आनंद संकल्पाचा (पहाटपावलं)

आनंद संकल्पाचा (पहाटपावलं)

बरेच काही सरलेले, थोडे उरलेले ते घेऊन नववर्षात पदार्पण करावे लागते. अलीकडच्या काळात एका वर्षाचा विचार केला, तर ते वर्ष संपते कधी नि कसे याचा थांगही लागत नाही, इतके जग गतिमान झाले आहे. जणू काळाला ओलांडून जग पुढे सरकत आहे. "रात्र थोडी सोंगे फार' असेच काहीसे अलीकडे झाल्याचे दिसते. त्यामुळे प्रत्येकाचे वय नुसते वर्षावर्षाने वाढत जाते, पण हाती काही लागत नाही, असे वर्षअखेरीस जाणवते. म्हणून माणूस पुन्हा नव्या वर्षात नवा संकल्प करतो. पहिल्या दिवशी ते ठरते आणि वर्षाच्या शेवटीच केलेला संकल्प झोपेतून दचकून जागे व्हावे तसे एकदम आठवतो.

"अरे, हे करायचेच राहून गेले,' अशी चुटपूट मनाला लागून राहते. नवीन वर्षाची पुन्हा सुरवात होते. हे गणित थांबत नाही. फक्त आयुष्याची बेरीज वाढत जाते. हळूहळू काळाच्या ओघात संकल्प करण्याचा काळही संपून जातो. मग तो अमलात आणण्याचा प्रश्‍नच उरत नाही. नवीन काही करण्याची तयारी करेपर्यंत ते वर्ष कधी निसटून जाते ते कळत नाही. त्यामुळे जुन्या विचाराने जे झाले, केले आणि घडले याचा विचार केव्हाही सोपा व चांगला असतो. जे झाले, ते का झाले? त्यातून आपण काय शिकलो. चुका लक्षात घेऊन त्या पुन्हा करायच्या नाहीत हे कटाक्षाने पाळले, तर आपण दुरुस्त होतो, म्हणजे एका अर्थाने घडतो. मूर्तीकार मूर्ती बनवताना चिखलाच्या गोळ्याला हवा तो आकार देतो, बिघडलेला आकार काढून टाकतो.

आपले जीवन हे काहीसे असेच असते. मागील चुका टाळून या वर्षात आपण नवीन काय शिकलो? जगण्याची परिभाषा कशी बदलली अशा गोष्टींचा विचार करणे अधिक चांगले असते. आजचा विचार उद्या कदाचित अर्थहीन वाटतो. काळानुसार सगळ्याच संकल्पना-धारणा बदलताना दिसतात. आपण ज्याला ज्ञान समजतो, ते अज्ञान कसे ठरते हे काळ शिकवतो. जुन्या धारणांना चिकटून न राहता जे आणि जसे पुढ्यात येईल, जसे अनुभवले जाईल त्यानुसार त्याचा अर्थ लावण्याची म्हणजेच नवीन वर्षाच्या निमित्ताने शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. जगण्यातले नावीन्य शोधत जगता आले पाहिजे. तरच जीवनाचे आस्वादमूल्य वाढेल. आनंदाचे गाणे ओठावर येईल. हे थोडेथोडके नाही, पण बहुधा संकल्प म्हणजे काय तेच आपल्याला कळलेले नसते. इच्छा म्हणजे संकल्प नव्हे. या दोन्ही आपल्या मनाच्या धारणा असल्या तरी त्यांच्यात फरक असतो.

आपण हरघडीला नवनव्या इच्छा करीत असतो. पण पाण्यावरच्या बुडबुड्यासारख्या त्या लगेच नष्टही होत असतात. संकल्पाचे तसे नसते. त्यामध्ये इच्छा अधिक काहीतरी असते. वाट्टेल ते होवो, "शेंडी तुटो वा पारंबी' अमुक गोष्ट मी करणारच असा निर्धार त्यात असतो. काळ कोणताही असला तरी आपण मनापासून ठरवले तर अशक्‍य ते शक्‍य करू शकतो. माणसात ती ताकद असते. वेळेचे नियोजन, मनाचे नियमन केले तर आजही धावत्या काळात आपले संकल्प तडीस जाऊ शकतात. खरे तर आपण कामाच्या रगाड्यात अन्‌ इच्छांच्या धबडग्यात अडकल्याने "रात्र थोडी सोंगे फार' असे वर म्हटल्याप्रमाणे आपली गत होते.

मग कधी पन्नाशी आली तेही कळत नाही. आपल्यात जे काही सुप्त असते, तेच आपल्याला व्यक्त रूपात हवे असते. त्याला घडविण्याचा संकल्प केला तर मग एकाच दगडात दोन पक्षी मारावेत, तसे आपल्याला हवा तो आनंद अन्‌ केलेला संकल्प काही अंशी पूर्ण होऊ शकतो. काळाला भेदून पुढे जाण्यापेक्षा व काहीच न जगल्याचा अनुभव घेण्यापेक्षा त्यावर स्वार होणे हे वर्तमानाचे म्हणून अस्सल जीवन ठरू शकते. त्यातच आनंदाचा झरा अन्‌ संकल्पाची पूर्तता दडलेली असते. हा संकल्प वर्षाच्या थोडे आधी पहाटेचे पहिले पाऊल म्हणून करूयात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com