पोलादी भिंतीआडची अस्वस्थता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

एवढेच नव्हे; घटनेत बदल करून त्यांच्या विचारसरणीचे कौतुक करून त्याच्या अंगिकाराचे समर्थन करण्यात आले. त्यांची कम्युनिस्ट पक्ष आणि स्वाभाविकतः देशावरील सत्ता अबाधित झाली. त्यालाच छुपा विरोध आहे, जनता गुदमरत आहे, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला करकचून बांधल्याचा प्रत्यय देणाऱ्या अनेक घटना घडल्यात.

जेथे जुलूम-जबरदस्ती होते तिथे अंतस्थ खदखद असते, याचा प्रत्यय कम्युनिस्ट राजवटीतील अनेक देशांत आला. तेथील राजवटी उलथवण्यासाठी जनतेनेच पुढाकार घेतला. त्या लयाला गेल्या. याचा वारादेखील चीनमध्ये फिरकू नये, यासाठी तेथील राज्यकर्त्यांनी सातत्याने आटापिटा केला. चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांच्या हाती अमर्याद सत्ता देण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच दोनदा अध्यक्षपद भूषवण्याच्या मर्यादेला तिलांजली देण्यात आली.

एवढेच नव्हे; घटनेत बदल करून त्यांच्या विचारसरणीचे कौतुक करून त्याच्या अंगिकाराचे समर्थन करण्यात आले. त्यांची कम्युनिस्ट पक्ष आणि स्वाभाविकतः देशावरील सत्ता अबाधित झाली. त्यालाच छुपा विरोध आहे, जनता गुदमरत आहे, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला करकचून बांधल्याचा प्रत्यय देणाऱ्या अनेक घटना घडल्यात. दोनच दिवसांपूर्वी बीजिंगमधील त्सिंगुआ विद्यापीठातील कायद्याचे अभ्यासक प्रा. झु झांगुरून यांचा प्रबंध प्रसिद्ध झाला आणि शी जिनपिंग यांची धोरणे, आर्थिक प्रश्‍नावरील भूमिका, तहहयात अध्यक्षपदासाठी केलेले बदल, भ्रष्टाचारविरोधातील त्यांची पावले, सीमाप्रश्‍नावरील ताठर भूमिका अनेकानेक मुद्दांच्या अनुषंगाने त्यांच्या राजवटीत असलेल्या असंतोषाला एका अर्थाने वाट मिळाली.

ज्यावेळी शी जिनपिंग यांची फेरनिवड झाली, त्या वेळीही त्यांच्यावर टीका करणारे पुढे आले. एचबीओवरील विनोदी टीकाटिपण्णी करणारे जॉन ऑलिव्हर यांनी केलेली थट्टा चिनी पहारेकऱ्यांना एवढी झोंबली, की त्यांनी एचबीओला हद्दपार केले. दोंग याकियांग या महिलेने शी जिनपिंग यांच्या पोस्टरवर शाई फेकली आणि त्यानंतर ती गायबच झाली. एवढेच नव्हे, तर "एम्परर', "टू टर्म' "लिमीट', "कंट्रोल', "ऍनिमल फार्म', "1984', "ब्रेव्ह न्यू वर्ल्ड' अशा शब्दांनाच सोशल मीडियावरून हद्दपार केले. या घटनांतूनच चीनमधील घट्ट पोलादी पकडीचा प्रत्यय येतो.

1989 मध्ये बीजिंगमधील प्रसिद्ध थ्यान अन्‌ मन चौकात मानवतावाद्यांची धरपकड झाली. त्यांना चिरडून टाकत, त्यांच्या मागण्यांची वासलात लावली गेली. त्याला पुढील वर्षी 30 वर्षे होत आहेत. परिस्थिती तशीच आहे. बुद्धिजीवी वर्गातील घुसमट झांगरून यांनी व्यक्त केली आहे. त्याने शी जिनपिंग यांच्या साम्राज्याला सुरुंग लागणार नाही, पण सगळेच आलबेल आहे, असेही नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article on Marm