शिक्षण-रोजगार दुव्याची "अभियांत्रिकी' 

Pune Edition Article on Education
Pune Edition Article on Education

पुण्यात नुकताच एक रोजगार मेळावा पार पडला. त्यात सुमारे 50 हजार तरुण होते. त्यामध्ये बहुसंख्य अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) पदवीधर होते आणि त्यांच्याकडे नोकरी नव्हती. आज या क्षेत्रांत पदवीधर काय किंवा पदवीधारक काय, दोन्हीकडे बेरोजगारी वाढत आहे. यातून कोणता मार्ग तरुणांनी काढायचा? सरकारची धोरणे बरोबर आहेत काय? अभियांत्रिकीचे शिक्षण आज नोकरीच्या दृष्टीने योग्य आहे काय? विद्यार्थ्यांना हुनर, कौशल्ये आपण देतो का? पदवी-पदविका घेऊनही नोकरी का मिळत नाही? असे अनेक प्रश्‍न आहेत. शिक्षण व नोकरी हे समीकरण बिघडले तर त्याचे गंभीर परिणाम संभवतात. आजच या समस्येचा विचार करायला हवा. 

पूर्वी प्रत्येक पालकाला आपले मूल अभियंता किंवा डॉक्‍टर व्हावे,असे वाटायचे.या क्षेत्रांत पदवीनंतर चांगली नोकरी मिळायची. नंतर परिस्थिती बदलली. लोकसंख्या वाढली. वाढत्या मागणीनुसार महाविद्यालयांची संख्याही फारच वाढली. सरकारी महाविद्यालयांपेक्षा खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या प्रचंड वाढली. विद्यापीठे, यू.जी.सी. आणि ए.आय.सी.टी.ई. या संस्थांनीही या वाढीला परवानगी दिली. पदवीधरांची संख्या वाढली. मात्र, दुर्दैवाने गुणवत्ता फार कमी झाली. ""असे फक्त 10 ते 20टक्के पदवीधर नोकरीकरिता विचार करण्याच्या लायकीचे आहेत,'' असा शेरा उद्योगांकडून अलीकडे ऐकू येतो. बऱ्याच महाविद्यालयांत शिक्षक, वर्गखोली वा प्रयोगशाळा नाहीत. तरीही पदवी मिळते. मात्र, यामुळे नोकरी मिळत नाही. "आडांत नाही तर पोहऱ्यांत कुठून येणार?' संख्या आणि गुणवत्ता यांचा समतोल राखायचा असतो, हे शिक्षणक्षेत्र विसरले. 

गेल्या 20 वर्षातील देशाच्या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्रही पुढे राहिला; परंतु ही प्रगती अभियांत्रिकी क्षेत्रात फारशी झाली नाही. एकीकडे माहिती-तंत्रज्ञानाच्या (आय.टी.) क्षेत्रात भारताने झेप घेतली. त्यात लाखो अभियांत्रिकी पदवीधरांना नोकऱ्या मिळाल्या; पण हे चित्रही आता बदलत आहे. या क्षेत्रातील नियम जाचक होत आहेत. मंदीसदृश स्थितीही आहे. नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे, शिवाय नवीन तंत्रज्ञानामुळे नोकरीसंधींचे प्रमाण कमी होत आहे. जवळजवळ 60 टक्के सेवा क्षेत्र असून वस्तुनिर्माण क्षेत्र फक्त 17 टक्‍क्‍यांवर आले आहे. सरकारतर्फे "मेक इन इंडिया,' "स्टार्ट अप इंडिया,' "डिजिटल इंडिया' अशा योजना जाहीर झाल्या; पण त्यामुळे रोजगार वाढला काय? आता आय.टी.काय किंवा सेवाक्षेत्र काय, उत्पादन काय किंवा अभियांत्रिकी काय, सरकारी काय किंवा खासगी काय, मनुष्यबळ चांगल्या दर्जाचे असणे आवश्‍यक आहे. त्याकरिता एकदा नोकरीला चिकटल्यानंतर सगळे काही झाले, असे न मानता काही नवे शिकायची उमेद ठेवण्याची गरज आहे. कारण, कधी कधी वरिष्ठांचीही नोकरी जाण्याची वेळ येत आहे. अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता वाढवली आणि वेळेनुसार त्या शिक्षणांत बदल केले तर नोकरी आणि शिक्षण हे समीकरण नक्की सुधारेल. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमेशन, मॉडर्न टेलिकम्युनिकेशन्स यांसारखे विषय सर्व विद्यार्थ्यांना शिकवायची गरज आहे. कारण, या ज्ञानामुळे विद्यार्थी उद्याचे उत्तम अभियंते ( इंजिनिअर) बनतील.

जुने अभियांत्रिकी ज्ञान हे "ऍनॅलिसिस'वर आधारित होते. आता "सिंथेसिस'वर आधारित ज्ञानाची गरज आहे. या दृष्टिकोनातून प्रकल्पांवर भर देणे गरजेचे आहे. "कमवा आणि शिका', या धर्तीवर "करून पाहा आणि शिका' या दृष्टिकोनाची गरज आहे. समाजापुढे पाणी, वीज, रस्ते,ऊर्जा यांसारख्या मूलभूत समस्या उभ्या आहेत. यावर विद्यार्थ्यांनी विचार करून काही उपाय कार्यान्वित करणे आवश्‍यक आहे. शिक्षणाने व्यक्तिमत्त्व घडते. व्यक्तिमत्त्व घडायला सवयी चांगल्या लागतात. चांगल्या सवयी, चांगले प्रकल्प स्वतःच्या हातांनी केले, तर आत्मसात होतात आणि चांगल्या प्रकल्पांच्या कल्पना विद्यार्थी व शिक्षक यांच्या डोक्‍यांतून निर्माण व्हायला हव्यात. शिक्षण उत्तम प्रकारे बनवले तर जे पदवीधर निर्माण होतील त्यांच्या हातांत पदवीचा कागद नव्हे, तर त्यांनी बनवलेले प्रकल्प असतील आणि डोक्‍यांत नवीन कल्पना असतील. अशा पदवीधरांना नोकरी मिळण्यात अडचण येणार नाही. 

पदवीधरांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया शिक्षणाच्या दोन महत्त्वपूर्ण विभागांवर उभा असतो. एक म्हणजे वर्गातले शिक्षण आणि दुसरे म्हणजे वर्गाबाहेरचे. क्रीडा आणि कला या विभागांतले शिक्षणही महाविद्यालयाच्या चार वर्षांत होत असते. कलेमुळे विद्यार्थ्यांची मानसिक वृत्ती घडते, तर खेळामुळे शारीरिक आणि सांघिक वृत्ती बनते. याचा आयुष्यभर उपयोग होतो. अशा पदवीधरांना की जे वर्गातल्या शिक्षणात गुणवान आहेतच; पण वर्गाबाहेरच्या कला आणि खेळ या शिक्षणांत प्रवीण आहेत, अशांना नोकऱ्या आपणहून चालत येतात. माझा एक मित्र पदविकाधारक होता; पण तो जवळजवळ बारा-तेरा खेळांमध्ये पारंगत होता. त्याने आपले अभियांत्रिकीचे करिअर इतके गाजवले, की तो एका मोठ्या कंपनीत जी.एम.सारख्या मोठ्या हुद्यावर होता. निवृत्त झाल्यावर बऱ्याच कंपन्यांना त्यानी सल्ला दिला. माझ्या मते तो वर्गाबाहेरच्या शिक्षणाचा पीएच.डी.धारक होता! थोडक्‍यात म्हणजे, शिक्षणाचा उद्देश बहुआयामी व्यक्तिमत्त्व घडवण्याचा आहे. तो लक्षात घेऊन महाविद्यालय आणि विद्यापीठ यांनी गोष्टी बदलल्या पाहिजेत. मेंढरासारखे विद्यार्थी वर्गात भरायचे, घोकंपट्टीप्रमाणे शिकवायचे आणि शिकायचे, तीन तासांची परीक्षा नावाचे नाटक करायचे, अशा पद्धतीने नोकरी मिळत नाही आणि आयुष्यातही यश मिळत नाही. 

शिक्षणक्षेत्रात, तसेच व्यावसायिक क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने होत आहे. गणित असो किंवा इलेक्‍ट्रॉनिक्‍स असो, आज इंटरनेटवर प्रचंड माहिती उपलब्ध आहे. "गुगल' आणि विकीपीडिया यांनी माहिती क्षेत्रांत धमाल उडवून दिली आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा, अशी अपेक्षा आहे. बऱ्याच कंपन्या अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य देतात. "तुम्ही डिजिटल एकलव्य आहात का?' असाल तर कंपनीत तुम्हाला प्रवेश चटकन मिळतो, तेव्हा चतुर विद्यार्थी आज डिजिटल क्षेत्रांत पारंगत होत आहेत. कॉलेज आणि विद्यापीठे यांनीसुद्धा या बदलाची नोंद करून अभ्यासक्रम बदलायची गरज आहे. 

शिक्षण ही आयुष्यभर सावलीप्रमाणे राहणारी गोष्ट आहे. "तुम्ही कॉलेजनंतर काय शिकता?', या प्रश्‍नाच्या उत्तरावर तुमच्या व्यावसायिक करिअर ग्राफ वर-खाली होतो; पण "लाइफलॉंग लर्निंग' म्हणजे आयुष्यभर शिक्षणाचा पाया प्रत्येक पदवीधराने महाविद्यालयात घातला पाहिजे. आज मॅनेजरांना काढण्यात येते, तेव्हा त्यांच्यात "लाइफलॉंग लर्निंग'चा अभाव जाणवतो. नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि आत्मसात करण्याची गरज जशी तरुणांना, तशी आज प्रौढांनापण आहे. कारण, त्याचा नोकरीशी संबंध आहे. परिस्थितीनुसार बदल घडवून, नवीन विचार करून पदवीधरांनी, शिक्षणतज्ज्ञांनी व सरकारने बदल घडवून आणले, तर बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊन समाजस्वास्थ्य सुधारेल. 

"कमवा आणि शिका', या धर्तीवर "करून पाहा आणि शिका' या दृष्टिकोनाची गरज आहे. शिक्षणरचना उत्तम असेल तर त्यातून बाहेर पडणाऱ्या पदवीधरांच्या हातांत पदवीचा कागद नव्हे, तर त्यांनी बनवलेले प्रकल्प असतील आणि डोक्‍यांत नवीन कल्पना असतील. अशा पदवीधरांना नोकरी मिळण्यात अडचण येणार नाही. 

- डॉ.संजय धांडे 
चेअरमन, बोर्ड ऑफ गव्हर्नर, एन.आय.टी, दिल्ली 
व एन.आय.टी.ई.मुंबई. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com