विकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग 

विकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग 

देशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या विकासाचे केंद्र म्हणून सर्वप्रथम विमानतळांचा विकास होण्याची गरज आहे. 

औद्योगिक सुधारणा आणि पायाभूत सुविधा या एकमेकांसोबत चालणाऱ्या गोष्टी आहेत. देशाच्या औद्योगिक विकासाची पायाभरणी करायची असते तीच मुळी पायाभूत सुविधांच्या भक्कम उभारणीतून. आज आपण देशात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणुकीची अपेक्षा करतो आहोत. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सरकारने अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून परकी गुंतवणुकीसाठी लाल गालीचा अंथरला आहे. मात्र, बाहेरचा पैसा आणायचा असेल तर एवढे पुरेसे नाही. परदेशातील लोकांना आकर्षित करण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा भक्कम विकास आणि त्यासाठी सर्वप्रथम देशातील विमानतळांच्या उभारणीकडे लक्ष द्यायला हवे. देशातील वीस महत्त्वाच्या शहरांना 2030 पूर्वी दुसऱ्या विमानतळाची गरज भासणार आहे. तसे पाहायला गेले तर आपल्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे असे वाटू शकते; पण आपला अशा प्रकारच्या (विशेषत: विमानतळ) पायाभूत सुविधा विकसित करण्याचा अनुभव काही फारसा चांगला नाही. मुंबई हे शहर देशाची आर्थिक राजधानी आहे, असे आपण म्हणतो; पण याच मुंबईला आपला दुसरा विमानतळ मिळवायला दहा वर्षेदेखील अपुरी पडली, तर मग अन्य वीस शहरांचे काय होणार, असा प्रश्न पडतो. 

औद्योगिक विकास आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीचे सूत्र मुळात समजून घेण्याची खरी गरज आहे. 1830 मध्ये वाफेवर चालणाऱ्या रेल्वेच्या इंजिनाचा शोध लागला आणि अत्यंत सुमार दर्जाचे रस्ते आणि दळणवळणाच्या सुविधांची कुठलीही नीट सोय नसलेल्या लंडनच्या औद्योगिक विकासाला चालना मिळाली. पुढे अगदी अल्पावधीतच रेल्वे ही तेथील प्रवासाचे सर्वांत महत्त्वाचे साधन बनली. या सुविधेमुळे तेथील लहान- मोठी गावे शहरांना जोडली गेली, कच्चा माल जलदगतीने कारखान्यांपर्यंत पोचवता आला आणि पक्‍क्‍या मालाला तातडीने बाजारपेठ गाठता आली. त्यानंतर अगदी वीस वर्षांच्या अल्प कालावधीतच 1850च्या सुमारास लंडनमध्ये भुयारी मेट्रोची संकल्पना मांडण्यात आली आणि 1863 मध्ये लंडनमध्ये पहिली मेट्रो धावू लागली. भारतात रेल्वेचे जाळे उभारण्यासाठीदेखील इंग्रजांनी महत्त्वाची आणि ठोस कामगिरी केली. इंग्रजांच्याच कारकिर्दीत 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वेगाडी धावली. देशातील रेल्वेचे जाळे विकसित होत गेले; पण भारतात पहिली मेट्रो धावायला थेट 1984 वर्ष उजाडावे लागले. आजही युरोपच्या तुलनेत आपल्याकडील रेल्वेसेवा अनेक बाबतीत कमी पडते, तर मेट्रो मात्र अद्याप केवळ चारच राज्यांपर्यंत पोचू शकली आहे. इतर ठिकाणी मेट्रो पोचायला आणखी किती वेळ लागेल हे सांगणेदेखील सोपे नाही. वाफेच्या इंजिनापासून मेट्रोपर्यंतचा लंडनचा प्रवास जसा थक्क करणारा आहे, तसेच पायाभूत सुविधांच्या उभारणीबाबतचे आपले धोरण घाम फोडणारे आहे. अलीकडच्या काळात निदान या विषयांकडे गांभीर्याने पाहिले जातेय, त्यामुळे अजूनही आशेचा किरण आहे, असे मानायला हरकत नाही. एखाद्या विषयाची कल्पना मांडण्यापासून ते प्रत्यक्षात येईपर्यंत लागणारा वेळच आपल्या विकासाच्या वेगाला आडकाठी आणू पाहतोय. त्यामुळे आपल्या प्रकल्पांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढतात, शिवाय या वेळकाढू धोरणांमुळे विकासाचा वेग खुंटतो ते वेगळेच. या विकासाच्या रथातील सर्वांत महत्त्वाचे चाक असते ते म्हणजे देशातील विमानतळ. 

केंद्र सरकार करीत असलेल्या एका सर्वेक्षणानुसार 2030पर्यंत देशातील वीस शहरांना दुसऱ्या विमानतळाची गरज भासणार आहे. त्यामध्ये मुंबई, दिल्ली, गोवा, विशाखापट्टणम, जयपूर, पुणे, अहमदाबाद, राजकोट, पाटणा, कोलकता आणि बंगळूर या शहरांचा समावेश आहे. या यादीमध्ये 2035 नंतर आणखी काही शहरांचा समावेश होण्याची शक्‍यता आहे. 

नागरी विमान वाहतूक विभागाच्या हवाई नियंत्रण महासंचालनालयाने 2017-18मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील विमानतळांवरून आजघडीला 18 कोटी 39 लाख प्रवासी दरवर्षी प्रवास करतात. तीन वर्षांपूर्वी हा आकडा 13 कोटी 49 लाख एवढा होता, तर या वर्षी तो वीस कोटींच्याही पुढे जाण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे देशातील बहुतेक विमानतळ आताच आपल्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना सेवा देत आहेत. जगातील वीस सर्वांत व्यग्र विमानतळांच्या यादीत समावेश असलेल्या राजधानी दिल्लीच्या विमानतळाची प्रवासी हाताळण्याची क्षमता या वर्षी सात कोटींच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हा विमानतळदेखील मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांचे ओझे वाहायला लागेल. मुंबई विमानतळाच्या सद्यःस्थितीचा तर विचारच न केलेला बरा. मुंबईत विमान उतरणार असेल, तर आकाशात दोन- चार तास जरा जास्तच काढावे लागतात. या विमानतळावर लॅंडिंग आणि टेक ऑफसाठी चक्क रांग लागते. मुंबईत विमान पोचल्यानंतरदेखील धावपट्टी मोकळी होत नाही, तोपर्यंत हवेतच विमानाला घिरट्या माराव्या लागतात. कधी कधी तर हा वेळ तासाभरापेक्षाही अधिक असतो. एका खासगी संस्थेच्या अहवालानुसार 2015 मध्येच मुंबई विमानतळाची प्रवासी हाताळण्याची क्षमता संपुष्टात येणार होती, त्यामुळे मुंबईकरिता नवी मुंबईमध्ये दुसऱ्या विमानतळाच्या उभारणीला वेग देणे अपेक्षित होते. तरीही अजूनदेखील या प्रकल्पाकडे पाहिजे तसे लक्ष दिले जात नाही. 

एकीकडे देशाच्या आर्थिक राजधानीचा तुरा मिरवत मुंबई आजही जगभरातील लोकांचे दुसरे सर्वांत महत्त्वाचे शहर म्हणवून घेत असले, तरी मुंबईतील पायाभूत सुविधांची पुरती दैना झाली आहे, असेच म्हणावे लागेल. देशातील सर्वांत मोठ्या बंदराचा मानही आता मुंबईचा राहिलेला नाही. शिवाय दुसऱ्या विमानतळाच्या जागेबाबतही अनेक संभ्रम आहेत. आजच्या स्थितीत असे मोठे विमानतळ उभारताना किमान दहा कोटी प्रवासी तरी हाताळले जावेत, अशी अपेक्षा असते. नवी मुंबईतील विमानतळ मात्र याच्या निम्मीच प्रवासी संख्या हाताळू शकणार आहे. दुसऱ्या विमानतळाचा विचार करताना नेवाळी, मांडवा आणि नवी मुंबई अशा तीन जागांचे पर्याय होते. त्यातील मांडवा येथील जागा अत्यंत योग्य असल्याचे जाणकारांचे मत होते. परंतु, त्यासाठी सागरी सेतू बांधावा लागणार होता. शिवाय, समुद्रातून जाणाऱ्या रस्त्यावर व्यावसायीकरणाची संधी मर्यादित असते. त्यामुळे राजकीय सोयीने ही जागा निवडण्यात आल्याचा या क्षेत्रातील जाणकारांचा आरोप आहे. मुंबई आणि दिल्लीची ही स्थिती असेल, तर इतर देशांतर्गत विमानतळांबाबत विचारच करायला नको. 
विमानतळ हे विभागीय आर्थिक विकासाचे शक्तिस्थळ असते, तेव्हा व्यवसाय आणि उद्योगांच्या विकासाचे केंद्र म्हणून विमानतळांच्या विकासाकडे पाहण्याची गरज आहे. आजघडीला देशातील 50 व्यग्र विमानतळांपैकी निम्म्या विमानतळांची प्रवासी हाताळण्याची क्षमता संपलेली आहे. त्यातच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण परकी गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय; पण त्याआधी करायचा गृहपाठ मात्र विसरतोय... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com