रिटर्न गिफ्ट ! (ढिंग टांग!)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे. 
वेळ : मध्यरात्रीची. 
प्रसंग : गोडाधोडाचा. 
पात्रे : गोडधोडच! 

विक्रमादित्य : (लपतछपत खोलीत शिरत मोठ्यांदा) हॅप्पी बर्थडे ट्यू यू... हॅप्पी बर्थ डे च्यू यूऽऽ... हॅपी बऽऽथडे च्यू यूऽऽ... हॅप्पी बर्थडे..च्यूऽऽ...यूऽऽऽ.... 
उधोजीसाहेब : (अंथरुणात दचकून बसत) काय झालं? काय झालं? हल्ला, हल्ला...हर हर हर हर महादेव!! 
विक्रमादित्य : (कमरेवर हात ठेवत) ह्याला काय अर्थय बॅब्स! 
उधोजीसाहेब : (डोळे चोळत) आरडाओरडा कसला झाला? 
विक्रमादित्य : (खुलासा करत) बॅब्स... तुमच्या बर्थडेचं सेलेब्रेशन सुरू झालं! आम्ही तुम्हाला विश करायला आलो, तर दचकता काय? 

उधोजीसाहेब : (ओशाळून) ओह!...अरे, ही काय वेळ आहे का विश करण्याची! बारा वाजलेत, बारा! झोपा आता गपचूप! उद्या बघू... वाढदिवस उद्या आहे, उद्या! 
विक्रमादित्य : (कुरकुरत) रात्री बाराला सुरू होतो ना दिवस? 
उधोजीसाहेब : (मान हलवत) नाही... रात्री बाराला मध्यरात्र सुरू होते!! कळलं? जा आता! बाय द वे, थॅंक यू फॉर युअर विशेस! (पुन्हा पांघरुणात शिरतात...) 

विक्रमादित्य : (हिरमोड होत) मग आम्ही केक कधी कापणार? 
उधोजीसाहेब : (पांघरुण डोक्‍यावर घेत) उद्या!... सकाळी अकरा ते सायंकाळी पाच ह्या कार्यालयीन वेळेतच केक कापणेत येईल, तसेच अभीष्टचिंतनाचा स्वीकार होईल, ह्याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी! गुडनाइट!! 

विक्रमादित्य : (मुद्दाम उकरून काढत) तुमच्या म्यारेथॉन मुलाखतीबद्दल एक शंका आहे!! 
उधोजीसाहेब : (डोक्‍यावरील पांघरुणातूनच) घुर्रर्रर्र...!! 
विक्रमादित्य : (अचंब्याने) जीडीपी म्हंजे काय ते आपल्याला माहीत नाही? असं तुम्ही म्हणालात का? कमाल आहे तुमची! साधा जीडीपी म्हंजे काय ते ठाऊक नाही तुम्हाला? 
उधोजीसाहेब : (डोक्‍यावरून पांघरुण फेकत त्वेषानं) जीडीपी कसा दिसतो? कुठे उगवतो? कुठे वाढतो? कुणी पाहिलाय? 
विक्रमादित्य : (किंचित हसून) अहो, कॉमर्सला शिकवतात जीडीपी म्हंजे काय ते! जीडीपी म्हंजे... जीडीपी म्हंजे...अं...अं....जी फॉर ग्रॉस- 
उधोजीसाहेब : (धीर देत) राहू दे, राहू दे! ज्या गोष्टीचा फोटो काढता येत नाही, अशा कुठल्याही गोष्टीवर माझा विश्‍वास नाही! कळलं? जा आता!! 

विक्रमादित्य : (शिताफीने विषय बदलत) तुम्ही अयोध्येला जाणार आहात? 
उधोजीसाहेब : (कानटोपी चढवत) अलबत! कुणाला भीतो की काय!! अयोध्याच काय, काशीत पण जाणार आहे!! 
विक्रमादित्य : (अविश्‍वासानं) स्वत:हून कुणी काशीत जातं का, बॅब्स! पण रथातून जाणार असाल तर मी पण येणार!! 
उधोजीसाहेब : (कळवळून) झोपू दे ना मला! उद्या ऑफिस टाइममध्ये उभं राहायचंय मला कंप्लीट! किती लोक शुभेच्छा द्यायला येतील, कल्पना आहे? शिवाय उद्या गुरुपौर्णिमाही आहे! म्हंजे दुप्पट गर्दी!! छे!! 

विक्रमादित्य : (गंभीर होत) वाढदिवस साधेपणानं साजरा करावा! शक्‍यतो घरगुती स्वरूपाचाच करावा! होर्डिंग, फलक लावू नयेत! त्यामुळे पर्यावरणाची हानी होते! प्लास्टिकचा वापर टाळावा!...हो ना बॅब्स!! 
उधोजीसाहेब : (खुश होत) करेक्‍ट! 

विक्रमादित्य : (हळू आवाजात) बॅब्स, उद्या गर्दी होईल म्हणून देवेंद्र अंकलनी आत्ताच केक पाठवलाय! कापू या? 
उधोजीसाहेब : (दचकून उठत) क्‍काय? बाप रे! ही काय नवी भानगड? 
विक्रमादित्य : (समजावून सांगत) ते पहाटे तीनपर्यंत जागून महाराष्ट्राचा कारभार करतात! म्हणून त्यांनी आत्ताच पाठवलाय केक! 
उधोजीसाहेब : (डोळे बारीक करत) ह्यात मला काहीतरी काळंबेरं दिसतंय! 
विक्रमादित्य : (निरागसपणाने) नाही! काळंबेरं काही नाही!! कमळाच्या आकाराचा केसरिया केक आहे! रिटर्न गिफ्ट म्हणून आपण काय पाठवूया बॅब्स? 

Web Title: Pune Edition Article on Return Gift in Dhing Tang