दीर्घायुष्याची गुरुकिल्ली (पहाटपावलं)

 दीर्घायुष्याची गुरुकिल्ली (पहाटपावलं)

नुकताच एक आगळावेगळा योग आला. वयाची 115 वर्षे पूर्ण झालेल्या शांताबाईंना "याचि देही याचि डोळा' पाहता आलं, भेटता आलं. आदल्या दिवशी अस्थिभंग झालेल्या शांताबाईंवर डॉ. राजेंद्र चांडक यांनी शस्त्रक्रिया केली होती. सुदैवानं शांताबाई पांडे यांना सौम्य रक्तदाब सोडला, तर कुठलीही व्याधी नव्हती. अस्थिभंग होण्याआधी दोन जिने चढून जाण्याइतकी व दोन कोस चालून जाण्याइतकी त्यांची तब्बेत ठणठणीत होती.

स्मृती जागृत होती, विनोदबुद्धी शाबूत होती. शस्त्रक्रिया निर्धोक पार पडली. त्यांच्या मुलाची व डॉ. चांडक यांची परवानगी घेऊन कुतूहल म्हणून त्यांना भेटायला गेलो. शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. त्यांनी हसत हसत स्वीकार केला. डोक्‍यावर हात ठेवून भरभरून आशीर्वाद दिला. विनाचष्म्यानं तळहातावरच्या रेषा बघून माझं भविष्यही सांगितलं. हसतखेळत गप्पा झाल्या. जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. 

शांताबाईंच्या 115 वर्षे जगण्याचं कौतुक केलं. त्यावर मिश्‍कीलपणे हसून त्या म्हणाल्या, "माझी आई तर 117 वर्षे जगली होती.' लाडात गेलेलं त्यांचं बालपण वयाच्या सातव्या वर्षी संपुष्टात आलं होतं. कारण 15 वर्षांच्या वराशी त्यांचं लग्न झालं. पंधराव्या वर्षी पहिलं मूल झालं व नंतर 14 बाळंतपणं झाली. सगळी बाळंतपणं घरीच झाली होती. घरी सुबत्ता नव्हती; पण मेहनत करून पोटापुरतं मिळत असे. "मी खूप सुखी आयुष्य जगले,' असं हसत त्यांनी सांगितलं. त्यांनी महात्मा गांधींना बघितलं होतं. इंदिरा गांधी तर त्यांच्या घरी येऊन आशीर्वाद घेऊन गेल्या होत्या! पटकी व प्लेगच्या साथीमध्ये मुंग्यांसारखी माणसं मरायची. त्यातून त्या वाचल्या होत्या. 

वैद्यकशास्त्राच्या दृष्टीतून त्यांच्या दीर्घायुष्याची कारणं शोधू जाता त्यांना सासरी-माहेरी मिळालेलं प्रेम आणि आनंदी वृत्ती याला महत्त्व द्यावं लागेल. त्या काळी खाद्यपदार्थांत भेसळ नसायची. दूधदुभतं असायचं. कामाची सवय होती. 

या शिवाय शांताबाईंची शांतवृत्ती व सुख मानण्याची सवय प्रकर्षानं जाणवली. त्यांच्यासोबत झालेल्या संवादात कोणावर टीका नाही, कोणाविषयी आकस नाही हेही जाणवलं. शस्त्रक्रियेनंतर दुःख होत असतं, हे मला स्वानुभवानं माहीत आहे; पण शांताबाईंनी तेही दाखवलं नाही. 

"जगी सर्व सुखी असा कोण आहे' असं समर्थ रामदास सांगून गेले आहेत. सुख आयतं मिळत नसतं, ते शोधावं लागतं. जे मिळालेलं आहे, त्यात आनंद मानायचा, ही वृत्ती आनंद मिळविण्यासाठी, सुखी राहण्यासाठी कामाला येत असते. या वृत्तीमुळेच शांताबाई शंभरी पार करू शकल्या, असा माझा विश्‍वास आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com