वेशीवरती अडले घोडे...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

भाजपने कर्नाटकाच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी असा रंग चढवला आणि कर्नाटकात आपले संख्याबळ लक्षणीयरीत्या वाढविले. पण स्पष्ट बहुमताअभावी सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही बाजूंनी सौदेबाजीला ऊत येणार हे स्पष्ट झाले आहे. 

कर्नाटकमध्ये शतक गाठून भारतीय जनता पक्षाने "दक्षिण दिग्विजय' जरूर साजरा केला असला, तरीही या निवडणुकीच्या मतमोजणीत जे काही चढ-उतार बघायला मिळाले, ते कोणत्याही रोमहर्षक "थ्रीलर'पेक्षाही अधिक चित्तथरारक होते! अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या आणि कॉंग्रेस तसेच भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीच्या मतमोजणीस मंगळवारी सकाळी सुरवात झाली, त्यानंतरच्या चार-सहा तासांत प्रारंभी कॉंग्रेसने घेतलेली आघाडी, त्यानंतर भाजपने बहुमताच्या दिशेने मारलेली मुसंडी आणि अखेरीस पुन्हा निर्माण झालेली त्रिशंकू अवस्था बघता सरकार कोणाचे बनणार, या प्रश्‍नाचा निकाल गोवा तसेच मणिपूर या राज्यांप्रमाणे राजभवनातच लागणार, असे दिसत आहे. अर्थात भाजपला मिळालेले हे यश म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठबळावर अमित शहा यांनी राबविलेल्या रणनीतीचा जसा विजय आहे, त्याचबरोबर कॉंग्रेसचे डावपेच अयशस्वी ठरल्याचीही साक्ष आहे. 

कॉंग्रेसला या निवडणुकीत बसलेला फटका हा भाजपला मिळालेल्या यशापेक्षाही अधिक मोठा आहे. मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या हाच कॉंग्रेसच्या हातातील हुकमाचा एकमेव एक्‍का होता आणि सिद्धरामय्या विरुद्ध भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांच्यातील लढाईत सिद्धरामय्या हेच निर्विवाद बाजी मारतील, असे वातावरण प्रचाराच्या सुरवातीच्या काळात होते. त्यामुळेच भाजपने या लढाईस पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी असा रंग चढवला आणि मोदी यांच्याविरुद्धच्या या लढाईत राहुल यांच्या पदरी पुनश्‍च एकवार पराभव आला. अर्थात भाजपने या लढाईत साम-दाम-दंड-भेद या नीतीचा अत्यंत चतुराईने वापर केला. त्यासाठी सर्वप्रथम संघाच्या मुशीत पावन झालेले आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गजाआड जावे लागलेले येडियुरप्पा यांना सन्मानाने केवळ पक्षातच दाखल करून घेण्यात आले असे नाही तर त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणूनही घोषित करण्यात आले. त्याचवेळी ऐन निवडणुकीच्या तोंडावर बेल्लारीतील खाणमाफिया म्हणून कुप्रसिद्ध असलेले रेड्डी बंधूही तुरुंगातून बाहेर येतील याचीही दक्षता घेतली. 

शिवाय पन्नाप्रमुख उभे करण्याची अमित शहा यांची हमखास यशस्वी ठरणारी रणनीतीही मोठ्या कौशल्याने वापरली. या साऱ्याचा परिणाम म्हणूनच येडियुरप्पा यांच्याविना गेल्या निवडणुकीत अवघ्या 40 जागा जिंकणाऱ्या भाजपला हे मोठे यश मिळाले आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर राहुल गांधी यांच्या पदरी आलेला हा पहिला मोठा पराभव आहे. यदाकदाचित कॉंग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनी सरकार स्थापन केले तरी कॉंग्रेसच्या अपयशाचे गांभीर्य त्यामुळे कमी होत नाही. या अपयशामुळे वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांत कॉंग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष ठरला तर आपण पंतप्रधान बनू शकतो, अशा गमजा फुकाच्या तर ठरल्याच; शिवाय त्यांच्या नेतृत्वावर भले मोठ्ठे प्रश्‍नचिन्हही उभे ठाकले आहे. 

कॉंग्रेसच्या या पराभवामागे सिद्धरामय्या यांना "ट्रॅप'मध्ये अडकवण्याची खेळी होती. एक तर ते भाजपने धार्मिक ध्रुवीकरणासाठी सुरू केलेल्या हिंदुत्वाच्या सापळ्यात सापडले आणि त्याचबरोबर कर्नाटकात भाजपची पारंपरिक मतपेढी असलेल्या फार मोठ्या लिंगायत समाजाला "विशेष दर्जा' देण्याचा त्यांचा जुगारही अंगाशी आला. त्यांच्या या निर्णयामुळे जनता दल (एस) याचे कर्नाटकात 12 टक्‍के मतदार असल्यामुळे कळीचा पक्ष बनलेल्या पक्षाचे वोक्‍कलिग मतदार पेटून उठले आणि त्यांनी कुमारस्वामी यांना थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या दिशेने नेऊन ठेवले आहे.

मावळत्या विधानसभेत याच वोक्‍कलिग समाजाचे 224 पैकी 53 आमदार होते, ही बाब येथे ध्यानात घ्यावी लागते. त्यामुळे आता या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने पुनश्‍च एकवार मोदी यांच्या "कॉंग्रेसमुक्‍त भारत' या घोषणेला मिळालेले हे यश असल्याचा गजर सुरू केला आहे. मात्र, जवळपास भाजपइतकीच मते कॉंग्रेसने घेतल्यानंतरही कर्नाटक "कॉंग्रेसमुक्‍त' कसा काय झाला, हा प्रश्‍नच आहे. 

तरीही एक बाब निर्विवाद आहे आणि ती म्हणजे आता लोकांना कॉंग्रेसचे नेतृत्व राहुल यांनी करणे पसंत पडलेले नाही, यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे! त्यामुळे हे एका अर्थाने भाजपने घराणेशाहीच्या विरोधात केलेल्या प्रचाराला मिळालेले हे यश आहे, आणि त्यामुळेच आता कॉंग्रेस भले पक्षाध्यक्ष राहुलच असले तरी ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट अशा तरुण नेत्यांना ते संधी देणार काय, हा प्रश्‍नही अजेंड्यावर आला आहे.

कर्नाटकातील या यशामुळे भाजपला बळ मिळालेच आहे आणि त्याचे परिणाम राजस्थान, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड या चार महिन्यांवर आलेल्या निवडणुकांत उमटू शकतात. खरा प्रश्‍न लोकशाही टिकवण्यासाठी मजबूत विरोधी पक्षाची गरज असताना, कॉंग्रेस जनतेशी तुटलेली नाळ कशी जोडणार, हा आहे. त्याचे उत्तर राहुल गांधी यांनाच द्यावे लागणार आहे. 

 

Web Title: Pune Edition Article Editorial Article on Election Karnataka Result