नाही रे उजाडत ! (अग्रलेख)

नाही रे उजाडत ! (अग्रलेख)

महाराष्ट्रातील विजयादशमी राजकीय फटाक्‍यांनी दणाणून गेली असतानाच, तिकडे दूरवर पंजाबात शुक्रवारी "रावणदहना'च्या निमित्ताने कडाडलेल्या दारूगोळ्यांच्या दणदणाटात रेल्वे गाडीच्या शिट्या ऐकूच न आल्यामुळे त्या गाडीखाली चिरडून किमान 61 लोक प्राणास मुकले. अंगावर शहारे आणणारी अशीच ही घटना असून, त्याबद्दल आपल्याच घरातील माणूस दगावल्याची भावना देशभरात निर्माण झाली. अमृतसरजवळ असलेल्या दोडा रेल्वे फाटकावर ही दुर्घटना घडली, तेव्हा तो रावणदहनाचा सोहळा पाहण्यासाठी आधीच लोक थोड्या उंचावर असलेल्या रेल्वे रूळांवर जाऊन उभे राहिले होते.

रावणदहन झाल्यावर आगीने मोठा भडका घेतला आणि आणखी काही लोकांनी स्वत:ला वाचवण्यासाठी रेल्वे रूळांवर धाव घेतली; पण प्रत्यक्षात ते मृत्यूला आमंत्रण ठरले. हे लोक रूळांवर गेले, त्याचक्षणी जालंदरहून अमृतसरला जाणारी रेल्वे भरधाव वेगाने आली आणि त्या गाडीखाली किमान 61 लोकांना मृत्यू आला. आता या दुर्दैवी घटनेत दोष कोणाचा, यावर बरेच चर्वितचर्वण सुरू असले, तरी त्यामुळे अनेक मूलगामी प्रश्‍न समोर आले आहेत. 

सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा लोकांच्या हलगर्जीपणाचा आणि स्वत:च्याच जीवनाबद्दलच्या बेफिकिरीचा आहे. रेल्वे रूळ ही काही केव्हाही फिरायला जाण्याची वा शिळोप्याच्या गप्पा मारण्याची जागा नाही. खरे तर रेल्वे रूळ ओलांडून जाणे, हा गुन्हा आहे. तरीही कोणत्याही क्षणी गाडी येण्याची शक्‍यता असतानाही, हे लोक रूळांवर ती "प्रेक्षक गॅलरी' असल्याप्रमाणे जमा झाले होते. अशावेळी रेल्वेगाडीच्या धडकेने माणसे मृत्युमुखी हे घटनेचे वर्णन दिशाभूल करणारे ठरू शकते. तेव्हा या बाबतीत प्रसारमाध्यमांनीही जागरूक आणि काटेकोर राहिले पाहिजे. या घटनेचे सर्व तपशील चौकशीतून बाहेर येतील आणि दोषी कोण हे कळेल, अशी अपेक्षा आहे; परंतु लोहमार्गावर उभे राहण्याच्या कृतीचे समर्थन होऊ शकत नाही. 

आपल्या देशात गेल्या तीन दशकांपासून, धार्मिक सोहळे - मग ते कोणत्याही धर्माचे असोत, त्यासाठी सार्वजनिक जागा अडवण्याचा रिवाजच कायदा होऊ पाहत आहे, हा या निमित्ताने ऐरणीवर आलेला दुसरा मुद्दा. येथे रस्त्यांऐवजी लोकांनी रेल्वे रूळ अडवले होते. त्यामुळेच रेल्वे या दुर्घटनेस "अपघात' मानायला तयार नाही आणि त्यामुळे हे बळी नेमक्‍या कोणाच्या अनास्थेचे बळी आहेत, असा प्रश्‍न उभा राहिला आहे. त्या प्रश्‍नाचे उत्तर "हे आपल्या सर्वांच्याच अनास्थेचे बळी आहेत', असेच नाईलाजाने का होईना देणे भाग आहे. यानिमित्ताने उभे राहिलेले आणखी काही प्रश्‍न हे धार्मिक सणांच्या वेळी दिसून येणाऱ्या आपल्या सर्वांच्याच वर्तनासंबंधात आहेत. मुळात रेल्वे रूळांपासून इतक्‍या जवळ या रावणदहनाच्या सोहळ्यास परवानगी कशी देण्यात आली, हा मुद्दा अमृतसरच्या या दुर्घटनेसंबंधात निरर्थक ठरतो. त्याचे कारण हा सार्वजनिक सोहळा विनापरवाना आयोजित करण्यात आला होता आणि त्यामुळेच सोहळ्याचे आयोजक दुर्घटनेनंतर फरारी झाले आहेत. मात्र, त्याचवेळी आपण रेल्वे रूळांवर जाणे हाच अपराध आहे, याची जराही पर्वा न करता या परिसरातील लोक दुर्घटनेस जवळपास 36 तास उलटल्यानंतरही परत रूळांवरच ठाण मांडून बसले आहेत! त्यांची मागणी अर्थातच रेल्वे प्रशासनाने गाडीच्या ड्रायव्हरवर कारवाई करावी, ही आहे.

आता या जनसमूहाच्या वेदना आपण समजू शकत असलो, तरी त्यामुळे या दुर्घटनेनंतर या मार्गावरून एकही गाडी जाऊ शकलेली नाही, हे वास्तव कशाचे निदर्शक आहे? हा साराच पेच गंभीर आहे आणि त्यामुळे तरी आपण सार्वजनिक सोहळे कसे आयोजित करावेत; तसेच आपणही समाजात वावरताना किमान काही पथ्ये कोणती पाळावीत, याबद्दलचे भान सर्वांनाच येण्याची गरज आहे. 

रेल्वे चालकाच्या म्हणण्यानुसार, त्याने आपत्कालीन ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपावेतो लोकांनी गाडीवर दगडफेक सुरू केली होती आणि त्यामुळे त्यास गाडी वेगाने पुढे काढणे भाग पडले, असे त्याचे निवेदन सांगते. आता या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिले आहेत. परंतु या साऱ्या घटनाक्रमातून आपण काही शिकणार आहोत की नाही, हा मूळ प्रश्‍न आहे. तो उपस्थित होतो, याचे कारण अद्यापही सामूहिक शिस्त, नियम पाळण्याची वृत्ती या गोष्टी समाज म्हणून हाडीमाशी रुजलेल्या नाहीत.

तशा संस्कृतीची पहाट आपल्याकडे आतातरी उगवावी. या 61 लोकांना आलेल्या दुर्दैवी मृत्युमुळे देशभरातील घर अन्‌ घर हळहळत आहे, यातच शंका नाही; पण निदान भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी सजग आणि सावध राहण्याची गरज ओळखणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com