वाहन उद्योगातील "अर्थ'रागिणी (नाममुद्रा )

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

कंपनीत आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या विविध पदांच्या जबाबदाऱ्या त्यांनी सहजतेने पेलल्या. त्यांनी 2013 मध्ये जनरल मोटर्स ऍसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून निवृत्तिवेतनाशी संबंधित 85 अब्ज डॉलरची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

आपल्या क्षमतेच्या बळावर अनेक भारतीय महिला जगभरात विविध क्षेत्रांत कौतुकास्पद भरारी घेत आहेत. वाहन उद्योगासारख्या पुरुषी समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातही स्त्रीशक्तीने कर्तृत्वाचा झेंडा उभारला आहे. अमेरिकेतील "जनरल मोटर्स' या सर्वांत मोठ्या वाहननिर्मिती कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारीपदी (सीएफओ) दिव्या सूर्यदेवरा या भारतीय-अमेरिकी महिलेची नुकतीच नियुक्ती झाली आहे.

वाहननिर्मिती कंपन्यांच्या 110 वर्षांच्या इतिहासात "सीएफओ'पद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. विशेष म्हणजे, कंपनीचे "सीईओ'पदही मेरी बारा यांच्या निमित्ताने एका महिलेकडेच आले आहे. त्यामुळे, "जनरल मोटर्स'मध्ये या दोन्ही उच्च पदांवर कर्तृत्ववान महिला विराजमान होण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. 

चेन्नईमध्ये जन्मलेल्या 39 वर्षीय सूर्यदेवरा यांनी मद्रास विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी मिळविली. त्यानंतर, वयाच्या 22 व्या वर्षी अमेरिकेतील हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून त्यांनी "एमबीए' केले. जागतिक बॅंकेतील इंटर्नशिपमुळे त्यांना अनुभवाची चांगली संधी मिळाली. "यूबीएस' आणि "प्राईसवॉटरहाऊस कूपर्स'सारख्या कंपन्यांमध्ये वित्तीय विश्‍लेषक आणि लेखापाल म्हणून त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्या सध्या "जनरल मोटर्स'मध्ये कार्पोरेट फायनान्सच्या उपाध्यक्ष आहेत.

कंपनीत आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या विविध पदांच्या जबाबदाऱ्या त्यांनी सहजतेने पेलल्या. त्यांनी 2013 मध्ये जनरल मोटर्स ऍसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून निवृत्तिवेतनाशी संबंधित 85 अब्ज डॉलरची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्याचप्रमाणे, "जनरल मोटर्स'ला "फॉर्च्युन 500' कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवून दिले. "सीईओ' आणि "सीएफओ' या दोन्ही पदांवर महिला असणारी "जनरल मोटर्स' ही या यादीतील दुसरी कंपनी आहे. 

स्वत: सूर्यदेवरा यांनी "फॉर्च्युन' मासिकाच्या चाळीस वर्षांखालील कर्तृत्ववान व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवले आहे. खरेतर, सूर्यदेवरा यांनी वाहन उद्योगात जाण्याचे ठरविले नव्हते. मात्र, आव्हानात्मक आणि गुंतागुंतीच्या कामातच आनंद मानण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी एवढी मोठी मजल मारली आहे. वडिलांच्या अकस्मात निधनानंतर, त्यांच्या आईने वडिलांचीही भूमिका निभावून त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यामुळेच, पितृदिनानिमित्त त्यांनी आपल्या पालकांना "सीएफओ'पदाची भेट दिली आहे. दिव्या सूर्यदेवरा यांची वाटचाल सर्वच महिलांना कारकिर्दीतील उत्तुंगतेची शिखरे पादाक्रांत करण्याची प्रेरणा देईल, यात शंका नाही. 

Web Title: Pune Edition Article on Vehicle Industry Nammudra