बुम बुम बुमरा (मुद्रा)

बुम बुम बुमरा (मुद्रा)

सरत्या वर्षाचा सूर्य अस्ताला जात असताना "टीम इंडिया"च्या' नव्या रूपाचे तांबडे फुटू लागले आहे. विराट कोहलीच्या या संघाने मेलबर्नमध्ये मिळवलेला ऐतिहासिक विजय नव्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये भारताचाच बोलबाला राहाणार, याची ग्वाही देणारा होता. ऑस्ट्रेलियाचा हा संघ सामर्थ्यवान आहे की नाही हा प्रश्न नाही; परंतु एखाद्याच्या साम्राजात जाऊन ललकारी देण्यास धैर्य आणि कुवत लागते. ती या संघात आहे. आणि त्याला जसप्रीत बुमरा नावाच्या वेगवान गोलंदाजाची तोफ मिळाली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या "बॉक्‍सिंग डेला' सुरू झालेल्या या सामन्यात भारतीयांनी नॉकआऊट पंच दिला तो बुमरामुळे. प्रगती कशी असते पाहा. याच वर्षाच्या सुरवातीला त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पदार्पणात पाच विकेटची कामगिरी केली आणि वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध नऊ विकेट काढल्या. प्रगतीचा असा आलेख क्रिकेट वर्षात अन्य कोणत्याही गोलंदाजाला साधला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये बुमरा सध्याचा सर्वोतम गोलंदाज आहे, अशी शाबासकी विराट कोहलीने जाहीरपणे दिली, हे त्यामुळे स्वाभाविकच. आगळ्यावेगळ्या शैलीचा हा गोलंदाज. टेनिस क्रिकेटमधून तो पुढे आला. "आयपीएल'मध्ये "मुंबई इंडियन्स'मधून खेळत होता, तेव्हा "टीम इंडिया'चा नंबर वन गोलंदाज होईल, असे वाटले नव्हते.

फार तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटपर्यंत त्याची मर्यादा असेल, असेही काहींचे मत होते. पण अचूकता आणि भेदकता असली की पांढऱ्या रंगाचा चेंडू असो वा लाल रंगाचा, फलंदाजाला तो दबावाखाली ठेवतोच. दक्षिण आफ्रिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत जेथे एकापेक्षा एक वेगवान गोलंदाज तयार झाले आहेत, तेथे बुमराने दहशत बसवावी, हे "टीम इंडिया'च्या प्रगतीच्या चढत्या आलेखाचे द्योतक आहे. भारतीय संघ हा सर्वोत्तम फलंदाजांचा संघ समजला जायचा; परंतु आता तेजतर्रार वेगवान गोलंदाजांचाही असल्याची ओळख निर्माण होत आहे.

कसोटी सामने जिंकायचे असतील तर 20 विकेट घेणारे गोलंदाज असावे लागतात. परदेशात तर वेगवान गोलंदाजांची फारच आवश्‍यकता असते. बुमराने या वर्षात परदेशात 45 तर महम्मद शमीने 43 विकेट मिळवून भारताची ताकद दाखवली. "हमसे ना टकराना, हमसे है जमाना.."टीम इंडिया'ने जणू हा इशारा नव वर्ष सुरू होताना क्रिकेट विश्वाला दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com