घाटातील घाला (अग्रलेख)

Pune Edition Article on Poladpur Bus Accident
Pune Edition Article on Poladpur Bus Accident

दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी शनिवारी सकाळी मोठ्या आनंदाने पावसाळी सहलीला निघाले, तेव्हा ही आपल्या अंतिम प्रवासाची सुरवात आहे, असा विचार ना त्यांच्या मनात आला असेल; ना त्यांच्या कुटुंबीयांच्या वा मित्रपरिवाराला अघटिताची शंका आली असेल. मात्र, नियतीचा खेळ म्हणतात तो हाच! पोलादपूरहून महाबळेश्‍वरला निघालेली ही बस आंबेनळी घाटात कोसळली आणि एका क्षणात तीस जिवांना मृत्यूने गाठले. या अपघाताचे वृत्त ऐकून आणि वाहिन्यांवरील दृश्‍ये पाहून महाराष्ट्रातील घर अन्‌ घर हळहळले.

बस दरीत कोसळताना प्रकाश सावंत- देसाई हे एकटेच बाहेर फेकले काय जातात, त्यांच्या हाताला झाडाची फांदी काय येते आणि त्यांचे प्राण वाचतात, हाही नियतीचाच खेळ. अर्ध्या तासाने ते कसेबसे रस्त्यापर्यंत चढून आले आणि त्यामुळेच या दु:खद घटनेची बातमी तातडीने समजू शकली. अवघ्या महाराष्ट्राला शोकाकुल करून सोडणाऱ्या या भीषण अपघातामुळे सह्याद्रीच्या खोऱ्यातील अनेक बिकट घाटांमधील प्रवासाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

खरेतर सह्याद्रीच्या या अक्राळविक्राळ दाढामधील अनेक घाटांमधून काढलेल्या रस्त्यांवरचा प्रवास जीव मुठीत धरूनच करावा लागतो. मग तो नाणेघाट असो, खंबाटकी किंवा कुंभार्ली असो की फोंडा, हे सारे घाट खरेतर "रडतोंडी'चेच घाट म्हणावेत असे. या घाटांतून प्रवास करताना घाट व रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या शासकीय यंत्रणांचा निष्काळजीपणा, पर्यटनासाठी येणाऱ्यांची दंगामस्ती, वाहनचालकांचा निष्काळजीपणा, अशा विविध कारणांनी दुर्घटनांना सामोरे जावे लागते. ज्या आंबेनळी घाटात हा अपघात झाला, तो दुर्गम डोंगरदऱ्यातून अवघड नागमोडी वळणे घेत प्रतापगडाला नजरेत सामावत महाबळेश्वरला नेतो. हाच घाट पूर्वी "रडतोंडीचा घाट' म्हणून ओळखला जायचा आणि आजही वाहनचालकांना तो रडकुंडीलाच आणतो.

तेथे थोडासाही बेसावधपणा जीवघेणा ठरतो. या दुर्घटनेत तेच झाले. या घाटात वळणावळणावर खोल दऱ्या आहेत. त्यातच पावसाळा सुरू झाला की दरड कोसळण्याची टांगती तलवार नेहमीच असते. सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने चिकट माती पसरून ठेवल्यामुळे चालताना पाय किंवा वाहनाचे चाक घसरेल, अशीच व्यवस्था जणू करून ठेवलेली दिसते. पावसाळ्यात डांबरी रस्त्याखाली उतरणे मुश्‍किल. वरून पावसाचा जोरदार मारा, बोचरे वारे आणि समोरचे एक फुटावरीलही दिसणार नाही, असे धुके. हे घाटातील वातावरण आल्हाददायक असले, तरी काळजी घेतली नाही तर जिवावर बेतणारे. 

अत्यंत वळणावळणांच्या आणि अरुंद असलेल्या आंबेनळी घाटात यापूर्वीही अपघात झाले आहेत. त्यातही या घाटाशी अपरिचित असलेल्या वाहनचालकांसाठी तर ही कसोटीच ठरते. घाटातील रस्त्याची दुरवस्था आणि पावसामुळे वरून वाहून येणारी माती यामुळे हा घाट अपघातप्रवण झाला आहे. या मार्गावर वाहनांच्या सुरक्षेसाठी भक्कम कठडेही उभारलेले नाहीत. केवळ हाच घाट नव्हे, तर राज्याच्या अन्य भागांतील बहुतांश घाटांतील सुरक्षेची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. तेव्हा घाटातील वाहतूक सुरक्षित होण्यासाठी जे जे आवश्‍यक ते छोटे-मोठे उपाय तातडीने करायला हवेत. 

धुवाधार पावसाचा आनंद लुटू पाहणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढत आहे; मात्र भान बाळगले नाही तर बेरंग ठरलेला. मग हा प्रवास घाटातील असो, वा धोक्‍याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून समुद्राच्या पाण्यात उतरण्याचा प्रकार असो. पर्यटनाचा, प्रवासाचा आनंद लुटताना सुरक्षेकडे दुर्लक्ष होणार नाही, याची दक्षता नेहमीच घ्यायला हवी. तसेच, स्वतः वाहन चालविताना आणि गाडीत दंगामस्ती करताना चालकाचे लक्ष विचलित होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. वाढत्या गर्दीमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला तोंड देतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघातप्रतिबंधक तंत्रज्ञानाने घाटरस्ते सुरक्षित केले पाहिजेत आणि पोलिसांनी रस्त्यांवरील मानवनिर्मित अडथळे दूर केले पाहिजेत. तसेच, हुल्लडबाजीला कठोरपणे लगाम घातला पाहिजे. 

अशा दुर्घटनेच्या वेळी परिसरातील ट्रेकर्स मदतकार्यासाठी धावतात. अत्यंत प्रतिकूल स्थितीत जिवावर उदार होऊन ते दरीत उतरतात. आताच्या दुर्घटनेतही त्यांनी केलेली कामगिरी निश्‍चितच प्रशंसनीय आहे. या युवकांना योग्य प्रशिक्षणाची व आवश्‍यक साहित्याची रसद पुरवणे गरजेचे आहे.

"एनडीआरएफ'चे जवान घटनास्थळी दहा तासांनी पोचले. सह्याद्रीतील पर्यटन वाढणारे आहे, हे लक्षात घेऊन साताऱ्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी असे सुसज्ज सुरक्षापथक तैनात असणे गरजेचे आहे. या दुर्घटनेच्या निमित्ताने सुरक्षेचे ठोस उपाय झाले, तरच दुर्गम भागातील निसर्गाचा निखळ आनंद पर्यटक निश्‍चिंत मनाने घेऊ शकतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com