पहाटपावलं : मी एक पक्षीण आकाशवेडी!

सुनीता तारापुरे
बुधवार, 22 मे 2019

दूरवर दिसणारा टेकड्यांचा परिसर वैशाख वणव्यानं होरपळून निघाला आहे. ग्रीष्मातल्या तापल्या दुपारी तर तो अधिकच रखरखीत भासतो.

दूरवर दिसणारा टेकड्यांचा परिसर वैशाख वणव्यानं होरपळून निघाला आहे. ग्रीष्मातल्या तापल्या दुपारी तर तो अधिकच रखरखीत भासतो. आकाशही सूर्याची किरणं परावर्तित करत वाकुल्या दाखवताहेत. तांबडा पिसारा आवरत अस्ताचलावर टेकलेल्या सूर्यबिंबानं एक्‍झिट घेतली, की "तो मी व्हेच'मधल्या बहुरुप्यासम हे आकाश रूप पालटतं. आरशागत लखलखणारा पोशाख त्यागून निळ्याशार वेशात उन्हानं 
पोळलेल्या आसमंतावर मायेची फुंकर घालायला लागतं.

मीही सुखावत हातात चहाचा कप घेऊन सज्जात उभी 
असते. नजर त्या निळाईवर खिळलेली. क्षितिजाशी काळ्या-पांढऱ्या रंगाचे ठिपके उमटतात. पक्ष्यांची ती माळ मोठी होत माथ्यावरून पलीकडं निघून जाते. कॅनव्हास कोरा होतो. पण, काही क्षणच. नक्षी चितारत आणखी एक थवा येतो, दिसेनासा होतो. त्यांचा पाठलाग करत भिरभिरणाऱ्या नजरेला त्या विशाल पटावर अचानक एक चांदणी गवसते. तिला निरखेतो आणखी एक. मग आणखी एक. चंद्र-चांदण्यांनी उजळलेल्या आकाशाच्या स्निग्ध बरसातीत दिवसभराची तलखी शमते. तन-मन निवत जातं. 

शांत, स्तब्ध, प्रखर, तेजस्वी, गर्द निळं, काळं करडं, पाऊसधारांतून हसणारं, शुभ्र चांदणं लेऊन कणाकणानं ठिबकणारं, बर्फाच्छादित शिखरांवर चमचमणारं, इवल्याशा तळ्यात सामावलेलं, अथांग समुद्रात विस्तारलेलं... या अंबराची किती रूपं आजवर न्याहाळलीत गणतीच नाही. गर्दीभरल्या रस्त्यांतून जाताना, निर्जन रानवाटा तुडवताना, निबिड जंगलवाटा धुंडाळताना, अवघड डोंगरमाथा गाठताना, हिरव्यागार कुरणांमधून दुडदुडताना, शांत समुद्रकिनारी-नदीतटी फेरफटका मारताना... प्रत्येक वेळी या गगनानं अनोख्या रूपानं चकित केलंय. सिल्व्हर ओकच्या पानापानांतून ठिबकणारं त्याचं चंदेरी रूप पाहून दिपलंय, तर काटेरी बाभळीखालून दिसलेल्या हिरव्या-पिवळ्या नाजूक नक्षीदार लोभस रूपाची छबी मन:पटलावर कायमची रेखली गेलीय.

काळ्याकुट्ट मेघांनी आच्छादलेल्या आभाळाच्या रौद्र रूपानं मनात धडकी भरली, तसं भरभरून कोसळल्यानंतरच्या स्वच्छ मोकळ्या नभाकडं पाहून मनाला हलकं हलकं वाटलं. रात्रीचा अंध:कार पिऊन सोनसळी उन्हं ल्यालेलं सकाळचं आशादायी आकाश जेवढं खरं वाटतं, तेवढंच सच्चं असतं त्याचं रात्रीचं गर्द अंधारलं, गूढ गहन रूप. 

आकाश म्हणजे या पृथ्वीभोवतीची पोकळी. वायू, पाण्याची वाफ, धुळीचे कण वगैरेंनी बनलेलं वातावरण. त्यामधून विखुरणाऱ्या सूर्यप्रकाशातला निळा रंग सर्वाधिक पसरतो म्हणून निळं 
भासणारं. प्रत्यक्षात आकाश असं काही नाही. हे वैज्ञानिक सत्य ठाऊक असूनही डोळ्यांबरोबरच मनाचं अवकाश विस्तारणाऱ्या या नभाची मला भुरळ पडतेच. कवयित्री पद्मा गोळेंच्या शब्दांत 
सांगायचं तर "मी एक पक्षीण आकाशवेडी!' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article in Pahatpaval