लाडके आणि दोडके! (ढिंग टांग!)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

स्थळ : मातोश्री हाईट्‌स, वांद्रे. 
वेळ : नीजानीज! 
काळ : गुडनाइट टाइम. 
पात्रे : नेहमीचीच. 

चिरंजीव विक्रमादित्य : (खोलीचे दार धाडकन ढकलत) हे बॅब्स...मे आय कम इन! 
उधोजीसाहेब : (पांघरुणाची घडी उलगडत) नेमकी हीच वेळ का रे सापडते तुला? 
विक्रमादित्य : (रागारागाने) मी रागावलोय तुमच्यावर! 
उधोजीसाहेब : (झोपायच्या तयारीत...) अस्सं? उद्या राग काढीन हां! आता दूध पिऊन झोप बरं!! गुड नाइट! 
विक्रमादित्य : (खोलीत शिरून हाताची घडी घालून) तुम्ही माझे लाडच करत नाही!! 

उधोजीसाहेब : (बोट नाचवत) लाडानं पोरं बिघडतात! 
विक्रमादित्य : (थयथयाट करत) बाकीचे आई-बाबा किती लाड करतात आपल्या मुलांचे! तुम्हीच करत नाही! मी ह्याचा त्रिवार निषेध करतो!! 
उधोजीसाहेब : (थोडा विचार करून) तुझे जेवढे लाड झाले तेवढे कोणाचेही झालेले नाहीत बाळा! कळलं? 
विक्रमादित्य : (कपाळाला आठ्या घालून) मी लाडका आहे की दोडका? 
उधोजीसाहेब : (गमतीने नाक ओढत) दोडक्‍यासारखा दिसणारा लाडका आहेस! झालं समाधान? 
विक्रमादित्य : (संतापून) निषेध! निषेध!! निषेध!!! 
उधोजीसाहेब : (समजूत घालत) एवढं काय रागवायला झालंय तुला? 

विक्रमादित्य : (पाय हापटत) रागावू नको तर मग काय सेलेब्रेट करू? 
उधोजीसाहेब : (शांत सुरात) हे बघ, तुझे लाड झालेच नाहीत, असं समजू नकोस! किती किती गोष्टी आपण केल्या की नाही तुझ्यासाठी? 
विक्रमादित्य : (नकारार्थी मान हलवत) एकही केलेली नाही, आजवर! आठवा तुम्हीच!! 
उधोजीसाहेब : (अमान्य करत) असं कसं म्हणतोस? मागल्या खेपेला तुला आयपॅड आणून दिलं होतं! पण तू त्याच्यावर कविता केल्यास! एवढ्या महागड्या गोष्टीचा इतका दुरुपयोग बरा नाही बाळा!! 

विक्रमादित्य : (घुश्‍शात) मी कविता मोबाइलवर केल्या होत्या! 
उधोजीसाहेब : (दुसरं एग्झांपल देत) बरं ते ऱ्हायलं! मागल्या खेपेला तुला जिम सुरू करायचं होतं! मला वाटलं की तुला कुठलं तरी जिम जॉइन करायचंय! पण तू चौपाटीवर उघड्यावर जिम बांधून काढलंस!! 
विक्रमादित्य : (हेटाळणीनं) आणि तुमच्या म्युन्सिपाल्टीवाल्यांनी त्याच्यावर ऍक्‍शन घेतली! हेच का तुमचे लाड? 
उधोजीसाहेब : (आणखी एक एग्झांपल देत) आणि हो! केवळ तुझ्या बालहट्‌टापायी आम्ही भायखळ्याच्या राणीबागेत पेंग्विन आणून ठेवले! कुणासाठी आणले होते पेंग्विन? देशातल्या कुठल्याही लाडावलेल्या पोराकडे जा आणि त्याला विचार की बुवा तुझ्याकडे जिवंत पेंग्विन आहेत का? काय उत्तर मिळतं, ते मला येऊन सांग!! 

विक्रमादित्य : (डोकं खाजवत) ते पेंग्विन बोअर आहेत! 
उधोजीसाहेब : (युक्‍तिवाद करत) वा रे वा! बोअर कसे? एवढे महागडे पेंग्विन आणले तुझ्यासाठी! इतक्‍यात कसा कंटाळा आला? 
विक्रमादित्य : (कंटाळलेल्या सुरात) ब्लॅक अँड व्हाइटचा जमाना आहे का आता बॅब्स! चांगले निळे, जांभळे, गुलाबी, पिवळे असे पेंग्विन आणायला हवे होते!! 
उधोजीसाहेब : (खचून) आणू हं आपण! सगळं आणून देतो, पण तिकीट नको मागूस बरं! 

विक्रमादित्य : (करवादून) काऽऽ पऽऽण! आम्हाला तिकीट हवंच! 
उधोजीसाहेब : (खासगी आवाजात) सध्याच्या काळात तिकीट मिळालेले सगळे दोडके आहेत आणि बाकीचे लाडके! कळलं? 

-ब्रिटिश नंदी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Dhing Tang Article