यशाचे दीपस्तंभ (पहाटपावलं)

यशाचे दीपस्तंभ (पहाटपावलं)

माणूस यशस्वी का होतो? त्याच्या गुणांमुळे. माणूस गुणवान का होतो? त्याच्या बुद्धिमत्तेमुळे. माणूस बुद्धिमान का होतो? परिश्रमांमुळे. माणूस परिश्रम का करतो? त्याच्यात असलेल्या प्रेरणांमुळे. माणसात प्रेरणा कुठून येतात ? त्याच्या मनातल्या दृढ विश्‍वासातून, श्रद्धेतून. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, प्रगती करायची असेल, इतरांच्या तुलनेत चार पावलं पुढे राहायचं असेल, तर काही गोष्टींचा अंतर्भाव आपल्या व्यक्‍तिमत्त्वात करणं अपरिहार्य आहे. 

अवधान ः अवधान म्हणजे एखाद्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे. जे काम हाती घेऊ ते लक्षपूर्वक केले पाहिजे. अवधान असेल तर त्या गोष्टी मेंदूपर्यंत पोचतात, त्या ठिकाणी प्रभावीपणे नोंदविल्या जातात व त्या गोष्टी आठवणं सहज शक्‍य होतं. ज्या गोष्टी नीट समजतात, त्याच फक्‍त लक्षात राहतात. म्हणून कुठलंही काम करताना लक्ष एकाग्र करणं महत्त्वाचं आहे. 
आवड ः ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड असेल, त्या गोष्टी मेंदूकडून सहज स्वीकारल्या जातात. रुचीहीन गोष्टी मेंदूपर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे आवड नसताना कितीही परिश्रम केले, तरी ती गोष्ट मेंदूपर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळे लक्षात राहत नाही. एखादा विषय आपण स्वत:च समजून घ्यायला लागतो, तरच त्या विषयात आवड निर्माण होते. 
तीव्र इच्छा ः "मला आयुष्यात काहीतरी बनायचं आहे, अमुक ध्येय गाठायचं आहे. खूप ज्ञान मिळवायचं आहे,' अशी तीव्र इच्छा मनात असणं आवश्‍यक आहे. इच्छा असेल तर ती गोष्ट आपण लक्षपूर्वक करू शकतो. इच्छा असेल तरच त्या गोष्टींत आवड निर्माण होते. मनातील इच्छाच आपल्याला कार्यरत ठेवते. परिश्रम करायला भाग पाडते. 

दृढ विश्‍वास ः स्वत:वर, स्वत:च्या कामावर, स्वत:च्या करिअरवर, क्षमतांवर आपला दृढ विश्‍वास पाहिजे, तरच आपण ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करू शकतो. स्वत:च्या क्षमतांवरील दृढ विश्‍वासामुळेच आपण अशक्‍यप्राय वाटणाऱ्या गोष्ट शक्‍य करून दाखवू शकतो. दृढ विश्‍वासातूनच काम करण्याची प्रेरणा मिळते. म्हणून दृढ विश्‍वास आपल्या व्यक्‍तिमत्त्वात निर्माण केला पाहिजे. 

कृती ः वरील सर्व गुणांना कृतीशिवाय काहीच अर्थ नसतो. असंख्य लोक फक्‍त बोलतात, मनात इच्छा बाळगतात, पण फार थोडे लोक असे असतात जे कृती करतात. सतत कार्यरत राहणं हे माणसाच्या अस्तित्वाचं लक्षण आहे. कार्यरत राहणाऱ्या माणसाची स्वप्नं प्रत्यक्षात उतरतात. कार्यरत राहणाऱ्याच्या आयुष्यात विविध रंगांची उधळण होते. कार्यमग्न माणूस इतरांपेक्षा जास्त चांगली प्रगती करतो. सतत कार्यमग्न राहणं हे जिवंत माणसाचं लक्षण आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com