सिमोनाची जंगी पार्टी ! (नाममुद्रा)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

फ्रेंच टेनिसमध्ये महिलांच्या स्पर्धेला अनेक वर्षे दुय्यम स्थान दिले जायचे. व्यावसायिक टेनिसच्या क्षेत्रात महिला नुकत्याच आपले अस्तित्व दाखवू लागल्या होत्या त्या काळात, म्हणजे 1968च्या सुमारास महिला फ्रेंच विजेतीस किरकोळ बक्षीस रक्‍कम मिळत असे.

रुमेनियाच्या सिमोना हॅलेपनं अमेरिकी स्लोन्स स्टिफन्सविरुद्धच्या लढतीत पहिला सेट 3-6 असा सहज गमावला. पुढल्या सेटमध्येही ती अडखळतच होती. खरे तर तिने जिंकण्याचा नाद जवळपास सोडला होता. पण अचानक आक्रमक होत तिने पुढले दोन्ही सेट 6-4, 6-1 असे जिंकत पॅरिसमधल्या रोलां गारो टेनिस संकुलात रंगलेली फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा जिंकली. सदोदित हुलकावण्या देत असलेले ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावून सिमोना हॅलेपने एकप्रकारे आपल्या नशिबालाच हुलकावणी दिली आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या सिमोनाला ऐनवेळी जेतेपद गुंगारा देत असे. 

गेली तब्बल बारा वर्षे ती अव्वल टेनिसच्या सर्किटमध्ये खेळते आहे, पण महत्त्वाचे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविण्यासाठी तिला खूप धडपड करावी लागली आहे. या वर्षीही तिची परिस्थिती कठीण आहे, असे तज्ज्ञांचे मत होते. "पहिला सेट गमावल्यावर मला पुन्हा एकदा रिक्‍त हस्ताने परतावे लागणार असे वाटले होते. पण मी मनाशी म्हटले, खेळावे तर लागणार. मग जोरकस खेळूनच जावं !'' असे सामन्यानंतर सिमोना म्हणाली. तिचे हे उद्‌गार बरेच बोलके आहेत. सिमोना हॅलेपचा खेळ आक्रमक आहे. बेसलाइनवरून तिने लगावलेले जोरकस फटके अनेकदा प्रतिस्पर्ध्याला निरुत्तर करणार असतात. पण जिंकण्यासाठी आवश्‍यक असलेली कणखर मानसिकता तिच्यात कांकणभर कमीच आहे, अशी टीका तिच्यावर आता आतापर्यंत होत होती. तब्बल 26 लाख डॉलरची घसघशीत बक्षीस रक्‍कम आणि महिलांच्या एकेरीचे जेतेपद पटकावून सिमोनाने आपल्या टीकाकारांची तोंडे अखेर बंद केली, असेच म्हणावे लागेल. 

फ्रेंच टेनिसमध्ये महिलांच्या स्पर्धेला अनेक वर्षे दुय्यम स्थान दिले जायचे. व्यावसायिक टेनिसच्या क्षेत्रात महिला नुकत्याच आपले अस्तित्व दाखवू लागल्या होत्या त्या काळात, म्हणजे 1968च्या सुमारास महिला फ्रेंच विजेतीस किरकोळ बक्षीस रक्‍कम मिळत असे. बहुतेकदा दिवसाकाठी 27 डॉलरच्या तुटपुंज्या भत्त्यावरच महिला टेनिसपटूंना समाधान मानावे लागत असे. त्या तुलनेत सिमोना हॅलेपची कमाई अवाढव्यच मानायला हवी. सिमोनासमोर आता आव्हान आहे ते महिनाभरावर येऊन ठेपलेल्या विम्बल्डन स्पर्धेचे. ""आधी एक जंगी पार्टी, मग थोडी विश्रांती घेईन... विम्बल्डनचा विचार त्या नंतर...'' असा पुढला बेत सिमोनाने जाहीर केला आहे. विम्बल्डनच्या हिरवळीवर तिच्या आक्रमक बेसलाइन खेळाचा टिकाव कसा लागतो, हे आता बघायचे. 

Web Title: Pune Edition Article on Simona in Nam Mudra