मर्म : 'विवेका'शी फारकत

बुधवार, 22 मे 2019

"ट्‌विटर', "फेसबुक', "व्हॉट्‌सऍप' अशी समाज माध्यमे हाताशी आहेत म्हणून त्यांचा मनाला येईल तसा वापर करण्याची प्रवृत्ती अलीकडे फोफावली आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने ऐश्‍वर्या रॉय हिच्या वैयक्तिक जीवनाविषयी केलेला "ट्‌विटट्‌विटाट' हे त्याचे ताजे उदाहरण.

"ट्‌विटर', "फेसबुक', "व्हॉट्‌सऍप' अशी समाज माध्यमे हाताशी आहेत म्हणून त्यांचा मनाला येईल तसा वापर करण्याची प्रवृत्ती अलीकडे फोफावली आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने ऐश्‍वर्या रॉय हिच्या वैयक्तिक जीवनाविषयी केलेला "ट्‌विटट्‌विटाट' हे त्याचे ताजे उदाहरण. "एक्‍झिट पोल' आणि ऐश्‍वर्या रॉय हिचे वैयक्तिक जीवन यांची ओढूनताणून सांगड घालणाऱ्या या "ट्विट'मध्ये कल्पकता वा सर्जनशीलता शोधणे, हीच मुळात नस्ती उठाठेव म्हणावी लागेल.

स्त्रीचा अवमान करणारी आणि कल्पनादारिद्य्राचे दर्शन घडविणारी ही त्याची टिप्पणी आहे. परंतु, चोहोबाजूंनी टीका होऊनही काल दिवसभर विवेक ओबेरॉय आपल्या त्या टिप्पणीचे उद्दाम समर्थन करीत राहिला. अखेर चोवीस तासांनी त्याने माफी मागितली. त्याला खरोखर उपरती झाली, की कोणी कान पिळल्याने तो भानावर आला, हे कळायला मार्ग नाही. परंतु, ही प्रवृत्ती हा काळजीचा विषय आहे. त्याने आपल्या "ट्विट'मध्ये सलमान खान आणि ऐश्‍वर्या यांचा एकत्रित फोटो पोस्ट केला व त्याला "ओपिनियन पोल' म्हटले. त्यानंतर स्वतः विवेक ओबेरॉय व ऐश्‍वर्याच्या फोटोच्या बाजूला "एक्‍झिट पोल'; तर अभिषेक बच्चन, ऐश्‍वर्या व आराध्या यांच्या फोटोच्या बाजूला "रिझल्ट' म्हटले आहे. ही पोस्ट सध्याचा काळ पाहता व्हायरल झाली असल्यास नवल नाही. खरे म्हणजे स्त्रीविषयीची अनुदार वृत्ती, थिल्लरपणा आणि किडलेल्या मनोवृत्तीचा हा "कोलाज' आहे, असे म्हटले पाहिजे. 

अलीकडे राजकीय वरदहस्त मिळाला, की अनेक सेलिब्रिटींना वेगळेच अवसान चढते. विवेक ओबेरॉय याने तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या "बायोपिक'मध्ये मोदींची भूमिका साकारली आहे. पण, त्यामुळे आपण "अधिक समान' आहोत, असे त्याला वाटू लागलेले दिसते.

राष्ट्रीय महिला आयोगाने या उपद्‌व्यापांची गांभीर्याने दखल घेतली, हे बरे झाले. ज्यांनी आधुनिक माध्यमे हाताळण्याचा आदर्श घालून द्यायचा, तेच अशारीतीने "विवेका'शी फारकत घेत असतील आणि विचारांऐवजी विकारांना वाट करून देण्यासाठी माध्यमे वापरत असतीला, तर तो काही विशिष्ट व्यक्तींपुरता प्रश्‍न राहत नाही; तो समाजाच्या एकूण आरोग्याचा प्रश्‍न बनतो.