावे. शुचिर्भूत होऊन इडली हौसमध्ये फेरी टाकावी. चहाच्या दोन फेऱ्या कराव्यात. मग आपापत: पावले अण्णा मंदिराकडे वळतात. ती. अण्णा आहेत, म्हणून आमचे गाव आहे व आम्ही आहोत. अण्णांच्या बंगल्यावरून सध्या जे काही रणकंदन चालले आहे, त्याने आमच्या अंगाची अगदी लाही लाही झाली. ती कशी शांतवावी? अखेर ती. अण्णांच्याच पावलांशी जावे असे मनाने घेतले... 
आम्ही गेलो, तेव्हा स्वत: अण्णा बागेतल्या फुलझाडांना पाणी घालत होते. ते दृश्‍य पाहूनच मन शांत झाले. अण्णांच्या टुमदार इवल्याशा बंगल्याच्या आवारात पक्षी किलबिलत होते. 

""अण्णा, अंगाची आगाग होतेय...तुम्ही इतके शांत कसे?'' आम्ही न राहवून विचारले. अण्णांनी कनवाळूपणाने आमच्या अंगावर पाण्याची नळी रोखली. नखशिखांत भिजून शहारल्यावर जरा बरे वाटले. सभोवार पाहियले, तो अण्णांचा टुमदार बंगला मोठ्या स्वागतशील नजरेने आमच्याकडे बघत होता. जणू आम्हाला म्हणत होता, "'ये रे ये, माझ्या कुशीत ये!'' 
हा बंगला बेकायदेशीर आहे असे म्हणणाऱ्याच्या.... आम्ही मनातल्या मनात दातोठ चावले. इतका शानदार बंगला बेकायदा? अशक्‍य! ! एका देवमाणसाला किती म्हणून छळायचे? ह्याला काही लिमिट? 

""अण्णा, हा बंगला बेकायदेशीर आहे, असं म्हणतात ते नतद्रष्ट लोक... येवढ्या झकास टायली !! बेकायदा भिंतींना असल्या टायली कोण लावते? छे !!'' आम्ही शर्ट पिळत म्हणालो. (खुलासा : अण्णांनी मारलेल्या पाण्याच्या नळीत सोलापूर असूनही पाणी होते !! असो.) 
""म्हणू देत... आपल्याला काय? आपण गरिबांची सेवा करावी !'' अण्णांनी गुलाबाच्या ताफ्याकडे नळी वळवली होती. आम्ही प्यांट कशी पिळून घ्यावी? ह्या विचारात अडकलो. दोन एकराच्या चिमुकल्या तुकड्यात विसावलेले हे निवासस्थान. गरिबागुरिबांचे मंदिर आहे. ह्या इथूनच लोकमंगलाची यंत्रणा चालते. ह्या इथूनच सोलापूरच्या विकासाला चालना मिळते. ह्या इथूनच सहकाराच्या सद्‌भावनेचा उगम होतो... आम्ही नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडले. 

अण्णासाहेबांसारखा नेक गृहस्थ उभ्या सोलापुरात सापडणार नाही. अत्यंत साधी राहणी, उच्च विचारसरणी. हमेशा समाजात मिळून मिसळून राहणारे सज्जन गृहस्थ. कुठल्याही पक्षात असो, त्यांचा सहकार निरंतर चालू असतो. लोकमंगलाचे असिधाराव्रत घेतलेल्या अण्णासाहेबांच्या व्यक्‍तिमत्त्वाबद्दल आम्ही पामरांनी काय बोलावे? ती. अण्णा म्हंजे एकप्रकारची शेंगाचटणीच. कुठल्याही थाळीत वाढा, लज्जत वाढवणारच !! अण्णासाहेबांनी बंगला बांधायला घेतला हेच मुदलात एक लोकमंगल कार्य होते व अजुनी आहे. कां की अण्णांचा बंगला हे आमच्या गावाचे भूषण आहे. किंबहुना, पुढे मागे (जर) गावात रिझर्व्ह ब्यांक आलीच तर तिचाही ऍड्रेस आम्ही "अण्णांच्या बंगल्यासमोर' असाच देऊ !! 

""अण्णा, तुमच्यासारख्या देवमाणसाला असे बोल लावणे, हा गुन्हा आहे. हे ऐकून आपला भडका कसा उडत नाही?"' आम्ही खोदून खोदून पुन्हा विचारले. 
""हा जागेचा गुण... कळलं?"' अण्णांनी मोहरा आमच्याकडे वळवल्याने आम्ही पुनश्‍च नखशिखांत भिजलो. 
""तो कसा काय?'' आम्ही. ""ही जागा "अग्निशमन'साठी आरक्षित होती. इथं वास्तू उभारताना आम्हाला कंप्लिट फायर कम्प्लायन्स प्रमाणपत्र घ्यावे लागले. फायर ब्रिगेडची जागा असल्याने इथं अंगाचा भडका उडतोच. पण म्हणूनच मी पाणी मारतोय ना?'' अण्णांनी खुलासा केला. आम्ही चमकून बघितले. 
...फायर ब्रिगेडच्या बंबाच्या पायपाने इतका वेळ अण्णा पाणी घालत होते तर ! आम्ही शतप्रतिशत वंदन केले. 
-ब्रिटिश नंदी 
 

Web Title: Pune Edition Article Editorial Article Of dhing Tang