करड्या शिस्तीचे चंदुमास्तर (नाममुद्रा)

नरेंद्र चोरे
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

शिष्य कितीही प्रतिभावान असला, तरी जोपर्यंत चांगला गुरू मिळत नाही तोपर्यंत त्याची अपेक्षित प्रगती होऊ शकत नाही. निदान विदर्भाच्या रणजी संघाला तरी हे वाक्‍य लागू पडते. येथील क्रिकेटपटूंमध्ये भरपूर "टॅलेंट' असूनही संघाला गेल्या 70 वर्षांमध्ये एकदाही बीसीसीआयची स्पर्धा जिंकता आली नाही.

शिष्य कितीही प्रतिभावान असला, तरी जोपर्यंत चांगला गुरू मिळत नाही तोपर्यंत त्याची अपेक्षित प्रगती होऊ शकत नाही. निदान विदर्भाच्या रणजी संघाला तरी हे वाक्‍य लागू पडते. येथील क्रिकेटपटूंमध्ये भरपूर "टॅलेंट' असूनही संघाला गेल्या 70 वर्षांमध्ये एकदाही बीसीसीआयची स्पर्धा जिंकता आली नाही. मात्र, चंद्रकांत पंडित नावाचा "खडूस' गुरुजी भेटला आणि विदर्भ संघाला शिस्तच लागली नाही, तर त्याचे भाग्य उजळून निघाले. विजेतेपद हे दिवास्वप्न वाटणाऱ्या विदर्भाने त्यांच्या मार्गदर्शनात सलग दोन वेळा रणजी आणि तेवढेच इराणी करंडक असे एकूण चार विजेतेपद पटकाविले. 

विदर्भाच्या "छप्पर फाड' यशात जसा व्हीसीएने उभारलेल्या पायाभूत सुविधांचा महत्त्वाचा वाटा आहे तेवढाच प्रशिक्षक पंडित यांनी घेतलेल्या मेहनतीचाही आहे. दोन वर्षांपूर्वी विदर्भ संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे त्यांनी स्वीकारल्यानंतर कुणालाही चमत्काराची अपेक्षा नव्हती. विदर्भाच्या खेळाडूंमध्ये "टॅलेंट' होते. केवळ त्यांची मानसिकता बदलविण्याची आवश्‍यकता होती. पंडित यांनी मागील दोन वर्षांत नेमक्‍या याच गोष्टीवर मास्तर बनून लक्ष केंद्रित केले. विजेता होण्यासाठी केवळ "टॅलेंट' असून चालत नाही. खेळाडूंमध्ये विजयाची भूकही असावी लागते. ही भूक निर्माण करण्याचे काम त्यांनी जाणीवपूर्वक केले. 

क्रिकेटजगतात खडूस हा शब्द आपला खेळ आणि जिगर दाखवून सिद्ध करणाऱ्या मुंबईकडून खेळलेल्या पंडित यांची शैली मुळात इतर प्रशिक्षकांच्या तुलनेत वेगळी आहे. खेळाडूंकडून चांगली कामगिरी करवून घेण्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. अनेक वेळा खराब कामगिरी करणाऱ्या वरिष्ठ खेळाडूला संघाबाहेर करण्याचे धाडस त्यांनी दाखविले. वेळप्रसंगी आपण फैज फजलसारख्या खेळाडूला थापड मारण्यातही मागेपुढे पाहणार नाही, असे त्यांनी मध्यंतरी बोलून दाखविले. तर, काहींना असा प्रसाद दिल्याची आठवणही त्यांनी सांगितली. त्यांच्या "सिरियस' वावरामुळे अखेर संघाचे भलेच झाले.

गतवर्षी रणजी करंडक जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी पुढील वर्षाची तयारी सुरू केली होती. त्यांनी खेळाडूंमध्ये आत्मविश्‍वास, जिद्द व संघभावना निर्माण केली. चंदूमास्तरांसारखे मास्तर मिळणे, ही एखाद्या संघासाठी भाग्याची गोष्ट असते.
 

Web Title: Pune Edition Article NamMudra