वारसदार (मुद्रा)

सारंग खानापूरकर
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

गेल्या वर्षी तीन महिन्यांसाठी म्हणून अमेरिकेत गेल्यानंतर ते अद्यापही परतलेले नाहीत. कर्माप्पांची ही नाराजी भारताला परवडण्यासारखी नाही. याचे कारण कर्माप्पांमधील वादातून तिबेटमध्ये राजकीय फूट पडू नये, यासाठी भारत प्रयत्नशील आहे.

भारत आपल्यावर पाळत ठेवत असल्याची तक्रार करीत 17 वे कर्माप्पा ओजेन त्रिनले दोर्जे यांनी भारतात लवकर परतणार नसल्याचे सूचित केले आहे. तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांच्यानंतर तेच तिबेटचे सर्वांत प्रभावी नेते आहेत. त्यांच्या या निवेदनाने ते चर्चेत आले आहेत. मात्र, दोर्जे यांनी नाराजी व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही.

गेल्या वर्षी तीन महिन्यांसाठी म्हणून अमेरिकेत गेल्यानंतर ते अद्यापही परतलेले नाहीत. कर्माप्पांची ही नाराजी भारताला परवडण्यासारखी नाही. याचे कारण कर्माप्पांमधील वादातून तिबेटमध्ये राजकीय फूट पडू नये, यासाठी भारत प्रयत्नशील आहे. 

ऐंशीच्या दशकात 16 व्या कर्माप्पांचे निधन झाल्यानंतर 17 व्या कर्माप्पा पदासाठी दोघे जण पुढे आले आणि ते अजूनही 17 वे कर्माप्पा म्हणूनच जगभर वावरत आहेत. दलाई लामा आणि चीन यांनी ओजेन त्रिनले दोर्जे यांनाच मान्यता दिली असली, तरी भारताने त्यांचे विरोधक थाये त्रिनले दोर्जे यांना मान्यता दिली आहे. मात्र, थाये यांनी दलाई लामांच्याच अधिकाराला आव्हान दिल्याने तिबेटच्या एकतेसाठी भारताला ते फारसे उपयुक्त नाहीत. त्यामुळेच ओजेन त्रिनले दोर्जे यांना अमेरिकेतून परत आणण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. 

कर्माप्पा म्हणजे तिबेटमधील सर्वांत जुन्या बौद्ध पंथाचे सर्वोच्च नेते. त्यांना एक हजारहून अधिक वर्षांची परंपरा आहे. ओजेन त्रिनले दोर्जे यांचा जन्म चीनमध्ये झाला आणि ते सात वर्षांचे असताना त्यांना आधीच्या कर्माप्पांनी मागे ठेवलेल्या खुणेच्या आधारावर कर्माप्पा म्हणून तिबेटमध्ये आणले गेले. तिबेटला पूर्णपणे ताब्यात घेण्यास प्रयत्नशील असलेल्या चीननेही आश्‍चर्यकारकरीत्या त्यांनाच दलाई लामा यांचा वारसदार म्हणून घोषित केले आहे. 

वयाच्या 14 व्या वर्षी ते नेपाळमार्गे भारतात पळून आले. भारतात अध्ययन करून 2008 नंतर त्यांनी परदेश दौरे सुरू केले. आधुनिक जगासमोर असलेली आव्हाने आणि बौद्ध धर्मात त्यासाठी असलेली उत्तरे, यांचा ते प्रचार करीत असतात. ते पर्यावरणवादी आहेत. सर्व बौद्ध मठांमध्ये शाकाहारच केला जावा, अशा सूचना त्यांनी जारी केल्या होत्या.

जगभरातील त्यांच्या प्रवासामुळे त्यांना मान्यता मिळत आहे. मात्र, त्यांच्या मठांवर भारतात घातलेले छापे, त्यांच्या प्रवासावरील निर्बंध, त्यांच्याकडे चीनचे हेर म्हणून पाहिले जाणे, या व अशा कारणांमुळे ते भारतात येण्यास फारसे उत्सुक नाहीत, असे दिसते. पण, हा तिढा सोडविण्यासाठी भारताला प्रयत्न करावे लागतील. 

Web Title: Pune Edition Article on Varasdar in Mudra