प्लॅस्टिक "थैली'ची सुटली गाठ ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

प्लॅस्टिक वापरावरील निर्बंध शिथिल केल्याने, प्रचंड गाजावाजा करून अमलात आणलेल्या प्लॅस्टिकबंदीचा पुरता बोजवारा उडाला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने घेतलेल्या एका चांगल्या निर्णयावर घाईघाईने माघार घेतल्याने याबाबत गूढ निर्माण झाले आहे. 

महाराष्ट्रात गेल्या शनिवारपासून प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली, तेव्हाच ही बंदी कितपत टिकेल, याबाबत शंका-कुशंका व्यक्‍त करण्यात येत होत्या. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच प्लॅस्टिक थैल्यांना सरकारने मारलेली गाठ सुटली असून, आता किराणा सामान बांधून देण्यासाठी दुकानदारांना मुभा देण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते आणि या बंदीचा गेले चार दिवस डिंडीम विविध वृत्तवाहिन्यांवरून वाजविणारे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी डाळी, रवा, पोहे आदी वस्तू कागदी पिशव्यांतून देण्यात काही अडचणी येत असल्यामुळे, त्यावरील निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. ही अर्थातच वरवरची रंगसफेदी आहे; कारण काही वर्षांपूर्वीपर्यंत आपण रवा, पोहे आणि डाळीच काय, साखरही कशी कागदी पिशव्यांतूनच नव्हे, तर चक्‍क वर्तमानपत्रांच्या कागदात पुड्या बांधून आणत होतो, ते अनेकांना आठवत असणार ! त्यामुळे आताच त्याबाबत नेमक्‍या काय अडचणी निर्माण झाल्या आहेत, ते एक युवा नेते आदित्य ठाकरे आणि रामदास कदमच जाणो ! मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने घेतलेल्या एका चांगल्या निर्णयावर अशा रीतीने घूमजाव केल्यामुळे याबाबत गूढ निर्माण झाले आहे. 

हा निर्णय जाहीर झाला, तेव्हाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणुकांच्या तोंडावर घेतलेला हा एक "अर्थपूर्ण' निर्णय आहे, अशी टीका केली होती. बुधवारी ही बंदी अंशत: का होईना, शिथिल करण्याची घोषणा करण्यापूर्वी झालेल्या घडामोडी त्यामुळेच लक्षात घ्याव्या लागतात. बुधवारी किराणा दुकानदारांच्या संघटनेने प्रथम शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेतली आणि लगोलग त्याच्या उपस्थितीतच मंत्रालयात या व्यापाऱ्यांची मंत्रिमहोदयांसमवेत बैठक झाली आणि ही बंदी उठविण्यात आली. त्यामुळे प्लॅस्टिक थैल्यांना मारलेली ही गाठ म्हणजे निव्वळ "नीरगाठ'च होती, यावर शिक्‍कामोर्तब झाले. प्लॅस्टिकबंदीसारख्या इतक्‍या महत्त्वाच्या आणि मुख्य म्हणजे कदम यांच्या शब्दांत सांगायचे, तर "पूर्ण विचार, तसेच पूर्ण तयारी करून' घेतलेल्या या निर्णयाचा इतक्‍या घाईने फेरविचार झाल्यामुळेच त्यात काही काळेबेरे तर नाही ना, अशी शंका लोक घेऊ शकतात. 

मात्र कदम यांनी त्याबाबतही "पूर्ण विचार' केला असून, गिऱ्हाइकांना दिलेल्या प्लॅस्टिक थैल्या परत घेण्याची आणि त्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारीही त्याच किराणा दुकानदारांवर टाकण्यात आली आहे ! त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे दुकानदारांनीही ती मान्य केली आहे. याचा अर्थ पिंपरी-चिंचवड वा कोथरूड येथे राहणाऱ्या एखाद्याने पुण्याच्या तुळशीबागेत जाऊन काही खरेदी केली, तर ते गिऱ्हाईक परत तुळशीबागेत जाऊन ती प्लॅस्टिक पिशवी परत करेल वा त्याने तसे न केल्यास तो दुकानदार ती पिशवी त्याच्याकडून परत घेण्यासाठी थेट पिंपरी-चिंचवड वा कोथरूड येथे जाईल, असा दुर्दम्य विश्‍वास पर्यावरणमंत्र्यांना आहे ! त्यासाठी हे किराणा दुकानदार गिऱ्हाइकांचे पत्ते लिहून घेणार काय, असा प्रश्‍न मूढ जनांना पडू शकतो. आदित्य वा कदम यांचा दुकानदारांवर, तसेच ग्राहकांवर विश्‍वास असल्यामुळे त्यांच्या मनात अशी काही वाईटसाईट शंका येण्याचे कारणच नाही ! 

किराणा दुकानदारांना ही मुभा देताना कचऱ्याच्या डब्यात वापरल्या जाणाऱ्या काळ्या थैल्या, तसेच हॉटेलमधून खाद्यपदार्थ घेऊन जाण्यासाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक टीन यांनाही तूर्तास परवानगी देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यात तथ्य असेल तर प्रचंड गाजावाजा करून अमलात आणलेल्या प्लॅस्टिकबंदीचा पुरताच बोजवारा उडाला आहे, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. याचा अर्थ आपल्या देशात राज्यकर्ते, नोकरशहा, तसेच प्रशासकीय यंत्रणा कोणतीच बंदी यशस्वी होऊ देत नाही, असा होतो. सध्या महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी आहे, असे म्हणतात ! प्रत्यक्षात तो नाक्‍यानाक्‍यांवर उपलब्ध आहे. गुजरात तसेच महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असली, तरी तेथेही मद्य सहज उपलब्ध होऊ शकते. तुम्हाला चार पैसे अधिक मोजावे लागतात, एवढेच ! या तथाकथित प्लॅस्टिकबंदीचेही नेमके तेच झाले असते. त्याऐवजी ती बंदी अंशत: का होईना, शिथिल केलेली दिसते. आता ही अंशत: शिथिल झालेली बंदी "पूर्ण विचार' करून संपूर्णपणे मागे केव्हा घेतली जाते ते बघायचे. मग भले पर्यावरणाचे काही का होईना ! 
 

Web Title: Pune Edition Article Editorial on Plastic Ban Issues