उत्फुल्ल कारंजे (श्रद्धांजली)

उत्फुल्ल कारंजे (श्रद्धांजली)

जाड फ्रेमचा चष्मा, चेहऱ्यावर काहीसे बावळट भाव आणि डोळ्यात बेरकीपणा... अशा अवतारात किशोर प्रधान अवतरले की रंगभूमी किंवा चित्रपटांच्या पडद्याची चौकट आपापत: अस्फुट हसू लागे. रसिकांना हसवण्यासाठी त्यांना कधीच कमरेखालच्या विनोदाची गरज पडली नाही, की कधी स्त्रीवेष धारण करून टोमणेवजा ऍडिशन्स घेत हशे फोडण्याचा खटाटोप करावा लागला नाही. संहितेतील संवादांना पुरेसा न्याय देत ते भूमिकेत आपले रंग भरत असत. भाषेवरचे उत्तम प्रभुत्व त्यांच्या भूमिकांना आणखी वेगळा आयाम देत असे. 1970च्या आसपास त्यांचे "काका किश्‍याचा' हे प्रहसन रंगभूमीवर आले, तेव्हा खरे तर मराठी रंगमंचावर विनोदी अभिनेत्यांचा वावर वाढला होता.

शरद तळवलकरांपासून बबन प्रभूंपर्यंत कितीतरी हशेबाज विनोदवीरांनी मराठीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. तो काळच अभिजात आणि काहीशा मध्यमवर्गीय विनोदाचा होता. त्यात किशोर प्रधान यांच्या एण्ट्रीने आणखी एक चांगली भर पडली. प्रहसने आणि विनोदी भूमिका त्यांच्या हातखंडा होत्याच, पण दारव्हेकर मास्तरांनी त्या काळी लिहिलेल्या "कल्पनेचा खेळ' या गूढनाट्यातही प्रधानांनी कमाल साधली होती. या अभिनेत्याला हसवता येते, तसेच रडवताही येते, इतकेच नव्हे तर घाबरवताही येते, या जाणिवेने रसिक सुखावले होते. उत्तम बुद्धिमत्ता लाभलेल्या प्रधानांनी समाजविज्ञानातील अत्युच्च पदवी घेऊन उच्चपदांवर चाकरीही व्यवसायभावनेने केली.

उपजीविकेचा हात न सोडता आपली जीविका मात्र अभिनयक्षेत्रातच आहे, याचीही खूणगाठ बांधून ते कार्यरत राहिले. विचारांमध्ये सुस्पष्टता असली की धरसोड वृत्ती उरत नाही. किशोर प्रधान हे त्याचे उदाहरण. म्हणूनच तरुण पिढ्यांसाठी ते नेहमीच आधारवडासारखे राहिले. मराठी वा इंग्रजी रंगभूमीवर त्यांचा लीलया संचार असे. इंग्रजी नाटकांसोबत त्यांनी देशोदेशी दौरेही केले. चित्रपटांमध्येही छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. "मुन्नाभाई'मधला त्यांनी साकारलेला आजोबा किंवा जब वी मेट'मधला स्टेशन मास्तर दीर्घकाळ स्मरणात राहील. 

अभिनेत्यांच्या मांदियाळीत बिनीच्या अभिनयसम्राटांच्या यादीत प्रधान यांचे नाव कधी समाविष्ट झाले नाही, पण तरीही अनेकांसाठी ते आधारस्तंभ होते. किंबहुना, मुंबई महानगरीतल्या धडपड्या इंग्रजी रंगभूमीने नेहमीच त्यांच्याकडे एक दिलासादायक व्यक्‍तिमत्त्व म्हणूनच पाहिले. प्रधान हे रंगभूमीवरील पायदिव्यांच्या उजेडात उजळून निघालेले एक उत्फुल्ल कारंजे होते. ते अखेर थंडावले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com