जब कोई बात बिगड जाये...(पहाटपावलं)

जब कोई बात बिगड जाये...(पहाटपावलं)

परवा वारसाहक्काच्या वादाच्या कोर्टात गेलेला मित्र पेढे घेऊन आला. "सुटलो रे बाबा' असं म्हणून त्यानं निःश्‍वास टाकला. मी विचारलं, तेव्हा म्हणाला, "अरे, न्यायाधीशांनी आम्हाला आणि विरुद्ध पक्षाच्या लोकांना समजावलं की तुम्ही प्रतिष्ठित कुटुंबांतील आहात. तुम्ही समुपदेशकाची मदत घ्या. एकदा कोर्टकचेरी सुरू झाली की किती लांबेल सांगता येत नाही. समुपदेशकाने दोघांशी संवाद साधून समेट घडवला. पंधरा दिवसांत आम्ही मोकळे झालो.' 
जब कोई बात बिगड जाये 
जब कोई मुश्‍कील पड जाये 
तुम देना साथ मेरा, ओ हम नवाज 
हे "जुर्म' चित्रपटातील गाणं एका मित्राला उद्देशून आहे. पण माझ्या मते, हे गाणं समुपदेशकाला चपखल लागू पडतं. 

आजकाल समुपदेशकांची गरज सर्व वयोगटांमध्ये, वेगवेगळ्या समस्यांमध्ये आवश्‍यक वाटू लागली आहे. व्यसनाधीनतेसाठी, कौटुंबिक कलहांसाठी समुपदेशक हा घटक महत्त्वाचा ठरतो आहे. परस्परांमधील विसंवादामुळे संबंध दुरावतात, तेव्हा समुपदेशक त्यांच्यात सलोखा घडवून आणू शकतो. दोन्हींकडची बाजू ऐकून घेऊन निष्पक्षपणे विचार करून समस्येची उकल शोधणं यात समुपदेशकाचं कौशल्य असतं. वारसाहक्कामुळे येणाऱ्या समस्या, घटस्फोटापर्यंत आलेली जोडपी यांना न्यायिक प्रक्रियेला सामोरं जाण्याआधी समुपदेशकाची मदत घेण्याचा परिपाठ न्यायपालिकांमध्येही सुरू झाला आहे. 

घटस्फोटापर्यंत आलेल्या एका दाम्पत्याला समुपदेशकाकडे पाठविण्यात आलं. त्यानं दोघांशी वेगवेगळा संवाद साधला. पत्नीला वाटत होतं, की हा आपल्याकडे दुर्लक्ष करतो. रात्री झोपताना आपल्याकडे पाठ करून झोपतो. पतीनं याचं कारण असं सांगितलं, की "एका जुन्या अपघातानंतर त्याला पाठीवर व डाव्या कुशीवर झोपलं की तीव्र वेदना होतात व म्हणून तो उजव्या कुशीवर झोपतो.' पलंगावर फक्त जागेची अदलाबदल करणं एवढा साधासा उपाय समुपदेशकानं सांगितला व त्यांच्यात समेट झाला. 

बालकांमधील वर्तनसमस्यांमध्येही समुपदेशक समस्येच्या मुळाशी जाऊन समस्यांची उकल करतो. सदोष पालकत्व किंवा घरातील सदोष वातावरण किंवा शाळेतील समस्यांमुळे बालकांमध्ये वर्तनसमस्या निर्माण होतात. पालकांच्या वर्तनात किंवा घरातील वातावरणात बदल घडला की ही वर्तनसमस्या दूर होते, असा माझा अनुभव आहे. वर्तनसमस्या म्हणजे बालकांच्या व्यथित मनाचा आक्रोश असतो. समुपदेशक अशा वेळी समस्या निवारण करू शकतो. पुष्कळदा आध्यात्मिक गुरू, पालक, अनुभवी व्यक्ती समुपदेशकाचं काम करते. एखादं कुलूप उघडण्यासाठी विशिष्ट किल्ली कामाला येत असते. ही किल्ली शोधण्याचं काम समुपदेशकाचं असतं. 

एका शब्दानं, एका वाक्‍यानं किंवा एका क्षणी झालेल्या चुकीच्या वर्तनामुळे दुरावा येऊन समस्या निर्माण होतात. अशा वेळी न्यायपालिका किंवा मानसिक रोगतज्ज्ञांकडे जाण्याआधी समुपदेशकाची मदत घेतली गेली तर पुष्कळदा पुढचा खडतर प्रवास टाळता येऊ शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com