ह ह हसण्याचा...(पहाटपावलं)

ह ह हसण्याचा...(पहाटपावलं)

सकाळची वेळ. माझा नेहमीचा फिरायला जायचा रस्ता. अचानक "ह.. हा.. ही.. ही...' ची 
बाराखडी कानावर आली. आता या भागातही हास्यक्‍लब सुरू झाला तर. म्हणजे सकाळच्या निरव शांततेला सुरुंग लागणार... नकळत माझ्या कपाळावर आठी उमटली. मी पुढे गेले तर पन्नाशीच्या पुढचे स्त्री-पुरुष "ह'च्या तालावर हसत-नाचत होते. "यांच्या आयुष्यात हसण्यासारखं काही घडत नसल्यामुळं यांना असं अट्टहासानं हसावं लागत असेल का?' माझ्या मनात येऊन गेलं. त्यानंतर योगायोगानं डॉ. नॉर्मन कझिन्स यांनी "ऍनॉटॉमी ऑफ इलनेस' या पुस्तकात उद्धृत केलेला "हसणं' या संबंधीचा त्यांचा अनुभव वाचला.

कझिन्स पाठीच्या दुखण्यानं अंथरुणाला खिळून होते. रुग्णालयात भरती होऊन उपचार चालू होते, पण फरक पडत नव्हता. एक दिवस मन रिझविण्यासाठी त्यांनी चार्ली चॅप्लिनचे चित्रपट आणि विनोदी साहित्य वाचायला सुरवात केली आणि काय आश्‍चर्य! भरपूर हसल्यानंतर त्यांना वेदनाशामक औषधांखेरीज शांत झोप लागली. या मागचं कारण म्हणजे हसण्यामुळं मेंदूमध्ये तयार होणारे एन्डॉर्फिन्स नावाचे विशेष न्युरोट्रान्समीटर्स; ज्यामुळे वेदनेची भावना दूर होऊन मनाची मरगळ नाहीशी होते. अलीकडे "हसणं' या प्रक्रियेवर अनेक प्रकारे संशोधन झालं आहे. खळखळून हसल्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रोलची पातळी कमी होते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉइड यानंही तणावमुक्तीसाठी हसण्याचा पाठपुरावा केला आहे. त्याच्या मते आपल्या अंतर्मनातील अनेक नकारात्मक भावना, अपूर्ण इच्छा, अपेक्षा यांचं मनावर जे दडपण असतं, ते हसण्यामुळे कमी होतं. भीती, राग, दु:ख यांचा विसर पडून जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. हसण्याचे हे विविध उपयोग लक्षात घेऊन अनेक ठिकाणी "लाफ्टर थेरपी'चा वापर केला जातो.

"लाफ्टर थेरपी'चा एक भाग म्हणजे जगभर सुरू झालेले हास्यक्‍लब. हे सारं वाचलं आणि मग माझ्या रोजच्या वाटेवरील त्या हास्य चमूकडे पाहायची माझी नजर बदलली. आज तर "ह'ची बाराखडी म्हणून झाल्यावर त्यांचं घसरगुंडी हास्य सुरू झालं. लहान मुलं घसरगुंडीवरून घसरताना जो वेगळाच थरार अनुभवतात, जशी खिदळत असतात तसे सर्वजण गोलगोल फिरत बागडत होते. त्यानंतर सुरू झालं हनुमान हास्य. त्यांच्यामध्ये संचारलेला हसरा हनुमान पाहून मीही मनसोक्त हसून भरभरून दाद दिली. हसणं असं संसर्गजन्य असतं तर! परतीच्या वाटेवर मलाही खूप हलकंहलकं वाटत होतं.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com