न्यायदानातील मराठमोळा दीप

मयूर जितकर
सोमवार, 7 मे 2018

दिवाणी न्यायालयात नियुक्ती झालेल्या दीपा आंबेकर फौजदारी न्यायालयात काम पाहतील. त्या न्यूयॉर्कच्या पहिल्या महाराष्ट्रीय आणि दुसऱ्या भारतीय महिला न्यायाधीश आहेत. यापूर्वी चेन्नईच्या राजा राजेश्‍वरी यांनी भारतीय वंशाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होण्याचा बहुमान मिळविला होता. 

भारतीयांनी परदेशात विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविला आहे. "गुगल'चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, "मायक्रोसॉफ्ट'चे सत्या नाडेला ही काही ठळक उदाहरणे. न्यायदानाच्या क्षेत्रातही श्री श्रीनिवासन, अमूल थापर या भारतीय वंशाच्या कायदेतज्ज्ञांनी न्यायाधीशपदी विराजमान होत भारतीयांची मान उंचावली.

या मांदियाळीत आता दीपा आंबेकर हे मराठमोळे नाव झळकले आहे. न्यूयॉर्कसारख्या महानगराच्या दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशपदी आंबेकर यांची नुकतीच झालेली नियुक्ती मराठीजनांसाठी आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. 

दिवाणी न्यायालयात नियुक्ती झालेल्या दीपा आंबेकर फौजदारी न्यायालयात काम पाहतील. त्या न्यूयॉर्कच्या पहिल्या महाराष्ट्रीय आणि दुसऱ्या भारतीय महिला न्यायाधीश आहेत. यापूर्वी चेन्नईच्या राजा राजेश्‍वरी यांनी भारतीय वंशाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होण्याचा बहुमान मिळविला होता. 

खरेतर, दीपा आंबेकर यांची न्यायाधीश होण्याची इच्छा नव्हती. मात्र काही वर्षांपूर्वी आपल्या वरिष्ठ वकील सहकाऱ्याने न्यायाधीशपदासाठी अर्ज केल्याचे पाहून त्यांची महत्त्वाकांक्षा जागृत झाली. अमेरिकेत स्थायिक झालेल्या सुधीर आणि प्रज्ञा आंबेकर यांच्या त्या कनिष्ठ कन्या, तर पुण्यातील प्रथितयश डॉक्‍टर उपेंद्र वडगावकर यांच्या नात आहेत. त्यांचे बालपण न्यूजर्सीत गेले. अमेरिकेतील मिशिगन, ऍन आर्बर विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रामधून बी.ए.ची पदवी मिळविली. न्यूजर्सीमधील रूटगर्स लॉ स्कूलमधून पगाराच्या पैशातून फी भरून "जुयरिस डॉक्‍टर' ही कायद्याची पदवी त्यांनी संपादन केली. न्यूयॉर्क शहर परिषदेवर तीन वर्षे सीनियर लेजिस्लेटिव्ह ऍटर्नी या वरिष्ठ पदावर त्यांनी काम केले. 

तसेच शहराच्या नागरी सुरक्षा समितीचे सल्लागारपदही भूषविले. आंबेकर यांचे सामाजिक भानही प्रशंसनीय आहे. बी.ए. झाल्यानंतर वर्षभर "अमेरिकाकॉर्प्स' या सिव्हिल सोसायटीच्या उपक्रमांमधून समाजसेवा करताना, त्यांनी अटलांटा शहरात निम्न आर्थिक स्तरातील लोकवस्तीच्या शाळेत गरीब विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले.

त्याचप्रमाणे लॉ फर्ममधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून, अल्प वेतनावर "लीगल एड्‌स सोसायटी'चे वकीलपत्र स्वीकारले. या सोसायटीच्या माध्यमातून आपली बाजू मांडण्यासाठी वकील न परवडणाऱ्या दोन हजार पक्षकारांचे खटले त्यांनी लढविले आहेत. न्यूयॉर्कचे महापौर बिल दे ब्लासिओ यांची निष्पक्ष न्यायदानाची अपेक्षा त्या निश्‍चितच पूर्ण करतील, यात शंका नाही.

Web Title: Pune Edition Article Editorial Article on Marathmola Deep in judicial