दहशतवादाचे सावट कायमच (मर्म)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

अयोध्येतील "बाबरीकांडा'नंतर मुंबई, तसेच देशाच्या अन्य भागांत झालेल्या दंगलीनंतर मुंबईतील साखळी बॉंबस्फोटांच्या निमित्ताने दहशतवादाने भारतात पहिले पाऊल टाकले. त्याला आता 25 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी, भारतावर दहशतवादाचे सावट कायमच आहे. प्रजासत्ताक दिनाला जेमतेम एक महिना असताना, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात स्फोट घडवून आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवादी टोळीचा छडा लावल्यामुळे त्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे.

"एनआयए'ने दिल्ली तसेच उत्तर प्रदेशात 17 ठिकाणी टाकलेल्या छाप्यानंतर या टोळीतील दहा जणांना अटक करण्यात आली आहे. एकीकडे हिंदुत्ववादाचे वर्चस्व वाढवण्याच्या सर्व स्तरांवरून होत असलेल्या पार्श्‍वभूमीवर "इस्लामिक स्टेट' (इसिस) या दहशतवादी संघटनेशी हे सारे जण संबंधित असल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे देशातील राजकीय वातावरणाला नवा आयाम प्राप्त झाला आहे. हे दहशतवादी "हरकत-उल-हर्ब-ए-इस्लाम' या नावाखाली काम करत होते, असा दावा "एनआयए'ने केला आहे. या तपास यंत्रणेला दहशतवाद्यांची कारवायांची खबर दोन महिन्यांपूर्वीच मिळाली होती. त्यानंतर या यंत्रणेने त्यांचा छडा लावण्याचे केलेले काम हे मोलाचे असून, त्यामुळे मोठा धोका टळला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. 

इस्लामी मूलतत्त्ववाद्यांचा धोका किती मोठा आहे आणि त्याविरोधात जगभरातील सर्व धर्मनिरपेक्ष शक्‍तींनी एकजुटीने उभे राहण्याची किती आवश्‍यकता आहे, हीच बाब या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे. देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्‍ती, तसेच गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्याचे कारस्थान पूर्णत्वास नेण्याच्या प्रयत्नात हे दहशतवादी होते, असे तपासात आढळले आहे. दहशतवादाविरोधात कारवाई करण्याचा केवळ बोलघेवडेपणा यापुढे उपयुक्‍त ठरणार नाही, यावरही यामुळे शिक्‍कामोर्तब झाले आहे. मात्र, "एनआयए'ने अटक केलेल्या या दहा जणांच्या कुटुंबीयांनी या आरोपांचा इन्कार केला असून, त्यांना विनाकारण या कटात गोवल्याचा दावा केला आहे.

अर्थात, हेही दहशतवादी ताब्यात आल्यानंतरच्या नेहमीच्या रिवाजानुसारच घडले आहे. मात्र, त्यामुळेच आता या दहशतवाद्यांवरील आरोप सबळ पुराव्यानिशी शाबित व्हायला हवेत. अर्थात, या छाप्यांच्या वेळी सापडलेली स्फोटके व अन्य शस्त्रे यामुळे "एनआयए'ची बाजू भक्‍कम आहे. आता, "एनआयए'च्या या कामगिरीचा वापर तोंडावर आलेल्या निवडणुकीच्या प्रचारात करून, राजकीय स्वार्थासाठी ध्रुवीकरण साधणे कोणी करणार असेल, तर ते मात्र गैर आहे, यात शंका नाही. 

Web Title: Pune Edition Article on Terrorism