मातीशी नाते राखणारा नेता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

बुलडाणा जिल्ह्यात निरक्षर, गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या भाऊसाहेबांनी परिस्थितीसमोर कधीच शरणागती पत्करली नाही. अतिशय संयम बाळगत खंबीरपणे मार्गक्रमण करणे हा त्यांचा पिंड होता.

राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मिक निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनामुळे शेती, शेतकरी आणि मातीशी नाळ कायम राखणारा नेता हरपला आहे. सुरवातीच्या काळात अतिशय प्रतिकूल स्थिती असतानाही स्वतःच्या कर्तृत्वावरील विश्वास ढळू न देता त्यांनी राज्याच्या राजकीय पटलावर आपले स्थान निर्माण केले.

बुलडाणा जिल्ह्यात निरक्षर, गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या भाऊसाहेबांनी परिस्थितीसमोर कधीच शरणागती पत्करली नाही. अतिशय संयम बाळगत खंबीरपणे मार्गक्रमण करणे हा त्यांचा पिंड होता. शालेय शिक्षण गावी पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते खामगाव आले व तेथेच त्यांच्यात राजकीय नेतृत्त्वाची बिजे रुजली आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी राजकारणात उडी घेतली. 

आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. केवळ राजकीयच क्षेत्रातच नव्हे, तर सर्वसामान्य लोकांच्या मनातही त्यांनी आदराचे स्थान मिळवले होते. कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवर खामगाव ते आमगाव ही साडेतीनशे किलोमीटरची काढलेली पदयात्रा त्यांच्या राजकीय जीवनातील मैलाचा दगड ठरली. दोन वेळा विधानसभेचे आमदार, तीन वेळा खासदार, तीन वेळा विधान परिषदेचे सदस्य, कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे कृषिमंत्री अशी त्यांची कारकीर्द बहरत गेली. सर्वसामान्य कार्यकर्ता आणि शेतकरी हा त्यांचा श्वास होता. राज्याच्या कृषिमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्यानंतर शाश्वत शेतीविकास हेच ध्येय त्यांनी ठेवले होते. 

उन्नत शेती, समृद्ध शेतकरी हे राज्याला मिळालेले अभियान, ही त्यांचीच संकल्पना होती. ग्रामीण भागात, विशेषतः वऱ्हाडात भाजप रूजविण्यामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. "शतप्रतिशत भाजप' ही त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळातील घोषणा होती. ग्रामीण भागाशी त्यांचा नेहमीच संपर्क राहिला.

परदेशात ज्या पद्धतीने शेतीमध्ये प्रयोग होतात, तसे प्रयोग आपल्याकडेही झाले पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला होता. प्रसंगी घरावर तुळशीपत्र ठेवून काम करण्याची मानसिकता असलेल्या पिढीतील भाऊसाहेब हे कदाचित शेवटचा दुवा असावेत. त्यांच्या आकस्मिक जाण्याने राज्याच्या राजकारणातील एक बहुजन चेहरा हरपला आहे. 

Web Title: Pune Edition Article Editorial Article on Pandurang Fundkar