राजकीय मैदानातील 'तारा' (नाममुद्रा)

अमोल कोल्हे
Monday, 4 March 2019

पाच दशकांपूर्वी छत्रपती शिवरायांचे नाव घेतले की चंद्रकांत वा सूर्यकांत अशा मातब्बर नटांच्या प्रतिमा डोळ्यांपुढे यायच्या. पुढे ती जागा मास्टर दत्ताराम यांनी घेतली आणि आज-काल शिवाजी महाराज वा संभाजी राजे यांची प्रतिमा अवघा महाराष्ट्र अमोल कोल्हे यांच्या रूपात पाहत असतो.

पाच दशकांपूर्वी छत्रपती शिवरायांचे नाव घेतले की चंद्रकांत वा सूर्यकांत अशा मातब्बर नटांच्या प्रतिमा डोळ्यांपुढे यायच्या. पुढे ती जागा मास्टर दत्ताराम यांनी घेतली आणि आज-काल शिवाजी महाराज वा संभाजी राजे यांची प्रतिमा अवघा महाराष्ट्र अमोल कोल्हे यांच्या रूपात पाहत असतो. अशा या युगपुरुषांची आठवण करून देणाऱ्या कोल्हे यांनी अलीकडेच शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. कोल्हे प्रथम छोट्या पडद्यावर अवतरले ते नितीन चंद्रकांत देसाई यांच्या "राजा शिवछत्रपती' या मालिकेमधून आणि त्यांना शिवप्रेमींनी डोक्‍यावर घेतले.

2014मध्ये शिवरायांच्या धोरणानुसार चालणारा पक्ष, असे सांगत त्यांनी शिवसेनेची निवड केली आणि त्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. मात्र आता पाच वर्षांनंतर त्यांना बहुधा शिवसेना ही काय चीज आहे, ते कळाले असावे! त्यामुळेच हातावरील शिवबंधनाचा धागा तोडून त्या जागी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे "घड्याळ' बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला असावा. मात्र त्या शिवबंधनाशी जोडली गेलेली नाळ तोडण्यास त्यांना बराच वेळ लागणार, असे दिसत आहे; कारण या प्रवेश सोहळ्यात, जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ अशा "राष्ट्रवादी'च्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीतच त्यांनी उद्धव ठाकरे कसे चांगले नेते आहेत आणि शिवसेनेत आपल्याला कशी सन्मानाची वागणूक मिळाली, त्याच्या आठवणी जागवल्या! अर्थात, लहानपणीच आपण शरद पवार यांच्या गाडीमागे केवळ त्यांच्या दर्शनासाठी धावत असू, हेही सांगायला ते विसरले नाहीत.

सध्या "स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून घरोघरी पोचलेले हे कोल्हे बहुधा शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव-पाटील यांनाच आव्हान देतील, अशी चिन्हे आहेत. शिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेस कोल्हे यांचा इतरत्रही प्रचारासाठी वापर करून घेणार, हे उघड आहे. त्यांच्या भाषणांना श्रोत्यांचा प्रतिसादही उत्तम मिळतो आणि राजकारणासाठी आवश्‍यक असलेला अभिनय तर त्यांच्या अंगांगात मुरलेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवेश सोहळ्यातच, उद्धव यांच्यावर स्तुतिसुमने वाहल्यानंतर कोल्हे यांना आपण आता कोणत्या पक्षात प्रवेश करत आहोत, याची आठवण अजितदादांना करून द्यावी लागली होती! लोकसभेच्या प्रचारातही कोल्हे यांनी तोच "प्रवेश' उभा केला तर मात्र "राष्ट्रवादी'ची पंचाईत होऊ शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article on Political Star