गोष्टींची गोष्ट (पहाटपावलं)

डॉ. श्रीकांत चोरघडे
सोमवार, 18 मार्च 2019

प्रत्येक व्यक्तीत बऱ्यावाईट प्रवृत्ती, सवयी असतात. "उडदामाजी काळे गोरे' अशी मराठी म्हण आहे. माझ्यामध्ये पण असे काळे-गोरे उडीद असतीलच.

मी बालरोगतज्ज्ञ म्हणून गेली 52 वर्षे नागपूरला खासगी व्यवसायात आहे. "बालरोग' विषयातली पदविका प्राप्त केल्यानंतर काही काळ माझे आतेभाऊ डॉ. मनोहर केशव ऊर्फ नानासाहेब साल्पेकर यांच्या हाताखाली उमेदवारी केली. नागपुरातील ते पहिले पदविकाधारक बालरोगतज्ज्ञ. त्या काळात त्यांच्या दवाखान्यात सतत बालरुग्णांची गर्दी असायची. रुग्णांशी, त्यांच्या आईवडिलांशी बोलण्याची, संवाद साधण्याची पद्धत मला आवडली. प्रत्येक रुग्णाला वाटायचं, की डॉक्‍टरांनी काळजीपूर्वक तपासलं. त्यांच्या निदान कौशल्याएवढाच संवाद कौशल्याचा भाग होता. जो शांतपणे ऐकून घेतो तो उत्तम संवादपटू. नानासाहेब या व्याख्येत चपखल बसत होते. असं असलं तरी ते सगळंच ऐकायचे असं नव्हतं. एकदा एका बाळाचे वडील आधीच्या डॉक्‍टरांबद्दल नकारात्मक बोलायला लागले. त्यावर नानासाहेबांनी त्याला चूप बसवलं. "तुम्ही बाळाची तब्येत दाखवायला आलात की आधीच्या डॉक्‍टरांची निंदा करायला आलात?' तो गृहस्थ ओशाळला! 

हिप्पोक्रॅट्रीसने डॉक्‍टरांबद्दल एक आचारसंहिता तयार केली होती. नानासाहेब ती काटेकोरपणे पाळत. त्यामुळे त्यांनी इतर डॉक्‍टरांबद्दल कधी अपशब्द वापरले नाहीत. माझ्यासारख्या शिकाऊ डॉक्‍टरसाठी हा नवा धडा होता व पुढे ती सवय अंगवळणी पडली. ती इतकी मुरली, की व्यक्तिगत आयुष्यातसुद्धा कुणाबद्दल अपशब्द सहसा उच्चारले गेले नाहीत व व ऐकूनही घ्यावेसे वाटले नाहीत. पुढे मानसशास्त्रात एमएची पदवी घेण्यासाठी अभ्यास सुरू केला, तेव्हा याबाबतीत नवं निरीक्षण वाचनात आलं. इतरांबद्दल नकारात्मक बोललं किंवा ऐकून घेतलं तर त्याचा दुष्परिणाम त्या संबंधित व्यक्तीवर होवो अथवा न होवो; पण बोलणाऱ्या आणि ऐकणाऱ्या व्यक्तीवर निश्‍चितच नकारात्मक परिणाम होतो. मानसिक ताण येण्याचं मुख्य कारण नकारात्मक विचार हेच असतं. 

प्रत्येक व्यक्तीत बऱ्यावाईट प्रवृत्ती, सवयी असतात. "उडदामाजी काळे गोरे' अशी मराठी म्हण आहे. माझ्यामध्ये पण असे काळे-गोरे उडीद असतीलच. माझ्यातील काही नकारात्मक गोष्टींचा इतरांना त्रास झाला असेल, होतही असेल. म्हणूनच इतरांमधलं चांगलं शोधायचं व स्वतःमधील वाईट शोधून ते दूर करायचं अशी सवय लागली. 

मानसशास्त्राची पदवी प्राप्त केल्यावर इतरांचं मन आपल्याला समजतं, अशा धारणेपायी मी नकळत काही काळ एखाद्या दृढ्ढाचार्यासारखा न मागता सल्ला देऊ लागलो होतो; पण माझ्या एका हितचिंतकानं ते लक्षात आणून दिलं आणि म्हणाला की, "सल्ला आणि समुपदेशन हे मागितल्याशिवाय द्यायचं नसतं.' न मागता दिलेला सल्ला समोरच्याला राग आणू शकतो व ती व्यक्ती आपल्यापासून दुरावू शकते. उलट आपली अडचण बोलून दाखवून कुणी सल्ला मागितल्यावर दिला गेला तर तो बहुमोल ठरतो. समोरच्याचं मन स्वस्थ होतं. 
विनोबा भावे निःसंशय विद्वान होते. त्यांना 27 भाषा लिहिता-वाचता येत असं म्हटलं जातं. ते मितभाषी होते; पण वापरलेला प्रत्येक शब्द नेमका, चपखल आणि बहुमोल असे. माझे वडील वामन चोरघडे त्यांना गुरुस्थानी मानत. स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास घडला तेव्हा योगायोगाने तुरुंगात त्यांना विनोबांचा सहवास घडला होता व त्यांचं मैत्र होते. बाबांसोबत कधीतरी मीही जात असे. एकदा बोलता बोलता ते म्हणाले, "आपण गोष्टी करतो म्हणजे काय करतो? तर परनिंदा आणि आत्मस्तुती.' 

वाचकांपैकी अनेकांनी हा अनुभव घेतला असेल. त्यांना परनिंदा करणारे आणि आत्मस्तुतीच्या गोष्टी करणारे अनेक लोक भेटले असतील. त्याच्यांत हे अवगुण वेगवेगळे किंवा एकत्रही असतील. अशा गोष्टी करणारी माणसं काही भेटींमध्येच नकोशी होतात. आपण स्वतः तर अशा प्रकारच्या गोष्टी करत नाही ना? एवढं प्रत्येकानं आत्मचिंतन करून जरूर बघावं. आत्मस्तुती व परनिंदा सोडून बोलण्यासारख्या अनेक गोष्टी प्रत्येकाकडे असतील, ही मला खात्री आहे! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article of Pahatpawal